दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘तंत्रज्ञान आधारित विकास’ या विषयावर आयोजित अर्थसंकल्पोत्तर वेबिनारच्या उदघाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केले संबोधित

Posted On: 02 MAR 2022 10:03PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 मार्च 2022

 

केंद्रीय अर्थसंकल्प 2022 मध्ये अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणेची सुलभ प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी केंद्र  सरकार विविध क्षेत्रांशी संबंधित वेबिनार्स ची मालिका आयोजित करत आहे.

भारत सरकारच्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाच्या व विविध वैज्ञानिक विभागांच्या संयुक्त विद्यमाने भारत सरकारने ‘तंत्रज्ञान आधारित विकास’ या विषयावर आज  एक वेबिनार आयोजित केले होते . पंतप्रधानांच्या भाषणाने वेबिनारच्या उदघाटन सत्राची सुरुवात झाली.

या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारची आवश्यकता स्पष्ट करताना पंतप्रधान म्हणाले, “अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांची अंमलबजावणी त्वरित , सुरळीतपणे आणि नागरिकांना जास्तीत जास्त फायदा मिळवून देणारी व्हावी , यासाठी हा एक संयुक्त प्रयत्न आहे.”

पंतप्रधानांनी यावेळी अर्थसंकल्पातील उदयोन्मुख  क्षेत्रांवर दिलेला भर अधोरेखित केला. या क्षेत्रांमध्ये  कृत्रिम बुद्धिमत्ता , भू- अवकाशीय प्रणाली , ड्रोन ते सेमी कंडक्टर्स आणि अंतराळ तंत्रज्ञानापर्यंत , जीनोमिक्स, औषधोत्पादन  आणि स्वच्छताविषयक तंत्रज्ञानापासून  ते 5जी पर्यंतच्या अनेक क्षेत्रांचा समावेश आहे.

देशातील उत्पादनक्षमतेला चालना देण्यासाठी १४ महत्वाच्या क्षेत्रातील २ लाख कोटी रुपयांच्या उत्पादनाशी निगडीत  प्रोत्साहन योजनांचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. नागरिक सेवांमधील ऑप्टिकल फायबरचा वापर, ई कचरा व्यवस्थापन, चक्राकार अर्थव्यवस्था , इलेक्ट्रिक वाहतूक अशा काही क्षेत्रांसाठी त्या त्या क्षेत्रातील हितधारकांनी नवीन सूचना कराव्यात  असे ते म्हणाले.

या पॅनल चर्चेचा एक भाग म्हणून आत्मनिर्भरतेच्या विविध पैलूंमधील ५ जी दूरसंचार उपकरणे, त्यांचा येत्या १०-१५ वर्षांत होणारा आर्थिक प्रभाव, सुरक्षेशी जोडलेले मुद्दे आणि त्यांचा भारताला होणारा  फायदा, इत्यादी मुद्दे विचारात घेतले गेले. अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करताना या सहभागिनीं केलेल्या सूचनांचा आधार घेतला जाईल.

उत्पादन, स्पेक्ट्रम चा वापर, संशोधन व विकासात खाजगी क्षेत्राची  महत्वपूर्ण भूमिका आणि संरचना आधारित उत्पादन या महत्वाच्या मुद्द्यांना सर्वच सत्रांमधून अधोरेखित करण्यात आल्याचे निरीक्षण केंद्रीय रेल्वे, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव  यांनी वेबिनारचा समारोप करताना नोंदवले. उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना (PLI ) आणि बाजारपूर्व परवानगी (PMA) या योजनांचा उद्योगक्षेत्राने पुरेपूर लाभ घ्यावा आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनासाठी काही नवीन कल्पना सुचवाव्यात असे आवाहन त्यांनी केले.

 

* * *

N.Chitale/U.Raikar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1802462) Visitor Counter : 201