उपराष्ट्रपती कार्यालय

सर्वसमावेशक, न्याय्य आणि दर्जेदार शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क  : उपराष्ट्रपती


उपेक्षित विद्यार्थ्यांना सहाय्यकारी धोरणे आखण्याचे उपराष्ट्रपतींचे  खाजगी शाळांना  आवाहन

Posted On: 26 FEB 2022 5:50PM by PIB Mumbai

 

सर्वसमावेशक, न्याय्य आणि दर्जेदार शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे, यावर उपराष्ट्रपती, एम. व्यंकय्या नायडू यांनी आज भर दिला. उपेक्षित आणि गरजू मुलांना सहाय्यकारी  धोरणे आणण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी खाजगी शाळांना केले.  गरजू आणि उपेक्षितांसाठी प्राधान्याने  मदतीचा हात पुढे केला पाहिजे असे त्यांनी सांगितले.

बंगळुरू येथील ग्रीनवूड हाय इंटरनॅशनल स्कूल येथे आज बंदिस्त जागेत खेळल्या जाणाऱ्या खेळांसाठी क्रीडा संकुल आणि कलादालन : कला, नाटक आणि संगीतासाठी समर्पित विभागाचे उद्घाटन उपराष्ट्रपतींच्या हस्ते आज झाले. त्यानंतर ते उपस्थितांना संबोधित करत होते. युवावस्थेत समाजासाठी कार्य करण्याची वृत्ती विकसित करण्यासाठी  समाजसेवेचे बाळकडू मुलांना मिळावे यादृष्टीने शालेय अभ्यासक्रमातच त्याचा समावेश करावा यावर त्यांनी भर दिला.

शैक्षणिक संस्थांनी अभ्यास, खेळ, पाठ्य पूरक आणि मनोरंजनात्मक उपक्रमांना समान महत्त्व देण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी यावेळी केले.शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना बागकाम, वृक्षारोपण आणि जलसंधारण यासारख्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घ्यायला हवे, असे ते म्हणाले. यामुळे मुले निसर्गाच्या जवळ येतील असे सांगत त्यांनी पाण्याचा कमीत कमी वापर, पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया या त्रिसूत्रीवर  भर देत जलसंधारणाची गरज अधोरेखित केली.

राष्ट्रीय शिक्षण धोरण -2020 मध्ये पाठ्य पूरक उपक्रमांवर भर देण्यात आला आहे हे देखील त्यांनी अधोरेखित केले. विद्यार्थ्यांमध्ये खेळ, पाठ्य पूरक उपक्रम आणि  नैतिक मूल्ये रुजवण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन नायडू यांनी सर्व राज्यांना केले.

मूल्यांचा ऱ्हासाबद्दल चिंता व्यक्त करून उपराष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना आपली संस्कृतीविषयक मूल्ये आत्मसात करण्याचे आणि भारताच्या गौरवशाली सांस्कृतिक वारशाचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

***

N.Chitale/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1801408) Visitor Counter : 212