संरक्षण मंत्रालय
अस्थिर, अनिश्चित, गुतागुंतीच्या आणि संदिग्ध वातावरणाचा मुकाबला करण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धती शोधण्याचे संरक्षण सचिवांचे आवाहन
हिंद-प्रशांत लष्करी आरोग्य आदानप्रदान या चार दिवसीय परिषदेचा समारोप
Posted On:
10 MAR 2022 4:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 10 मार्च 2022
संरक्षण दलांच्या आरोग्य सेवा आणि अमेरिकेच्या हिंद-प्रशांत कमांडने संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या आयपीएमएचई अर्थात हिंद-प्रशांत लष्करी आरोग्य आदानप्रदान या चार दिवसीय परिषदेचा आज 10 मार्च 2022 रोजी समारोप झाला. समारोप प्रसंगी केंद्रीय संरक्षण सचिव डॉ.अजय कुमार यांनी निरोपाचे भाषण केले. ही परिषद आभासी पद्धतीने घेण्याची मर्यादा असताना देखील या परिषदेचे यशस्वीपणे आयोजन केल्याबद्दल दोन्ही संस्थांचे अभिनंदन करत त्यांनी अत्यंत टोकाच्या कठीण परिस्थितीत सैन्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष वेधले.
'अस्थिर, अनिश्चित, गुंतागुंतीच्या आणि संदिग्ध जगात (व्हियूसीए) लष्करी आरोग्य सेवेची भूमिका’ ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना होती. लष्करातील व्यक्तींकडून केल्या जाणाऱ्या औषधोपचार क्षेत्रात सहकार्य आणि संयुक्त कामगिरीची भावना वाढविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या आभासी परिषदेचे उद्घाटन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते 7 मार्च 2022 रोजी झाले. चार दिवसांच्या कालावधीत प्रतिनिधींनी परिचालन/लढ्याच्या वेळची आरोग्य सेवा, उष्णकटिबंधातील औषधे, युद्धक्षेत्रावरील शस्त्रक्रिया, युध्दक्षेत्रावर भूल देण्याची प्रक्रिया, हवाई आणि सागरी क्षेत्रातील वैद्यकीय आणीबाणी यांच्यासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. जगभरातील 38 हून अधिक देशांतील 600 पेक्षा जास्त भारतीय आणि परदेशी प्रतिनिधींनी या परिषदेत भाग घेतला.
सततचे संशोधन आणि प्रशिक्षण करून प्रत्येक क्षेत्रात स्वतःला अद्ययावत ठेवण्याच्या गरजेवर भर देत संरक्षण सचिवांनी या परिषदेत परिचालन/लढ्याच्या वेळची आरोग्य सेवा, कोविड-19 मुळे निर्माण झालेली आव्हाने, लष्करी आपत्ती ड्रील आणि व्हियूसीए जगात संशोधन आणि नवोन्मेष यांसारख्या विविध विषयांवर चर्चा घडवून आणल्याबद्दल आयपीएमएचई ची प्रशंसा केली. या परिषदेत मिळालेले ज्ञान सर्व भागधारकांना त्यांच्या संकटकाळासाठी उत्तम नियोजन करण्यात उपयुक्त ठरेल आणि व्हियूसीए वातावरणाशी सामना करताना त्यांना नाविन्यपूर्ण पद्धती शोधता येतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. सामायिक आणि अर्थपूर्ण शिक्षणासाठी आणि लष्करी औषधोपचार, मानवतावादी दृष्टीकोनातून मदत आणि आपत्ती निवारण यांच्याशी संबंधित समकालीन आणि सध्याच्या काळातील समस्या सोडविण्यासाठी जागतिक मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल आयपीएमएचईचे कौतुक करून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी भारताचा त्यांना पूर्ण पाठींबा असेल अशी ग्वाही त्यांनी दिली.
डॉ.अजय कुमार म्हणाले की, या आरोग्य व्यावसायिकांकडून लढाईच्या आणि संघर्षांच्या वेळी झालेल्या दुर्घटनांचे मूल्यमापन आणि योग्य हाताळणी यामुळे केवळ आजूबाजूच्या व्यक्तींवरच नव्हे तर संपूर्ण तुकडीच्या आणि साकल्याने देशाच्या धैर्यावर दीर्घकालीन परिणाम होतो. “वैद्यकीय सेवा म्हणजे लष्कराची एक महत्त्वाची पाठबळ देणारी शाखा आहे आणि ती शांतता आणि युद्ध अशा दोन्ही वेळेस दिशादर्शन करते. लष्करी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रतिबंधात्मक, निवारणात्मक आणि पुनर्वसनात्मक वैद्यकीय सेवा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावते,” ते पुढे म्हणाले.
परिषदेच्या शेवटच्या दिवशी, व्हियूसीए जगात वैद्यकीय सेवा देताना वैद्यकीय बुद्धीमत्तेच्या तुलनेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भूमिकेबद्दल भारतीय आणि अमेरिकेच्या तज्ञांमध्ये चर्चा झाली. नॅनोपार्टिकल तंत्रज्ञानावर आधारित नॉव्हेल सार्स-कोव्ही-2 लस विकसित करणाऱ्या पथकाचे प्रमुख अमेरिकेचे डॉ.कायोन मोदजार्ड यांनी संसर्गजन्य आजारांचे विविध प्रतिसाद आणि भविष्यात येऊ शकणाऱ्या महामारीचे व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन केले.
या परिषदेत भारत, अमेरिका आणि इंडोनेशिया या देशांतील निवडक संशोधकांना आंतरराष्ट्रीय मंचावर त्यांचा सर्वोत्कृष्ट शास्रीय शोध सादर करण्याची संधी देण्यात आली. यावेळी शास्त्रीय समितीने पोस्टर्स, मंच आणि संशोधनविषयक नवोन्मेष अशा विविध श्रेणीमधील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1804788)
Visitor Counter : 264