महिला आणि बालविकास मंत्रालय

आंतरराष्ट्रीय महिला दिन 2022 समारंभ


राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘नारी शक्ती पुरस्कारां’चे वितरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘नारीशक्ती आणि विविध क्षेत्रांतील त्यांच्या कर्तबगारीला सलाम”

“आंतरराष्ट्रीय महिला दिन 2022 हा महिला नेतृत्वाखाली घडलेल्या विकासाचा उत्सव होऊ द्या”- केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती झुबीन इराणी

Posted On: 08 MAR 2022 5:08PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 मार्च 2022

 

आंतरराष्ट्रीय महिला दिन 2022 निमित्त, नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात झालेल्या विशेष समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 2020 आणि 2021 या वर्षांसाठीच्या ‘नारी शक्ती पुरस्कारां’चे वितरण करण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय आणि अभूतपूर्व यश मिळविणाऱ्या 29 महिलांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती आपल्या ट्विट संदेशात म्हणाले, “आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा! जीवनाच्या सर्वच आघाड्यांवर महिला अनुकरणीय योगदान देत आहेत.आपण आपल्या समाजातील महिलांना सुरक्षितता आणि आत्मसन्मान देण्यासाठी आणि त्यांच्यापैकी प्रत्येकीला आपापली स्वप्ने आणि आकांक्षा यांचा पाठपुरावा करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याचे वचन स्वतःला दिले पाहिजे.”

Image

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नारीशक्तीला सलाम केला आहे. ट्विट संदेशांच्या मालिकेत ते म्हणाले, “आजच्या महिला दिनाला मी आपल्या नारीशक्तीला आणि विविध क्षेत्रांतील त्यांच्या कर्तबगारीपुढे नतमस्तक होतो. महिलांना आत्मसन्मान तसेच संधी प्राप्त करून देण्यावर अधिक भर देत भारत सरकार विविध योजनांच्या अंमलबजावणीतून महिला सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करत आहे.” पंतप्रधान पुढे म्हणाले, “आर्थिक समावेशकतेपासून ते सामाजिक सुरक्षितता, दर्जेदार आरोग्य सुविधा आणि निवास व्यवस्था, शिक्षणापासून ते उद्योजकता अशा सर्वच बाबतीत नारी शक्तीला भारताच्या विकासविषयक प्रवासात आघाडीवर ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. येत्या काळात हे प्रयत्न आणखी जोमाने करण्यात येतील.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सहा वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून कच्छ येथील धोरडो येथे होत असलेल्या महिला संतांच्या शिबिरातील चर्चासत्राला संबोधित करतील. महिला संतांची समाजातील भूमिका आणि महिला सक्षमीकरणाप्रती त्यांनी दिलेले योगदान यांचा सन्मान करण्यासाठी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.सुमारे 500 हून अधिक महिला संत धोरडो येथील चर्चासत्राला उपस्थित असतील. ‘मन की बात’ कार्यक्रमाने नारी शक्तीचा उत्सव कशा प्रकारे साजरा केला आहे यावर प्रामुख्याने भर देणारा व्हिडीओ देखील पंतप्रधानांनी सर्वांसाठी सामायिक केला आहे.

पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्ली येथे 2020 आणि 2021 या वर्षांसाठीच्या नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधला. हा संवाद, महिलांच्या सक्षमीकरणासाठी पंतप्रधानांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांचाच भाग होता. समाजासोबतच त्या देशासाठीही योगदान देत आहेत, अशा शब्दात पंतप्रधानांनी पुरस्कार विजेत्यांनी केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल त्यांचे कौतुक केले. त्यांच्या कार्यात सेवाभावाबरोबरच नावीन्यही स्पष्टपणे दिसते, असे ते म्हणाले.  आता असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे महिलांनी आपला ठसा उमटवला नाही आणि देशाचा गौरव केला नाही असे ते म्हणाले.

“जगण्यासाठी रोज तेवढ्याच उत्साहाने प्रयत्न करणाऱ्या आणि रोज नवनवी शिखरे पादाक्रांत करणाऱ्या सर्व महिलांना शुभेच्छा. आंतरराष्ट्रीय महिला दिन, 2022 हा महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचा उत्सव होऊ द्या.” असे केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती झुबिन इराणी यांनी एका संदेशात म्हटले आहे. 

“पंतप्रधान, नरेंद्र मोदीजींनी, गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात, प्रत्येक मुलीची शाळेत नोंदणी सुनिश्चित करण्यासाठी शाळा प्रवेशोत्सव सुरू केला.  त्यांच्या आशीर्वादाने, आज आम्ही प्रत्येक तरुण मुलीला शिक्षण आणि कौशल्य मिळवता यावे यासाठी एक चळवळ सुरू केली आहे” असे आपल्या ट्विट संदेशांच्या मालिकेत, केंद्रीय मंत्री म्हणाल्या.

‘कन्या शिक्षण प्रवेश उत्सव’- हा “बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमाअंतर्गत, कुटुंबातील सदस्यांमधे जागरुकता आणण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल.  अंगणवाडी कर्मचार्‍यांना शाळाबाह्य किशोरवयीन मुलींचे
समुपदेशन आणि संदर्भासाठी देखील प्रोत्साहन दिले जाईल. महिला आणि बालविकास मंत्रालय 4 लाखांहून अधिक मुलींना शाळेत परत आणण्याचा आपला संकल्प नक्कीच पूर्ण करेल.” असेही त्यांनी पुढे सांगितले.

‘कन्या शिक्षण प्रवेश उत्सव अभियान; जास्तीतजास्त मुलींना शिक्षणाचा आनंद मिळवून देणारा एक अनुकरणीय प्रयत्न” असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले. प्रत्येक तरुणीला शिक्षण आणि कौशल्य मिळवता यावे यासाठी ही मोहीम आहे.

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती झुबिन इराणी यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे, की “जास्तीतजास्त मुलींना शिक्षणाचा आनंद मिळावा यासाठीचा हा एक अनुकरणीय प्रयत्न!  एक राष्ट्र म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन ही चळवळ यशस्वी करूया".


 

 

 

 

 

 

 

 

* * *

R.Aghor/Sanjana/Vinayak/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1804011) Visitor Counter : 221