वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत- कॅनडा आपल्या दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार संपूर्ण क्षमतेने करण्याच्या दृष्टीने सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराच्या वाटाघाटी पुन्हा सुरु करणार
वस्तू आणि सेवांमधील व्यापाराला चालना देण्यासाठी भारत आणि कॅनडा अंतरिम करार किंवा सुरुवातीच्या टप्प्यातील व्यापार करार (EPTA) विचारात घेणार
प्रविष्टि तिथि:
11 MAR 2022 8:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मार्च 2022
भारत आणि कॅनडा दरम्यान व्यापार आणि गुंतवणूकविषयक मंत्रीस्तरावरील पाचवे चर्चासत्र आज आयोजित करण्यात आले. या चर्चेत वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल आणि कॅनडा सरकारच्या लघुउद्योग, निर्यात प्रोत्साहन आणि आंतराराष्ट्रीय व्यापार मंत्री मेरी एनजी यांनी भाग घेतला.
भारत आणि कॅनडामधील सर्वसमावेशक भागीदारी कराराच्या (CEPA) वाटाघाटी पुन्हा नव्याने सुरू करण्यावर आणि याशिवाय दोन्ही देशांना आर्थिकदृष्ट्या लाभदायक असलेल्या अंतरिम किंवा सुरुवातीच्या टप्प्यातील (EPTA) व्यापार करारही विचारात घेण्याबद्दल दोन्ही देशातील मंत्र्यांचे एकमत झाले. भारत आणि कॅनडामधील आता अस्तित्वात असलेली व्यापारपूरक तथ्ये दोघांनीही अधोरेखित केली आणि सध्या दोन्ही देशांदरम्यानची उत्पादने तसेच सेवांच्या द्विपक्षीय देवाणघेवाणीच्या व्यापाराला सर्व क्षेत्रात विस्तारित क्षमता उपलब्ध करण्याच्या दृष्टीने या व्यापार कराराच्या उपयुक्ततेवरही त्यांनी भर दिला. अंतरिम करारात उत्पादने, सेवा, उत्पादने जिथे तयार होतात तेथील नियम, स्वच्छता विषयक तसेच वनस्पती वा प्राणीसृष्टीला रासायनिक वा आरोग्यविषय़क धोक्याच्या दृष्टीने संबधित देशातील बंधने, व्यापारातील तंत्रज्ञानविषयक समस्या, वादविवादाची तड लावणे या संबधीच्या दोन्ही बाजूंना मान्य असलेल्या उच्चस्तरीय बांधिलकीबद्दल उल्लेख असेल.
इतर द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीच्या बाबींवर या बैठकीत चर्चा झाली. डाळीवरील रासायनिक कीडनियंत्रकांच्या व्यवस्थापनाबद्दलची जाणीव तसेच मका, बेबीकॉर्न, केळी इत्यादी भारतीय कृषी उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे यासंबधी कॅनडाच्या व्यवस्थेचा पवित्रा याबाबत दोन्ही देशांनी लक्ष्याधारित काम हाती घेण्याचे दोघांनीही मान्य केले. भारतातील सेंद्रीय उत्पादनांच्या निर्यातीस सहाय्य म्हणून भारताच्या अपेडा म्हणजेच कृषी व अन्न प्रक्रिया उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण या संस्थेला अनुरुपता निश्चिती संस्था हा दर्जा देण्याबद्दल प्राधान्याने विचार करण्याचे कॅनडाने मान्य केले.
भारत आणि कॅनडातील व्यापार व गुंतवणूक या संदर्भातील संबधांना व्यापक क्षमता मिळवून देण्याच्या उद्देशाने त्या क्षेत्रांदरम्यानचे बंध दृढ करणे आणि सहकार्य वृद्धींगत करणे या बाबींना निरंतर गती देण्याच्या उद्दिष्टावर काम करण्याचे दोन्ही मंत्र्यांनी मान्य केले.
S.Patil/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1805191)
आगंतुक पटल : 412