सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय एमएसएमई मंत्रालयातर्फे प्लॅस्टिकचा पुनर्वापर आणि कचरा व्यवस्थापनासंदर्भात महा शिखर परिषदेचे आयोजन आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष मोहिमेची सुरुवात

Posted On: 04 MAR 2022 4:07PM by PIB Mumbai

 

केंद्रीय एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री भानू प्रताप सिंग वर्मा यांनी आज प्लॅस्टिकचा पुनर्वापर आणि कचरा व्यवस्थापन या विषयावरील महाशिखर परिषदेचे उद्घाटन केले. अखिल भारतीय प्लॅस्टिक उत्पादक संघटनेच्या सहयोगाने केंद्रीय एमएसएमई मंत्रालयाने 4 आणि 5 मार्च 2022 या कालावधीत नवी दिल्ली येथे या परिषदेचे आयोजन केले आहे.

देशभरातील युवा वर्गामध्ये, विशेषतः आकांक्षी जिल्ह्यांमधील तरुणांमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय एमएसएमई मंत्रालयाने या परिषदेत संभवआणि स्वावलंबनअशा दोन विशेष उपक्रमांची सुरुवात देखील केली.

या मोठ्या आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेमध्ये तुमच्याकडील कचरा अथवा टाकाऊ गोष्टी जाणून त्यासाठी अचूक पद्धतीने केला जाणारा पुनर्वापर कसा योग्य ठरतो ते जाणून घ्या याच्या विवेचनावर अधिक भर देण्यात आला आहे. नवी दिल्ली येथे होत असलेल्या या दोन दिवसीय परिषदेत प्लॅस्टिकमुळे उभी ठाकलेली आव्हाने आणि प्लॅस्टिकने निर्माण केलेल्या संधी या बाबत सरकार तसेच उद्योग जगतातील राष्ट्रीय  आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध वक्ते उहापोह करणार आहेत. देशभरातील साडेतीनशेहून अधिक एमएसएमई उद्योग प्रत्यक्षपणे आणि एक हजारहून अधिक एमएसएमई उद्योगांचे प्रतिनिधी आभासी पद्धतीने या परिषदेत सहभागी होणार आहेत. त्याशिवाय, विविध देशांचे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी या महा परिषदेला आभासी पद्धतीने उपस्थित राहणार आहेत.

या परिषदेच्या उद्घाटन सत्रात उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री भानू प्रताप सिंग वर्मा म्हणाले, ही परिषद म्हणजे स्वच्छ भारत अभियानाच्या संकल्पनेवरील दृढ विश्वासासह एमएसएमई उद्योगांसाठी प्लॅस्टिकचे प्रभाव आणि शक्य त्या उपाययोजना यांच्यावर भागधारक तसेच या विषयातील तज्ञ मंडळी यांना एकत्र आणण्यासाठी तसेच प्लॅस्टिक उद्योग आणि पुनर्वापर क्षेत्र यांच्यामध्ये नव्या उद्योग संधी खुल्या करण्यासाठी एक परिणामकारक मंच आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी सोहोळ्याअंतर्गत सुरु असलेल्या विशेष सप्ताह उत्सवाचा भाग म्हणून एमएसएमई मंत्रालय त्यांच्या क्षेत्रीय कार्यालयांतर्फे देशातील 1300 महाविद्यालयांमध्ये 28 फेब्रुवारी 2022 ते 31 मार्च 2022 या कालावधीत वेबिनारच्या माध्यमातून संभवया राष्ट्रीय पातळीवरील जागृती कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. तसेच तरुण वर्गामधील उद्योजकतेला प्रोत्साहन देणे आणि मंत्रालयाच्या विविध योजना आणि उपक्रम यांच्याविषयी त्यांच्या जागरुकता निर्माण करणे या उद्देशाने मंत्रालयातर्फे देशातील 46 आकांक्षी जिल्ह्यांमध्ये स्वावलंबननामक विशेष मोहीम सुरु करून त्या अंतर्गत 200 नुक्कड नाटकांचे आयोजन करण्यात आहे.

या परिषदेत बोलताना एमएसएमई मंत्रालयाचे सचिव बी.बी. स्वेन यांनी सांगितले, प्लॅस्टिकचा पुनर्वापर हे या उद्योगात नवोन्मेष आणि शाश्वतता निर्माण करण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे.

***

N.Chitale/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1802946) Visitor Counter : 322