आयुष मंत्रालय

आयुष मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटनेमध्ये पारंपरिक औषधांच्या  जागतिक केंद्राकरिता यजमान देश म्हणून करार


भारत सरकारकडून केंद्राच्या स्थापनेला गती; 21 एप्रिल 2022 रोजी गुजरातमधल्या जामनगर येथे भूमिपूजन समारंभ

Posted On: 26 MAR 2022 5:22PM by PIB Mumbai

 

आयुष मंत्रालयाने गुजरातमधील आयुर्वेद प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेत (ITRA) हंगामी कार्यालयासह, गुजरातमधील जामनगर येथे पारंपरिक औषध जागतिक केंद्र (GCTM )  स्थापन करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेसोबत (WHO) यजमान देश म्हणून  करारावर स्वाक्षरी केली आहे. या केंद्राला भारत सरकारकडून सुमारे  250 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स गुंतवणुकीचे पाठबळ मिळणार आहे. या केंद्राचे प्राथमिक उद्दिष्ट आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाद्वारे जगभरातील पारंपारिक औषधांच्या क्षमता उपयोगात आणणे आणि जगभरातील समुदायांचे एकंदर आरोग्यमान  सुधारणे हे आहे.

आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस  घेब्रेयसस यांनी 25 मार्च रोजी जिनिव्हा येथे या करारावर स्वाक्षरी केली. गेल्या महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्राच्या स्थापनेला मंजुरी दिली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऐतिहासिक करारसाठी आपल्या संदेशात म्हटले आहे, पारंपरिक औषधांसाठीच्या जागतिक केंद्राच्या  स्थापनेसाठी करारावर स्वाक्षरी होत असल्याचा आनंद आहे. विविध उपक्रमांद्वारे, आमचे सरकार प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्यसेवा, परवडणारी आणि सर्वांना उपलब्ध व्हावी याकरिता  अथक प्रयत्न करत आहे. जामनगर येथील जागतिक केंद्र जगाला सर्वोत्तम आरोग्य सेवा प्रदान करण्यात मदत करेल.

कार्यक्रमात आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी मनोगत व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे आणि प्रयत्नांमुळे आपल्या  मंत्रालयाला हा गौरव प्राप्त झाल्याचे ते म्हणाले. हे केंद्र जगभरातील पारंपारिक औषध प्रणालींना दूरगामी फायदे आणि प्रतिष्ठा मिळवून देईल. संपूर्ण मानवजातीला स्वस्त आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा मिळण्यासाठी हा उपक्रम उत्तम साहाय्य  करेल असेही ते म्हणाले. अत्याधुनिक वैज्ञानिक पद्धतींशी जोडण्यासाठी हे  केंद्र अधिक चांगली यंत्रणा उपलब्ध करून देईल, अशी माहिती सोनोवाल यांनी  दिली.

जागतिक आरोग्य संघटनेचे  महासंचालक डॉ टेड्रोस घेब्रेयसस यांनी  भारत सरकारच्या पुढाकाराचे महत्त्व अधोरेखित केले. आधुनिक विज्ञान आणि समानता व  शाश्वततेच्या  तत्त्वांवर आधारित पारंपारिक औषधांच्या क्षमतांचा उपयोग 21 व्या शतकात आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारी बदल ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हे केंद्र जगभरातील पारंपारिक औषधांचे  पहिले आणि एकमेव जागतिक केंद्र  (कार्यालय) असेल. हे केंद्र पारंपारिक औषध पद्धती आणि उत्पादनांवरील धोरणे आणि मानकांसाठी ठोस सैद्धांतिक बैठकीचा पाया घालण्यावर  लक्ष केंद्रित करेल. विविध  देशांना त्यांच्या आरोग्य प्रणालींमध्ये सुसूत्रता आणण्यात  मदत करेल आणि चांगल्या व  शाश्वत प्रभावासाठी  गुणवत्ता आणि सुरक्षितता याविषयीचे नियमन करेल.

पारंपारिक औषधशास्त्र  आरोग्य सेवा वितरण प्रणालीचा एक प्रमुख आधारस्तंभ आहे आणि केवळ भारतातच नव्हे तर जगभरातल्या लोकांचे  आरोग्य चांगले राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. अलिकडच्या वर्षांत, पारंपारिक औषधोपचारांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्याने एक मोठे परिवर्तन दिसून आले आहे.  तांत्रिक नवकल्पनांमुळे ते लोकांसाठी अधिक सुलभ झाले आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासोबत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर आता पारंपारिक औषधांमधील पुरावे आणि कल प्रतिचित्रित करण्यासाठी आणि फार्माकोकिनेटिक (बलगतिकी सह्यता) गुणधर्मांसाठी नैसर्गिक उत्पादने तपासण्यासाठी केला जात आहे. जागतिक आरोग्य संघटना-जीसीटीएमची रचना जगातील सर्व क्षेत्रांना सहभागी करून घेण्यासाठी आणि लाभ देण्यासाठी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 21 एप्रिल 2022 रोजी केंद्राचे भूमिपूजन होईल.

***

S.Kane/S.Kakade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1810004) Visitor Counter : 383