आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांच्या हस्ते ब्रिक्स लस संशोधन आणि विकास केंद्राचा शुभारंभ
"जागतिक महामारी निवारणाप्रति ब्रिक्स देशांच्या वचनबद्धतेचा हा पुरावा आहे"
ब्रिक्स आणि इतर देशांसाठी लस विकसित करण्यासाठी आपली मजबूत लस उत्पादन व्यवस्था उपलब्ध करून देण्यास भारत इच्छुक आहे: डॉ. मनसुख मांडविया
Posted On:
22 MAR 2022 7:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 मार्च 2022
“भारतात जगातील सर्वात मोठे लस उत्पादन उद्योग आहेत जे 150 हून अधिक देशांना लसींचा पुरवठा करतात आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या 65-70% लस संबंधी गरजा पूर्ण करतात. भारत ब्रिक्स देशांना (ब्राझील, रशिया , भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) आणि जगासाठी लस विकसित करण्यासाठी मजबूत लस निर्मिती उद्योग उपलब्ध करून देण्यास तयार आहे. ”असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे. आज नवी दिल्ली येथे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ब्रिक्स लस संशोधन आणि विकास केंद्र तसेच लस सहकार्यावरील कार्यशाळेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.
"हे केंद्र लस संशोधन आणि विकासामध्ये ब्रिक्स देशांचे पूरक फायदे एकत्रित करण्यात आणि संसर्गजन्य रोगांना प्रतिबंध आणि नियंत्रण करण्यासाठी तसेच इतर गरजू विकसनशील देशांना वेळेवर मदत पुरवण्यासाठी ब्रिक्स देशांची क्षमता वाढवण्यास मदत करेल."असे डॉ. मांडविया यांनी अधोरेखित केले.
या उद्घाटन प्रसंगी , डॉ. मनसुख मांडविया यांनी लसींचे संशोधन आणि विकासासाठी एकत्रितपणे वैज्ञानिक प्रयत्न केल्याबद्दल ब्रिक्स देशांचे आभार मानले आणि प्रशंसा केली. ते पुढे म्हणाले की, कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर एका वर्षापेक्षा कमी कालावधीत कोविड-19 प्रतिबंधक सुरक्षित आणि प्रभावी लसींचा विकास आणि मंजुरी ही एक अद्भुत वैज्ञानिक कामगिरी आहे.”
विविध क्षेत्रात आपले सहकार्य मजबूत करण्याच्या ब्रिक्स देशांच्या वचनबद्धतेसह, लस संशोधन आणि विकासावर विशेष भर देण्यात आला. या संदर्भात, 2018 च्या जोहान्सबर्ग जाहीरनाम्यात ब्रिक्स लस संशोधन आणि विकास केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव होता.
ब्रिक्स संघटनेच्या सदस्य देशातील सरकारांच्या पाठिंब्याने, प्रत्येक ब्रिक्स देशाने त्यांची पुढील राष्ट्रीय केंद्रे निवडली आहेत- ओस्वाल्डो क्रूझ फाऊंडेशन (फिओक्रूझ), स्मोरोडिंटसेव्ह रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इन्फ्लुएझा, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR), सिनोवॅक लाइफ सायन्सेस कंपनी लिमिटेड, साऊथ आफ्रिकन मेडिकल रिसर्च कौन्सिल, अशी या केंद्रांची नावं आहेत.
चीनचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री वांग झिगांग या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.
या बैठकीला मार्सेलो क्वेरोगा (आरोग्य मंत्री, ब्राझील),मिखाईल मुराश्को (आरोग्य मंत्री, रशिया), डॉ. ब्लेड निझिमांडे (उच्च शिक्षण, विज्ञान आणि नवसंशोधन मंत्री, दक्षिण आफ्रिका), ब्रिक्स देशांचे प्रतिनिधी, वरिष्ठ प्रतिनिधी आणि संशोधन तज्ञ उपस्थित होते
R.Aghor/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1808369)
Visitor Counter : 270