पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अर्थसंकल्पपश्चात वेबिनारचे केले उद्घाटन


"कोविनसारख्या मंचांनी जगात डिजिटल आरोग्य सुविधांच्या क्षेत्रात भारताचा नावलौकिक निर्माण केला आहे"

Posted On: 26 FEB 2022 11:10AM by PIB Mumbai

 

पंतप्रधानांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अर्थसंकल्पपश्चात वेबिनारचे आज उद्घाटन केले. पंतप्रधानांद्वारे संबोधित होत असलेल्या अर्थसंकल्पपश्चात वेबिनारच्या मालिकेतील हा पाचवा वेबिनार आहे. केंद्रीय मंत्री, सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील आरोग्य सेवा व्यावसायिक तसेच निम-वैद्यकीय क्षेत्र शुश्रुषा, आरोग्य व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि संधोधन क्षेत्रातील व्यावसायिक देखील या प्रसंगी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पंतप्रधानांनी भारताच्या आरोग्य यंत्रणेची कार्यक्षमता आणि अभियानाधारित स्वरूपाला साकार करणारी जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम यशस्वीपणे सुरु ठेवणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींचे अभिनंदन केले.

पंतप्रधान म्हणाले की, गेल्या 7 वर्षांपासून आरोग्यसेवा क्षेत्रात सुधारणा तसेच परिवर्तन घडवून आणण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांना या अर्थसंकल्पाने अधिक उभारी दिली आहे. आपण आपल्या देशातील आरोग्य यंत्रणेमध्ये समग्र दृष्टीकोन अंगिकारला आहे. आज आपण केवळ आरोग्यावरच नव्हे तर स्वास्थ्यावर देखील तितकेच लक्ष केंद्रित करत आहोत, असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले.

आरोग्य क्षेत्र अधिक सार्वत्रिक आणि समावेशी करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांना अधोरेखित करणाऱ्या तीन घटकांचा पंतप्रधानांनी उहापोह केला. पहिला घटक म्हणजे, आधुनिक वैद्यक शास्त्राशी संबंधित पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ यांचा विस्तार. दुसरा घटक म्हणजे आयुषसारख्या पारंपारिक भारतीय वैद्यक प्रणालीमधील संशोधनाला प्रोत्साहन आणि आरोग्य सेवा यंत्रणेत त्याचा सक्रीय सहभाग. आणि तिसरा घटक म्हणजे आधुनिक आणि भविष्यकालीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत आणि प्रत्येक भागापर्यंत किफायतशीर दरात आरोग्य सेवा पोहोचविणे.

प्राथमिक आरोग्य सेवेचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी देशभरात दीड लाख आरोग्य आणि स्वास्थ्य केंद्रे उभारण्यासंदर्भातील काम अत्यंत वेगाने सुरु आहे अशी माहिती पंतप्रधानांनी या कार्यक्रमात दिली. आतापर्यंत अशी 85,000 हून अधिक केंद्रे नागरिकांना नियमित तपासणी, लसीकरण तसेच वैद्यकीय चाचण्या करण्याची सुविधा पुरवीत आहेत. या केंद्रांमध्ये मानसिक समस्यांबाबत आरोग्य सेवा देखील सुरु करण्याविषयीची तरतूद या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे असे ते म्हणाले.

वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळ वाढविण्यासंदर्भात पंतप्रधान म्हणाले, आरोग्य सेवा क्षेत्रात मनुष्यबळाची वाढती मागणी लक्षात घेऊन त्यानुसार आरोग्यक्षेत्रात अधिकाधिक कुशल व्यावसायिक तयार करण्यासाठी देखील आम्ही प्रयत्नशील आहोत. म्हणूनच, आरोग्य क्षेत्रातील शिक्षण तसेच आरोग्यसेवा संबंधी मनुष्यबळाचा विकास यासाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी लक्षणीय वाढ करण्यात आली आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक आणि भविष्यकालीन तंत्रज्ञानाच्या मुद्द्यावर बोलताना पंतप्रधानांनी जगात डिजिटल आरोग्य सुविधांच्या क्षेत्रात भारताचा नावलौकिक निर्माण करणाऱ्या कोविनसारख्या मंचांची प्रशंसा केली. त्याच प्रमाणे आयुष्मान भारत डिजिटल आरोग्य अभियान देखील आरोग्यसेवा पुरवठादार आणि त्यांचे ग्राहक यांच्या दरम्यान सुलभ संवाद साधण्याचे कार्य करत आहे असे त्यांनी सांगितले.

महामारीच्या काळात दुर्गम भागात पुरविण्यात आलेल्या आरोग्यसेवा आणि टेलीमेडिसिन सेवा यांनी बजावलेल्या सकारात्मक भूमिकेचा पंतप्रधानांनी ठळकपणे उल्लेख केला. भारताच्या शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये आरोग्यसुविधांच्या उपलब्धतेच्या बाबतीत असलेली तफावत कमी करण्यामध्ये या विविध तंत्रज्ञानांच्या भूमिकेवर त्यांनी त्यांच्या भाषणात अधिक भर दिला. वैद्यकीय कारणांसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्याबद्दल देखील त्यांनी अधिक आग्रह धरला. 

भारतातील आयुष उपचारपद्धती जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणातील स्वीकारली जात आहे याकडे  पंतप्रधानांनी उपस्थितांचे लक्ष वेधले आणि जागतिक आरोग्य संघटना त्यांचे पारंपरिक औषधांचे एकमेव जागतिक केंद्र भारतात उभारणार असल्याबद्दल अभिमानाची भावना व्यक्त केली. आपण स्वतःसाठी तसेच संपूर्ण जगासाठी देखील आयुष पद्धतीद्वारे अधिक उत्तम प्रकारे उपचारप्रणाली निर्माण करू शकतो हे आता आपल्या कृतीवर अवलंबून आहे., असे पंतप्रधान पुढे म्हणाले.

***

S.Tupe/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1801329) Visitor Counter : 253