राष्ट्रपती कार्यालय
जागतिक क्षयरोग दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती राम नाथ कोविन्द यांचा संदेश
Posted On:
23 MAR 2022 7:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 मार्च 2022
उद्या, म्हणजेच 24 मार्च रोजी, जागतिक क्षयरोग दिन पाळला जातो. या दिवसाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांनी जनतेला संदेश दिला आहे. ते म्हणतात –
“क्षयरोगाविषयी जनजागृती करण्यासाठी, 24 मार्च 2022 हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून पाळला जातो, याचा मला आनंद आहे. याच दिवशी 1882 साली, डॉ रॉबर्ट कॉच यांनी क्षयरोगाला कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणूचा शोध लावल्याचे जाहीर केले होते. त्यांच्या या अत्यंत महत्वाच्या संशोधनामुळे या दुर्धर आजाराचे निदान आणि उपचार करण्याचा मार्ग मोकळा झाला.
कोरोना महामारी आणि कोरोनाच्या नवनव्या विषाणूंच्या संक्रमणामुळे देशातील आरोग्य व्यवस्थेवर गेल्या दोन वर्षात मोठा ताण निर्माण झाला आहे. या महामारीने देशाच्या आरोग्य व्यवस्थेसमोर मोठे आव्हान निर्माण केले. केंद्र आणि राज्यांचे एकत्रित प्रयत्न तसेच आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आपण या महामारीचा सामना करण्यासाठी जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवली.
देशातील, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जलदगतीने प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या. तसेच नव्या परिस्थितीशी जुळवून घेत, देशभरातील क्षयरोग्यांना ह्या महामारीच्या काळातही,वेळेत आणि योग्य उपचार मिळतील हे सुनिश्चित करण्यात आले, हे सांगतांना मला आनंद होत आहे.
इंडिया टीबी रिपोर्ट -2022 हा भारतातील क्षयरोगाची सद्यस्थिती विशद करणाऱ्या अहवालाच्या प्रकाशनाला माझ्या शुभेच्छा ! या आजाराशी लढा देऊन त्यातून बरे झालेल्या आणि इतरांच्या मनात नवी उमेद निर्माण करणाऱ्या सर्व अजिंक्यवीरांचे मी अभिनंदन करतो. 2025 पर्यंत भारताला क्षयरोगमुक्त करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया.”
राष्ट्रपतींचा मूळ संदेश वाचण्यासाठी कृपया इथे क्लिक करा
* * *
S.Patil/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1808880)
Visitor Counter : 263