सांस्कृतिक मंत्रालय
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा भाग म्हणून सांस्कृतिक मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा केला
'भारतातील आदिम आणि स्थानिक भाषा' वरील पुस्तक प्रकाशित
Posted On:
21 FEB 2022 9:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी 2022
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा भाग म्हणून नवी दिल्लीतील इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स येथे भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स (IGNCA) आणि युनेस्को नवी दिल्ली क्लस्टर ऑफिस यांच्या सहकार्याने आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 21 फेब्रुवारी रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा केला जातो. 2022 ची संकल्पना : "बहुभाषिक शिक्षणासाठी तंत्रज्ञानाचा वापर -आव्हाने आणि संधी", असून बहुभाषिक शिक्षणात प्रगती करण्यासाठी आणि दर्जेदार शिक्षणाच्या विकासाला समर्थन देण्यासाठी तंत्रज्ञानाच्या संभाव्य भूमिकेवर भर देण्यात आला आहे.
युनेस्को नवी दिल्ली क्लस्टर कार्यलयचे संचालक एरिक फाल्ट यांनी सांगितले की, जगभरातून दर दोन आठवड्यांनी एक भाषा लुप्त होत असून हा आपल्या सर्वांसाठी एक इशारा आहे. शिक्षण व्यवस्थेत आणि सार्वजनिक क्षेत्रात केवळ काही शेकडा भाषांनाच खऱ्या अर्थाने स्थान देण्यात आले आहे, आज डिजिटल जगात100 हून कमी भाषा वापरल्या जातात, असेही ते म्हणाले. एखाद्या भाषेची हानी भरून न येणारी आहे आणि यातूनच आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा करण्याची कल्पना पुढे आली .
प्रख्यात कवी, गीतकार आणि लेखक प्रसून जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . त्यांनी हलक्याफुलक्या विनोदाने, माहितीपूर्ण अनुभवांनी आणि त्यांच्या स्वतःच्या काही कवितांचे वाचन करून उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले की, मातृभाषा पुढे नेण्यासाठी युवा पिढीचा सहभाग महत्त्वाचा आहे.
आयजीएनसीएचे डीन प्राध्यापक रमेश ‘सी. गौर यांनी लिहिलेल्या ' भारतातील आदिम आणि स्थानिक भाषा’ यावरील पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
* * *
S.Thakur/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1800149)
Visitor Counter : 238