पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नव्याने निर्माण होत असलेल्या भू-राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार जागतिक उर्जा बाजारपेठ तसेच इंधन पुरवठ्यातल्या संभाव्य अडचणींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे

Posted On: 14 MAR 2022 4:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली 14 मार्च 2022

रशिया आणि युक्रेन यांच्यातील भू-राजकीय संघर्षामुळे जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या आणि नैसर्गिक वायूच्या दरात तीव्र वाढ झाली आहे अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी आज एका लेखी उत्तराद्वारे राज्यसभा सदस्यांना दिली.

रशिया आणि युक्रेन यांच्या दरम्यान निर्माण होत असलेल्या भू-राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार जागतिक उर्जा बाजारपेठ तसेच इंधन पुरवठ्यातील संभाव्य  अडचणींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे

इंधन समस्येचा वाढता तणाव लक्षात घेऊन, भारत सरकारने उर्जा क्षेत्रातील प्रमुख ग्राहकांशी विचार विनिमय करून समांतरपणे, नोव्हेंबर 2021 मध्ये देशाकडील पेट्रोलियमच्या धोरणात्मक राखीव साठ्यामधून 50 लाख बॅरल कच्चे तेल बाजारात आणायला संमती दिली होती.

इंधन बाजारातील दराची अस्थिरता कमी करण्यासाठी आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यास केंद्र सरकार तयार आहे.

पेट्रोल आणि डीझेलचे दर अनुक्रमे 26 जून 2010 आणि 19 ऑक्टोबर 2014 पासून बाजाराच्या नियंत्रणावर अवलंबून ठेवण्यात आले आहेत. तेव्हापासून, सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या त्यांच्या उत्पादनांचे जागतिक बाजारांतील दर, विनिमय दर, कर रचना, देशांतर्गत वाहतूक खर्च आणि खर्चाशी संबंधित इतर घटक लक्षात घेऊन पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत योग्य निर्णय घेत असतात. पेट्रोलियम उत्पादनांचे देशांतर्गत दर संबंधित उत्पादनांच्या जागतिक बाजारातील दरांशी निगडीत असतात.

केंद्र सरकारने 4 नोव्हेंबर 2021 पासून पेट्रोल आणि डिझेलवरील सीमा शुल्कात अनुक्रमे 5 आणि 10 रुपये प्रती लिटरची  कपात केली आहे. अर्थव्यवस्थेला आणखीला  गती देण्यासाठी तसेच या उत्पादनांचा वापर वाढविणे आणि महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि त्याद्वारे गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना मदत करण्यासाठी सरकारने ही उपाययोजना केली होती. अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांनी पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर देखील कमी केला.

देशातील एलपीजी अर्थात स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती, स्वयंपाकाच्या गॅसच्या दरासाठी आंतरराष्ट्रीय प्रमाणक असणाऱ्या  सौदी अरेबियाशी झालेल्या सीपी अर्थात करारातील दरावर आधारित असतात. एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2022 या काळात सौदी सीपी सुमारे 228% वाढला (236 अमेरिकी डॉलर्स प्रती दशलक्ष टन ते 775 अमेरिकी डॉलर्स प्रती दशलक्ष टन) मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनांच्या दरातील वाढीपासून सामान्य माणसाला सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र सरकार ग्राहकांना द्याव्या लागणाऱ्या  घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीत प्रभावी सुधारणा करत आहे.

S.Kane/S.Chitnis/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1805799) Visitor Counter : 206


Read this release in: English , Urdu , Bengali , Malayalam