संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण मंत्रालयाने केला टी-90 प्रकारच्या रणगाड्यांसाठी 957 कमांडर औष्णिक प्रतिमादर्शक आणि डे साईट उपकरणांच्या पुरवठ्यासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडसोबत 1075 कोटी रुपयांचा करार

Posted On: 24 FEB 2022 8:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 फेब्रुवारी 2022

 

भारत सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाला संरक्षण क्षेत्रातर्फे आणखी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने संरक्षण मंत्रालयाच्या अधिग्रहण शाखेने टी-90 या लढाऊ रणगाड्यांच्या कमांडरसाठीच्या दृष्टी सुविधेमध्ये आधुनिकीकरणासाठीचे बदल करण्यासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स मर्यादीत (बीईएल) या कंपनीशी 1075 कोटी रुपयांचा करार केला आहे. या करारानुसार या कंपनीतर्फे भारतीय लष्करातील 957 टी-90 रणगाड्यांमध्ये हे बदल केले जाणार आहेत.

भारताच्या अत्यंत महत्त्वाच्या टी-90 या लढाऊ रणगाड्यांच्या कमांडरसाठीच्या दृष्टी सुविधेमध्ये रात्री पाहता येण्यासाठी नळीवर आधारित प्रतिमा रूपांतरण सुविधा आहे. भारतीय लष्कराने अपेक्षा व्यक्त केल्यानुसार सध्याच्या नळीआधारित दृष्टी सुविधेच्या ऐवजी भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि बेल ही कंपनी यांनी संयुक्तपणे मध्यम लहरींवर आधारित औष्णिक प्रतिमा तंत्रज्ञानावर आधारित दृष्टी सुविधा संरेखीत आणि विकसित केली.

या नव्या आधुनिक दृष्टी सुविधेमध्ये दिवसा आणि रात्री 8 किलोमीटर अंतरावरील लक्ष्य ओळखण्याची क्षमता असणारा औष्णिक प्रतिमा दर्शक  तसेच 5 किलोमीटरच्या कक्षेतील परिसर अचूकपणे न्याहाळण्यासाठी लेझर रेंजर शोधक बसविलेला आहे. या अत्याधुनिक सुविधांमुळे लढाऊ रणगाड्याची अधिक लांब अंतरावरील लक्ष्य हेरण्याची क्षमता वाढली आहे. क्षेपणास्त्र विषयक सॉफ्टवेअर आणि एलआरएफ यांनी केलेल्या सुधारणेमुळे, टी-90 रणगाड्याचे कमांडर लक्ष्य ओळखणे, त्यावर मारा करणे आणि ते नष्ट करणे या क्रिया विशिष्ट अचूकतेसह करू शकतील. स्वदेशी पद्धतीने विकसित करण्यात आलेल्या या सुविधेने प्रत्यक्ष युद्धक्षेत्रावरील कठोर मूल्यमापन चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत.

स्वदेशी पद्धतीने यशस्वीपणे विकसित आणि औष्णिक प्रतिमेवर आधारित कमांडरच्या नव्या दृष्टी सुविधेनेदेशातील संशोधन आणि विकास प्रक्रिया तसेच संरक्षण सामग्रीचे उत्पादन यांना आणखी उत्तेजन दिले आहे.


* * *

S.Thakur/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1800919) Visitor Counter : 307


Read this release in: English , Urdu , Hindi