विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
पुद्दुचेरी येथे हंसा -एनजी विमानाने समुद्र स्तरावरील चाचण्या यशस्वीरित्या केल्या पूर्ण
Posted On:
06 MAR 2022 6:48PM by PIB Mumbai
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या अंतर्गत बंगळुरूच्या सीएसआयआर -राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळेने डिझाइन केलेले आणि विकसित केलेले भारतातील पहिले स्वदेशी बनावटीचे प्रशिक्षण देणारे (फ्लाइंग ट्रेनर) विमान हंसा -एनजीने पुद्दुचेरी येथे 19 फेब्रुवारी ते 5 मार्च 2022 या कालावधीत समुद्र स्तरावरील चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत.
19 फेब्रुवारी 22 रोजी हे विमान 155 किमी/तास या वेगाने दीड तासात 140 नॉटिकल मैल अंतर कापून पुद्दुचेरीत दाखल झाले. समुद्र स्तरावरील चाचण्यांची सर्व उद्दिष्टे पूर्ण झाली असून पुदुच्चेरी येथे 18 तासांचे उड्डाण पूर्ण केल्यानंतर 5 मार्च 2022 रोजी हे विमान बंगळुरूमध्ये पुन्हा दाखल झाले, असे सीएसआयआर -राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळेच्या सूत्रांनी सांगितले. एएसटीईचे विंग कमांडर के. व्ही, प्रकाश आणि विंग कमांडर दिलीप रेड्डी या विमानाचे वैमानिक होते. सीएसआयआर -राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळेचे डिझायनर्स आणि विंग कमांडर रीजू चक्रवर्ती यांनी टेलीमेट्रीवरून विमान चाचणी संचालक म्हणून विमानाचे निरीक्षण केले.
हंसा-एनजी या प्रशिक्षण विमानाची रचना भारतीय विमान उड्डाण्णासंदर्भातील गरजा पूर्ण करण्यासाठी करण्यात आली असून कमी खर्च आणि कमी इंधन वापरामुळे, व्यावसायिक वैमानिक परवान्यासाठी (सीपीएल) हे एक आदर्श विमान आहे. राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळेला यापूर्वीच विविध फ्लाइंग क्लबकडून 80 पेक्षा जास्त इरादा पत्र (लेटर ऑफ इन्टेन्ट) प्राप्त झाली आहेत.
या विमानाची एकूण 37 उड्डाणे आणि 50 तासांचे उड्डाण पूर्ण झाले आहे आणि हवाई वाहतूक महासंचालनालयाद्वारे टाईप प्रमाणपत्र मिळण्यापूर्वी आणखी काही उड्डाणे आयोजित केली जातील. एप्रिल 2022 पर्यंत टाईप प्रमाणीकरण पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर सार्वजनिक/खाजगी उद्योगांसोबत उत्पादन सुरू केले जाईल यामुळे आत्मनिर्भर भारत अंतर्गत एरोस्पेस क्षेत्रातील कार्यक्षेत्र विस्तारेल, अशी माहिती सीएसआयआर-राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळेच्या संचालकांनी दिली.
***
S.Patil/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1803373)
Visitor Counter : 254