माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

बंगबंधु शेख मुजीबुर रहमान यांच्या जीवनावरच्या 'मुजीब - द मेकिंग ऑफ ए नेशन' या भारत -बांगलादेश सहनिर्मित चित्रपटाचे पोस्टर जारी


मुजीब- द मेकिंग ऑफ नेशन माझ्यासाठी भावनात्मक चित्रपट राहिला, बंगबंधूंचे उत्तुंग जीवन पडद्यावर आणणे आव्हानात्मक काम- दिग्दर्शक श्याम बेनेगल

हा चित्रपट माझ्यासाठी आणि माझ्या देशासाठी किती महत्वाचा आहे याचे वर्णन शब्दात अशक्य असल्याची भावना चित्रपटात शेख मुजीबुर रहमान यांची भूमिका साकारणारे अभिनेते अरीफिन शुवो यांनी केली व्यक्त

Posted On: 17 MAR 2022 6:56PM by PIB Mumbai

मुंबई, 17 मार्च 2022

बांगलादेशचे  राष्ट्रपिता शेख मुजीबुर रहमान यांच्या जीवनावरचा ‘मुजीब-द मेकिंग ऑफ ए नेशन’ या चित्रपटाच्या पोस्टरचे प्रसिध्द दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी अनावरण केले. भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या दृकश्राव्य सह निर्मिती करारा अंतर्गत बंगबंधूच्या जीवनावरच्या या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. शेख मुजीबुर रहमान यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त, एनएफडीसी, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ, मुंबई इथे आज 17 मार्च 2022 ला  या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण झाले.

बंगबंधूच्या शतकमहोत्सवी जयंतीच्या कार्यक्रमात भारत आणि बांगलादेश यांनी शेख मुजीबुर रहमान यांच्या जीवनावरच्या चित्रपटाची घोषणा केली होती. मुजीब यांच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाची सांगता होत असताना, चित्रपटाची निर्मिती पूर्ण होत असल्याने या चित्रपटाचे  पोस्टर जारी करण्यात आले आहे.

या चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक श्याम बेनेगल म्हणाले की "शेख मुजीबूर रहमान यांचं उत्तुंग व्यक्तिमत्त्व पडद्यावर आणणे म्हणजे एक अतिशय अवघड कामगिरी होती. 'मुजीब– द मेकिंग ऑफ अ नेशन' हा सिनेमा माझ्यासाठी अतिशय भावनिक आहे, बंगबंधूंचे उत्तुंग आयुष्य चित्रपटाच्या रीळात साकारणे अतिशय कठीण काम आहे, आम्ही त्यांचे व्यक्तिमत्त्व कोणतीही तडजोड न करता चित्रित केले आहे. मुजीब भारताचे अतिशय जवळचे मित्र होते. प्रेक्षकांना हे पोस्टर पसंत पडेल अशी मला आशा आहे.

एनएफडीसी, इंडिया आणि बांग्लादेश फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्यासोबत सहकार्य करण्याविषयी ते म्हणाले, या चित्रपटावर काम करताना मला अतिशय आनंद झाला. एनएफडीसी सोबत काम करणे माझ्यासाठी या संस्थेच्या स्थापनेपासूनच फलदायी ठरले आहे आणि आता बीएफडीसी सोबत काम करणे देखील आनंदाचा अनुभव देत आहे.

एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र भाकर यांनी सांगितले, एनएफडीसीने जागतिक पातळीवर आजही आपली ओळख कायम ठेवणाऱ्या दिग्गज दिग्दर्शकांच्या चित्रपटांचा ठेवा दिला आहे. या चित्रपटासाठी पुन्हा एकदा श्याम बेनगलजींसोबत संस्थेचा संबंध येणे आमच्यासाठी अतिशय आनंददायी आहे. मुजीब- द मेकिंग ऑफ अ नेशन हा चित्रपट एनएफडीसीच्या इतिहासातला एक महत्त्वाचा चित्रपट ठरणार आहे. या अतिशय महत्त्वाच्या  चित्रपटासाठी बीएफडीसीला सोबत घेण्याचा अनुभव देखील अतिशय आनंददायी आहे.

बांगलादेश चित्रपट विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक नुझहत येस्मिन यांनी म्हटले आहे की, सूर्यप्रकाशाचा साक्षीदार असलेला चित्रपट पाहून मी भारावून गेले आहे. ‘मुजीब – द मेकिंग ऑफ ए नेशन’ ही आपल्यासाठी एक भावना आहे. बांगलादेश चित्रपट विकास महामंडळाच्या वतीने, मी आमच्या समपदस्थांचे (राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ) अभिनंदन करू इच्छिते ज्यांनी हे स्वप्न साकार करण्यासाठी आमची साथ दिली. श्याम बेनेगल जी यांच्या बंगबंधूंच्या चरित्राची आवृत्ती पाहण्याची बांगलादेश आतुरतेने वाट पाहत आहे. आपल्या सर्वांचेच आवडते ते एक दिग्गज चित्रपट निर्माते आहेत.

शेख मुजीबुर रहमानची भूमिका साकारणारे अभिनेते अरीफिन शुवो म्हणाले: मुजीबची भूमिका साकारताना मला खूप आकर्षण वाटले. हे एक स्वप्न सत्यात उतरले आहे. दिग्गज श्याम बेनेगल जी यांनी दिग्दर्शित केलेल्या या प्रतिष्ठित प्रकल्पाचा एक भाग होण्याचा मला सन्मान वाटतो. हा चित्रपट माझ्यासाठी आणि माझ्या देशासाठी किती मोठा आहे हे व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. भारतात चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान मला प्रेमळपणा आणि उत्तम आदरातिथ्य जाणवले. मला आशा आहे की मी या भूमिकेला न्याय दिला आहे आणि प्रेक्षक माझ्याशी जोडले जातील आणि बंगबंधूंवर जसे प्रेम करतात तसे ते या चित्रपटावरही करतील.

कोविड-19 महामारी दरम्यान सर्व आरोग्यविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून हा चित्रपट भारत आणि बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणावर चित्रित करण्यात आला. चित्रपटाची निर्मिती डिसेंबर 2021 मध्ये पूर्ण झाली.

शेख मुजीबुर रहमान - बांगलादेशचे राष्ट्रपिता

मुजीब यांनी, 1971 मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्याचे  राजकीय नेतृत्व केले. मुजीब त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर, महात्मा गांधींना भेटले होते. लोकांना सक्षम करण्याची मोठी  प्रेरणा त्यांना महात्मा गांधींजींकडून लाभली होती. ही प्रेरणा त्यांच्या संपूर्ण आयुष्यभर कायम राहिली. हा चरित्रपट मुजीब यांचे चरित्र आपल्या डोळ्यांसमोर उभे करतो, प्रेक्षकांसमोर इतिहासाचा तो कालखंड पुन्हा जिवंत करतो. हा चित्रपट अशा महान नेत्याचे चित्रण करतो ज्याची कर्तबगारी सिद्ध झाली आहे.

मुजीब यांचा जन्म एका प्रतिष्ठित मुस्लिम कुटुंबात झाला आणि अत्यंत धार्मिक आणि सौहार्दपूर्ण वातावरणात त्यांचे बालपण गेले. ते अतिशय दयाळू होते आणि गरिबांबद्दल त्यांना अपार सहानुभूती होती. ते हुसेन सुहरावर्दी यांचे प्रशंसक होते. पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान यांच्यातील असमानता, पूर्व पाकिस्तानला मिळणारी उपेक्षित वागणूक आणि पाकिस्तानी लष्करी राजवटीविरुद्ध त्यांनी संघर्ष केला. 1947 ते 1971 या कालावधीत त्यांना सुमारे 11 वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. "बांगलादेश" या स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्राच्या निर्मितीसाठी त्यांनी प्रयत्न केले आणि हे उद्दिष्ट साध्य केले. म्हणूनच मुजीब यांना बांगलादेशचे राष्ट्रपिता, ‘बंगबंधू’ म्हणून ओळखले जाते. ते एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होते. त्यांच्या भाषणांनी आणि धैर्याने बांगलादेशच्या इतिहासाची दिशाच बदलून टाकली.

'मुजीब - द मेकिंग ऑफ अ नेशन' या चित्रपटातील कलाकार-

बांगलादेशी चित्रपट अभिनेता आणि दूरचित्रवाणीवरील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व अरीफिन शुवो यांनी शेख मुजीबुर रहमान यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील इतर कलाकारांमध्ये नुसरत इमरोज तिशा, फजलुर रहमान बाबूचंचल चौधरी आणि नुसरत फारिया यांचा समावेश आहे. चित्रपटासाठी लेखन अतुल तिवारी आणि शमा जैदी यांनी केले आहे.

छायाचित्रण दिग्दर्शक - आकाशदीप; एडिटर - असीम सिन्हा; संगीत -.शंतनू मोईत्रा; कला दिग्दर्शन - विष्णू निषाद; ऍक्शन डायरेक्टर - शाम कौशल; कोरिओग्राफर -. मासुम बाबुल; वेशभूषाकार - पिया बेनेगल, सहायक दिग्दर्शक - दयाल निहलानी; प्रॉडक्शन डिझायनर - नितीश रॉय, कास्टिंग -  श्याम रावत आणि बहरुद्दीन खेलाँन  लाईन प्रोड्युसर - सतीश शर्मा.

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC)

भारतात उत्तम चित्रपटांच्या  चळवळीला चालना देण्याच्या  उद्देशाने भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे सन 1975 मध्ये राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. विविध भारतीय भाषांमध्ये देशभरात स्वतंत्र चित्रपटांचा विकासवित्तपुरवठा आणि  वितरण याला प्रोत्साहन देणारी  एक परिसंस्था निर्माण करण्यात  एनएफडीसीची एक महत्त्वाचे माध्यम आहे.

बांगलादेश चित्रपट विकास महामंडळाबाबत (बीएफडीसी)

1959 मध्ये पूर्व पाकिस्तान चित्रपट विकास महामंडळ म्हणून स्थापना झालेल्या या संस्थेचे नाव बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बांगलादेश चित्रपट विकास महामंडळ असे बदलण्यात आले. दरवर्षी 3 एप्रिल हा दिवस बांगलादेशचा राष्ट्रीय चित्रपट म्हणून साजरा केला जातो.हे  महामंडळ हा दिवस साजरा करते. या दिवशी पूर्व पाकिस्तानचे तत्कालीन उद्योग आणि वाणिज्य मंत्री शेख मुजीबुर रहमान यांनी पूर्व पाकिस्तान चित्रपट विकास महामंडळाची स्थापना करण्यासाठी विधेयक मांडले होते.

चित्रपटाची अधिकृत सोशल मिडिया अकाउंटस

https://www.instagram.com/mujibthefilm/

https://www.facebook.com/profile.php?id=100079113984212

https://twitter.com/mujibthefilm

 

  S.Tupe/Nilima/vasanti/Shailesh/Sonali/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1807008) Visitor Counter : 332