जलशक्ती मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी सुजलाम 2.0 अभियानाची केली सुरुवात


या अभियानाचा भाग म्हणून विविध ग्रे वॉटर विषयक उपक्रम हाती घेण्यासाठी नऊ मंत्रालयांच्या संयुक्त करारावर केल्या स्वाक्षऱ्या

या अभियानाअंतर्गत आम्ही ग्रे वॉटर व्यवस्थापनाकरिता लोकसहभागातून विविध समुदाय, पंचायतीसारख्या संस्था, शाळा, अंगणवाड्या यांच्यामध्ये जागृती करण्याचे नियोजन करत आहोत: गजेंद्र सिंग शेखावत

Posted On: 23 MAR 2022 5:23PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 मार्च 2022

 

केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी ग्रे वॉटर अर्थात शौचालयात निर्माण होणाऱ्या सांडपाण्याव्यतिरिक्त इतर घरगुती वापरातून निर्माण झालेल्या अस्वच्छ पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठीच्या सुजलाम 2.0 अभियानाची सुरुवात केली. काल झालेल्या जागतिक जल दिन 2022 निमित्त, केंद्रीय जल शक्ती मंत्रालयाच्या पेयजल आणि स्वच्छता विभागाने आभासी पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. या संदर्भातील संयुक्त करारावर जल शक्ती; ग्रामविकास; महिला आणि बालविकास; युवा व्यवहार आणि क्रीडा; आदिवासी व्यवहार; आरोग्य आणि कुटुंब कल्याण; शिक्षण; पर्यावरण, वने आणि हवामान बदल आणि पंचायती राज या नऊ केंद्रीय मंत्रालयांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. सुजलाम 2.0 अभियानाच्या अंमलबजावणीशी थेट जोडल्या गेलेल्या सर्व संबंधितांशी समन्वय साधून या मंत्रालयांनी एकत्रितपणे ग्रे वॉटर अर्थात घरगुती  वापरातून निर्माण झालेल्या अस्वच्छ पाण्याचे व्यवस्थापन कार्य अधिकाधिक उत्तम पद्धतीने करणे अपेक्षित आहे. 

सुजलाम 2.0 अभियानाची सुरुवात करताना केंद्रीय मंत्री म्हणाले, “भूजल: अदृष्याला दृश्यमान करणे” ही यंदाची संकल्पना आहे. या महत्त्वाच्या दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित करून माझ्या अखत्यारीतील मंत्रालय लोकसहभागातून ग्रे वॉटर व्यवस्थापनाचे उद्दिष्ट सध्या करण्यासाठी “सुजलाम 2.0”  या अभियानाची सुरुवात करत आहे . या अभियानाअंतर्गत आम्ही विविध समुदाय, पंचायतीसारख्या आपल्या संस्था, शाळा, अंगणवाड्या यांच्या माध्यमातून ग्रे वॉटर व्यवस्थापनाविषयी जागृती करण्याचे नियोजन करत आहोत. अस्वच्छ पाणी जेथे निर्माण होते तेथेच साचू आणि साठू दिले की ते व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधा यांच्याकरिता एका मोठ्या आव्हानात रुपांतरीत होऊ लागते, म्हणून असे पाणी जिथे निर्माण होते तेथेच त्याचे उत्तमरित्या व्यवस्थापन करता येऊ शकते. 

केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले, “मी माझ्या सर्व लोकसंपर्क अधिकारी आणि ग्राम जल आणि स्वच्छता समितीचे  सदस्य, स्वच्छाग्रही, बचत गट प्रमुख यांना स्थानिक पातळीवर सुजलाम 2.0 अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्याची विनंती करतो.” 

युनिसेफच्या पाणी आणि स्वच्छता विभागाचे प्रमुख निकोलस ऑस्बर्ट यांनी त्यांच्या स्वागतपर भाषणात ग्रे वॉटर व्यवस्थापनाविषयीचा जागतिक दृष्टीकोन सामायिक केला. ते म्हणाले, “ भारत सरकारमधील अनेक मंत्रालये आज जलस्त्रोतांच्या शाश्वततेसाठी एकत्र येऊन आगामी काळासाठीचा आराखडा तयार करत आहेत ही अत्यंत हृद्य घटना आहे. आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, भारतात दररोज सुमारे 31 अब्ज लिटर वापरातून निर्माण झालेले  अस्वच्छ पाणी निर्माण होते. या पाण्याचे शुद्धीकरण आणि जतन करण्यासाठी शाश्वत वर्तन पद्धती विकसित करण्याची गरज आहे.” 

या मुद्द्याबाबत भारतीय दृष्टीकोनातून बोलताना पेयजल आणि स्वच्छता विभाग सचिव विनी महाजन म्हणाल्या, “वाढती लोकसंख्या आणि हवामानात सतत होणारे बदल लक्षात घेता, पाणी प्रश्नाचे महत्त्व आणि त्याचा ताण सर्वांना समजतो आहे. अशा वेळी आमच्या अभियानाला नऊ मंत्रालयांनी दिलेला पाठींबा म्हणजे आमच्या अभियानाचा विशेष गौरव आहे.”

केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांचा व्हिडिओ संदेश:

* * *

Jaydevi PS/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1808774) Visitor Counter : 294