सांस्कृतिक मंत्रालय
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय यांच्यातर्फे “झरोखा” या अखिल भारतीय पातळीवरील भारतीय हस्तकला/ हातमाग, कला आणि संस्कृती यांच्यावर आधारित सर्वसमावेशक कार्यक्रमाचे आयोजन
भोपाळ येथे आज होत असलेल्या पहिल्या कार्यक्रमात स्त्रीत्वाचा आणि कला, हस्तकला तसेच संस्कृतीच्या क्षेत्रातील स्त्रियांच्या योगदानाचा उत्सव साजरा होत आहे
Posted On:
08 MAR 2022 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 मार्च 2022
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा भाग म्हणून केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय यांनी ‘झरोखा’ या भारतीय हस्तकला/हातमाग,कला आणि संस्कृती यांच्यावर आधारित सर्वसमावेशक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अखिल भारतीय पातळीवर साजरा होणार असलेला हा कार्यक्रम देशातील 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 16 ठिकाणी आयोजित केला जाईल.
झरोखा हा पारंपारिक भारतीय कलाकुसर, हातमाग, कला आणि संस्कृतीचा उत्सव साजरा करणारा सोहोळा आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून यातील पहिला कार्यक्रम आज 08 मार्च 2022 रोजी मध्य प्रदेशात भोपाळ येथे होत आहे. राणी कमलापती रेल्वे स्थानकावर हा कार्यक्रम होईल.
पहिल्या कार्यक्रमात स्त्रीत्वाचा आणि कला, कलाकुसर आणि संस्कृतीच्या क्षेत्रात स्त्रियांच्या योगदानाचा उत्सव साजरा होणार आहे. या कार्यक्रमातील सर्व स्टॉल महिला कारागीरांतर्फे उभारले जात आहेत ही या उत्सवाची खासियत आहे. या कार्यक्रमांचे उद्घाटन समाजासाठी आदर्शवत असणाऱ्या प्रख्यात कलाकार आणि पद्मश्री पुरस्कारप्राप्त महिलांच्या हस्ते होणार आहे. या महिला म्हणजे महिला सक्षमीकरणाचे झळाळते उदाहरण आहेत. झरोखा कार्यक्रमात त्यांचे सहभागी होणे इतर महिलांना पुढे येऊन विविध क्षेत्रात त्यांची बुद्धीमत्ता प्रदर्शित करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा केंद्र सरकारने प्रागतिक भारताच्या गेल्या 75 वर्षांच्या प्रवासाची आणि भारतीय जनता, त्यांची संस्कृती आणि कामगिरीचा वैभवशाली इतिहास यांचे स्मरण आणि उत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने सुरु केलेला उपक्रम आहे.
* * *
R.Aghor/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1804071)