गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत जम्मू इथे आज, केंद्रीय राखीव पोलिस दलाचा (सीआरपीएफ) 83 वा स्थापना दिन साजरा
पहिल्यांदाच सीआरपीएफचा स्थापना दिन समारंभ दिल्लीच्या बाहेर साजरा
सर्व केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांची पथसंचलने यापुढे देशाच्या विविध भागात घेण्याचा, भारत सरकारचा निर्णय
Posted On:
19 MAR 2022 6:53PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जम्मू इथे केंद्रीय राखीव पोलीस दलाचा 83 वा स्थापना दिन साजरा झाला. यावेळी केंद्रीय गृहमंत्र्यांनी पथसंचलनाचे निरीक्षण देखील केले. यावेळी, जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृहसचिव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी पहिल्यांदाच सीआरपीएफ चा स्थापना दिन समारंभ दिल्लीबाहेर साजरा केला गेला.
यावेळी बोलतांना, केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, की देशातील सर्व केंद्रीय सशस्त्र दल पोलिसांची वार्षिक पथसंचलने देशाच्या विविध भागात आयोजित करण्याचा निर्णय, भारत सरकारने घेतला आहे. सीआरपीएफच्या सर्व संस्था देशाच्या सीमाभागात आणि अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी सांभाळत असतात.त्यामुळे त्यांनी देशाच्या विविध भागात जायला हवे आणि स्थानिक लोकांशी त्यांनी सोहार्दाचे संबंध निर्माण करायला हवेत, तसेच त्या त्या प्रदेशातील लोकांची त्यांना माहिती असायला हवी, हाच विचार करुन, हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या निर्णयाचाच भाग म्हणून सीआरपीएफचे वार्षिक पथसंचलन जम्मू या ऐतिहासिक शहरात करण्यात आले होते.
जम्मू-कश्मीरच्या भूमीवरुनच पंडित प्रेमनाथ डोगरा आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी कश्मीर भारताचा अविभाज्य घटक असल्याचे सांगत, एकाच देशात, दोन प्रधान, दोन विधान( संविधान) आणि दोन निशान (राष्ट्रध्वज) अस्तित्वात राहू शकत नाही, यासाठी आंदोलन केले.
श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित प्रेमनाथ डोगरा यांनी जम्मू काश्मीरसाठी पाहिलेले स्वप्न, ‘एक प्रधान, एक राष्ट्रध्वज आणि एक विधान’ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाले आहे.
देशाला आणि देशातील नागरिकांच्या सुरक्षेला स्वत:पेक्षा महत्व आणि प्राधान्य देण्याची परंपरा सीआरपीएफ ने कायम ठेवली आहे, असे गौरवोद्गार अमित शाह यांनी काढले. हीच त्याग आणि बलिदानाची परंपरा, त्याच समर्पित वृत्तीने या दलाचे जवानही पुढे नेतील, अशी मला खात्री आहे, असे ते म्हणाले. देशातील युवा पिढीला देखील या जवानांचे समर्पण आणि त्यागाविषयी मोठा आदर आहे, असे अमित शाह म्हणाले. जिथे कुठेही संकटाची परिस्थिती असते, तिथे, जेव्हा सीआरपीएफ चे जवान पोहोचतात, तेव्हा, लोकांना पूर्ण विश्वास वाटतो, की आता ते परिस्थिती नियंत्रणात आणतील. या दलांचे कित्येक वर्षांचे परिश्रम आणि त्यांचा गौरवास्पद इतिहास यातूनच त्यांच्याविषयी हा विश्वास निर्माण झाला आहे, असे अमित शाह म्हणाले.
नक्षलग्रस्त भाग असो किंवा मग कश्मीरमधला पाकिस्तान-पुरस्कृत दहशतवाद असो, किंवा मग ईशान्य भागात अशांतता निर्माण करणाऱ्या शक्ती असोत, या सगळ्या संकटांच्या वेळी, सीआरपीएफ ने अत्यंत स्पृहणीय कामगिरी केली आहे, असे अमित शाह म्हणाले. देशाचे पहिले गृहमंत्री, पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी याच दिवशी, 1950 साली, सीआरपीएफला आपला ध्वज दिला होता. आज सीआरपीएफ देशातील सर्वात मोठे निमलष्करी दल असून त्यात 246 तुकड्या आणि 3.25 लाख सैनिक आहेत. त्यांच्या विश्वासार्हतेसाठी ते केवळ देशातच नाही, तर जगभरातील सर्व लष्करी दलांमध्ये ओळखले जातात, असेही गृहमंत्री यावेळी म्हणाले.
***
S.Patil/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1807308)
Visitor Counter : 284