विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
भारतीय वंशाचे अनेक शास्त्रज्ञ परदेशातून भारतात परतण्यास उत्सुक आहेत आणि याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्माण केलेल्या पोषक वातावरणाला जाते- केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह
जैवतंत्रज्ञान विभागाच्या 36 व्या वर्धापनदिन सोहळ्यात डॉ. जितेंद्र सिंह यांचे मार्गदर्शन; “सुलभ विज्ञान अवलंबः किमान सरकार कमाल शासनाच्या दिशेने” नवे मार्गदर्शक नियम प्रसिद्ध
Posted On:
27 FEB 2022 6:53PM by PIB Mumbai
परदेशात असलेले भारतीय वंशाचे अनेक शास्त्रज्ञ सध्या मायदेशी परतण्यासाठी उत्सुक असल्याने सध्या भारताला रिव्हर्स ब्रेन ड्रेन प्रक्रियेचा अनुभव येत आहे आणि याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्माण केलेल्या पोषक वातावरणाला दिले पाहिजे, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), भूविज्ञान, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक आणि सार्वजनिक तक्रार निवारण, पेन्शन, अणुउर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले आहे. ते आज हरयाणामध्ये फरिदाबाद येथे प्रादेशिक जैवतंत्रज्ञान केंद्रात आयोजित केलेल्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या 36व्या वर्धापनदिन कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी सिंह यांनी “सुलभ विज्ञान अवलंबः किमान सरकार कमाल शासनाच्या दिशेने” यासाठी नवे मार्गदर्शक नियम देखील जारी केले आणि रामलिंगस्वामी रि- एन्ट्री फेलोशिप परिसंवादाचे उद्घाटन करताना रामलिंगस्वामी रि-एन्ट्री फेलोजसाठी एका डिरेक्टरीचे प्रकाशन केले. परदेशात काम करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञांना पुन्हा मायदेशी आणण्याच्या उद्देशाने रामलिंगस्वामी रि- एन्ट्री फेलोशिप ही 2006-07 मध्ये सुरू केलेली एक प्रतिष्ठेची योजना आहे.
36 व्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. जितेंद्र सिंह यांनी जैवतंत्रज्ञान विभागाचे अभिनंदन केले. गेल्या 36 वर्षात या विभागाने देशभरात जैवतंत्रज्ञान संशोधन आणि विकास, शिक्षण आणि नवोन्मेषावर मोठा प्रभाव निर्माण केला आहे, असे ते म्हणाले.
जैवतंत्रज्ञान विभागाने कोविड या संकटाचा वापर जगाला आपली क्षमता दाखवून देण्यासाठी केला, असे त्यांनी नमूद केले. जैवतंत्रज्ञानाच्या सर्व पैलूंचा विकास करण्यामध्ये आणि भावी काळात येऊ घातलेल्या जैवतंत्रज्ञानासाठी या विभागाने मोठे योगदान दिले आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी माउंट एव्हरेस्ट दोन वेळा सर करणाऱ्या पहिल्या महिला पद्मा संतोष यादव यांनी जैवतंत्रज्ञान विभाग वर्धापनदिन व्याख्यान दिले आणि उपस्थित शास्त्रज्ञ आणि सहकाऱ्यांना आपले गिर्यारोहणाचे अनुभव सांगितले.
***
S.Kane/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1801642)
Visitor Counter : 289