वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

ओपन नेटवर्क डिजिटल कॉमर्स (ONDC) ई-कॉमर्सचे लोकशाहीकरण करेल आणि लहान व्यवसायांचे संरक्षण करण्यात मदत करेल – केंद्रीय मंत्री पीयूष गोयल


आपण आपला माहिती तंत्रज्ञान (IT) उद्योग ट्रिलियन-डॉलर पर्यंत नेण्याची आकांक्षा बाळगली पाहिजे – पीयूष गोयल

“शाश्वतपणे टिकून रहाण्याच्या आव्हानावर उपाय शोधल्याने पुढे मोठ्या व्यावसायिक संकल्पनांची निर्मिती होईल”

Posted On: 19 MAR 2022 2:28PM by PIB Mumbai

 

डिजिटल कॉमर्ससाठी ओपन नेटवर्क हे (ONDC) ई-कॉमर्सचे लोकशाहीकरण करेल आणि लहान व्यवसायांना समान संधी देऊन त्यांचे संरक्षण करेल; असे वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री, पीयूष गोयल यांनी आज सांगितले.

बिट्स पिलानी या शैक्षणिक संस्थेद्वारे आयोजित वार्षिक 'लाँचपॅड- द एन्टरप्रिनरशिप समिट, (Launchpad-The Entrepreneurship Summit)' या संमेलनाला ते आज संबोधित करत होते. बिट्स पिलानीचे माजी विद्यार्थी असलेल्या नानाजी देशमुख यांना श्रद्धांजली वाहताना गोयल म्हणाले, की त्यांचे जीवन आणि कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

ज्ञान ही सर्वोच्च शक्ती आहे’, हे बिट्सचे ब्रीदवाक्य, आजच्या ज्ञान अर्थव्यवस्थेच्या युगात पूर्वीपेक्षा अधिक समर्पक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. बिट्सच्या विद्यार्थ्यांनी नवनिर्माण आणि उद्योजकतेच्या जगात स्वतःचे नाव कमावले असल्याचे निरीक्षण नोंदवत गोयल पुढे म्हणाले की, भारतातील 10% युनिकॉर्नची स्थापना बिट्सच्या माजी विद्यार्थ्यांनी केली आहे.

पीयूष गोयल म्हणाले की, प्रयोगशाळा, मेंटरशिप, इनक्यूबेटर आणि निधी हे निरोगी स्टार्टअपसच्या विकासासाठी आवश्यक असे चार घटक आहेत आणि  बिट्समधील सेंटर ऑफ इनक्युबेशन, इनोव्हेशन अँड एंटरप्रिनरशिप (CIIE) या चारही गोष्टी उपलब्ध करतात.

त्यांनी बिट्सच्या लवचिक शैक्षणिक संरचनेची प्रशंसा केली ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन वर्षांमध्येच नवनिर्माण क्षमतेला पोषक वातावरण निर्माण होते आणि ते मोठ्या प्रमाणात सरकारने व्यापक सल्लामसलत केल्यानंतर सादर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाशी सुसंगत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

स्टार्टअप्सचा देशासाठी नाविन्यपूर्ण इंजिन असा उल्लेख करून केंद्रीय मंत्री म्हणाले की, आज आपण जगातील तिसरे सर्वात मोठे स्टार्टअप इकोसिस्टीम आहोत.  गेल्या  5 वर्षांत, डीपीआयआयटी (DPIIT) कडे नोंदणीकृत स्टार्टअपची संख्या 500 वरून 65,000 पेक्षा वर गेली आहे आणि देशात 90 पेक्षा जास्त युनिकॉर्न आहेत.

नवभारत हा नवीन ऊर्जा, उत्साह आणि आत्मविश्वासाने भरलेला आहे, असे सांगून गोयल पुढे म्हणाले, की तो यापुढे लहान सहान बदलांचा शोध घेत नाही तर त्याला परिवर्तनाची आस लागली आहे. आत्मनिर्भर भारत आता आपल्या सकारात्मक शक्तीने जगाशी जोडून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

फिनटेक, ॲग्रीटेक आणि मार्केटप्लेस यांसारख्या क्षेत्रात भारत मोठी झेप घेत आहे याबद्दल बोलताना गोयल म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी भारताच्या भविष्यासाठी IT + IT = IT (माहिती तंत्रज्ञान + इंडियन टॅलेंट = इंडिया टुमारो) हा मंत्र दिला आहे.  ते म्हणाले की, आपण आयटी आणि संबंधित उद्योगक्षेत्राला ट्रिलियन डॉलर्सवर नेण्याची आकांक्षा बाळगली पाहिजे.

डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात भारत अग्रेसर असल्याचे गोयल म्हणाले आणि स्मार्टफोन्सचा प्रवेश आणि डेटाची कमी किंमत यामुळे मोठ्या प्रमाणावर विघटनकारी नवकल्पनांना पायबंद घातला गेला आहे, असे ते म्हणाले. इंडियास्टॅक (IndiaStack), हेल्थस्टॅक (Healthstack), लॉजिस्टिक स्टॅक (Logistics Stack), कोविन (CoWIN) यासारख्या डिजिटल पायाभूत सुविधांसह, ट्रिलियन-डॉलरच्या कंपन्या भारतात येत्या काळात निर्माण होऊ शकतात, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

***

S.Thakur/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1807259) Visitor Counter : 226