ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

दर्जा नियंत्रण आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी, भारतीय मानक ब्युरोने 1032 प्रेशर कुकर आणि 936 हेल्मेट्स केली जप्त


सीसीपीएने जारी केलेली वैध आयएसआय मानांकन नसलेली इलेक्ट्रिक इम्मर्शन वॉटर हिटर, शिवणयंत्र, स्वयंपाकाच्या गॅसचे सिलेंडर, हेल्मेट आणि प्रेशर कुकर यांसारखी उपकरणे खरेदी करण्याबाबत ग्राहकांना सावध करण्यासाठी सुरक्षा सूचना जारी

Posted On: 12 MAR 2022 5:57PM by PIB Mumbai

 

केंद्र सरकारने अधिसूचित केलेल्या अनिवार्य मानकांचे उल्लंघन करून होणाऱ्या घरगुती वस्तूंच्या विक्रीविरुद्ध ग्राहकांना सावध करणारी सुरक्षा सूचना सीसीपीए अर्थात ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने जारी केली आहे.

ग्राहक संरक्षण कायदा 2019 मधील कलम 18 (2) (ज) अंतर्गत मिळालेल्या अधिकाराचा वापर करत सीसीपीएने सुरक्षा सूचना जारी करून ज्या घरगुती वापराच्या वस्तूंवर वैध आयएसआय चिन्ह नाही आणि ज्यांचे उत्पादन करताना केंद्र सरकारने जारी केलेल्या मानकांचे उल्लंघन केले आहे अशा वस्तू खरेदी करण्याविरुद्ध ग्राहकांना सावध केले आहे.

यापूर्वी, सीसीपीएने अनिवार्य मानकांचे उल्लंघन करून उत्पादित करण्यात आलेल्या हेल्मेट, प्रेशर कुकर आणि स्वयंपाकाचा गॅस यासारख्या वस्तू खरेदी करू नयेत म्हणून ग्राहकांसाठी 6 जानेवारी 2021 रोजी देखील सुरक्षा सूचना जारी केली होती. ग्राहक संरक्षण कायदा 2019 नुसार ज्या वस्तूंनी अनिवार्य मानकांची उल्लंघन केले आहे त्या वस्तू सदोषआहेत असे मानण्यात येईल.

प्राधिकरणाने आता जारी केलेली सूचना सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, औद्योगिक संघटना, कायदेविषयक सेवा देणारी प्राधिकरणे, ग्राहक संघटना आणि न्याय संस्थांमध्ये विस्तृतपणे प्रसारित करण्यात आली आहे.

चुकीची व्यवसाय पद्धती रोखण्यासाठी आणि ग्राहकांच्या हक्कांना संरक्षण, प्रोत्साहन देऊन त्यांची  अंमलबजावणी  करण्यासाठी सीसीपीएने अनिवार्य मानकांचे उल्लंघन करणाऱ्या वस्तूंची विक्री अथवा विक्रीसाठी पुरवठा करण्यासंबंधी प्रकरणांमध्ये लक्ष घालण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून कोणतीही व्यक्ती अनिवार्य मानकांची पूर्ती न करता अथवा बीआयएस या संस्थेने निर्देश दिल्यानुसार वैध परवाना नसताना घरगुती वस्तूंची विक्री करताना आढळल्यास अशा व्यक्तीला ग्राहक हक्कांचा भंग केल्याबद्दल आणि चुकीच्या पद्धतीने व्यवसाय केल्याबद्दल दोषी मानण्यात येईल आणि त्याच्यावर ग्राहक संरक्षण कायदा, 2019 अन्वये पुढील कारवाई करण्यात येईल.

सीसीपीएच्या मुख्य आयुक्त निधी खरे यांनी देखील स्वतःहून दखल घेत ई-वाणिज्य संस्था आणि अनिवार्य मानकांचे उल्लंघन करून प्रेशर कुकरची ऑनलाईन पद्धतीने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध कारवाईला सुरुवात केली आहे. अशा उल्लंघनांच्या संदर्भात यापूर्वीच 15 नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत. अशी प्रकरणे बीआयएस कायदा, 2016 अंतर्गत पुढील कारवाईसाठी बीआयएसकडे पाठविण्यात आल्या आहेत.

कोणीही व्यक्ती अशा प्रकारे बीआयएस मानकांचे उल्लंघन करून अशा वस्तूंचे उत्पादन अथवा विक्री करताना ग्राहकांच्या निदर्शनास आल्यास त्यांनी बीआयएस केयर मोबाईल द्वारे बीआयएसकडे तक्रार करावी अथवा https://www.services.bis.gov.in:8071/php/BIS_2.0/.  या ग्राहक व्यवहार पोर्टलवर नोंदवावी.

किंवा, राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनच्या 1800-11-4000 or 14404 या दूरध्वनी क्रमांकाचा वापर करून देखील ग्राहक अशा प्रकरणांची तक्रार नोंदवू शकतात.

***

R.Aghor/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1805361) Visitor Counter : 175