ऊर्जा मंत्रालय

वीज वितरण क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची क्षमता प्रदान करण्याच्या हेतूने केंद्रीय उर्जा मंत्र्यांनी पॉवरथॉन-2022 स्पर्धेची केली सुरुवात

Posted On: 07 FEB 2022 9:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी 2022

केंद्रीय उर्जा आणि नवीन तसेच नूतनीकरणीय उर्जा मंत्री आर.के.सिंग यांनी आज आभासी पद्धतीने उर्जा वितरण क्षेत्रासाठीच्या आरडीएसएस अर्थात सुधारित वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत  पॉवरथॉन-2022 नामक हॅकेथॉन स्पर्धेची सुरुवात केली. वीज वितरण क्षेत्रातील गुंतागुंत सोडविण्यासाठी आणि उत्तम दर्जाच्या तसेच विश्वसनीय वीज पुरवठ्याची सुनिश्चिती करण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजना शोधण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

याप्रसंगी केलेल्या बीजभाषणात केंद्रीय मंत्री आर.के.सिंग म्हणाले की उर्जा क्षेत्राला अशा कार्यक्रमाची अत्यंत गरज होती. या उपक्रमासाठी एक स्थायी स्वरुपाची आधिकारिक समिती नेमण्यात येईल आणि अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण संशोधन सतत सुरु राहील अशा पद्धतीने ही योजना राबविण्यात येईल. सद्यस्थितीत निर्माण होणाऱ्या समस्या सोडविण्यासाठीच नव्हे तर विश्वसनीय पद्धतीच्या वीज पुरवठ्यासाठी नव्या कल्पना आणि इतर समस्यांवरील उपाययोजना शोधण्यासाठीदेखील पुढे येण्याचे आवाहन करत केंद्रीय मंत्र्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रातील जाणकारांना प्रोत्साहित केले. या स्पर्धेत निवडल्या जाणाऱ्या नव्या कल्पना आणि संकल्पना यांना परवाने प्रदान करण्यात येतील आणि त्यांच्या नमुन्याबरहुकूम प्रत्यक्षात संकल्पना विकसनासाठी मदत केली जाईल.

आरईसी अर्थात ग्रामीण वीजपुरवठा महामंडळ आणि मुंबईची प्रमुख तंत्रज्ञानविषयक संस्था असलेल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेची एसआयएनई अर्थात नाविन्यपूर्ण संशोधन आणि उद्योजकता विषयक संस्था यांनी संयुक्त विद्यमाने आज पॉवरथॉन-2022 या हॅकेथॉन स्पर्धेची घोषणा करण्यात आली. यामध्ये तंत्रज्ञानविषयक उपायांचे पुरवठादार, स्टार्टअप्स, शैक्षणिक संस्था, संशोधनाशी संबंधित संस्था, विविध साधनांचे निर्माते, राज्यांतील वीज क्षेत्राशी संबंधित संस्था तसेच उर्जा क्षेत्राशी संबंधित असलेल्या  इतर राज्ये आणि केंद्र सरकारच्या संस्था यांना वीज वितरण क्षेत्रात सध्या अस्तित्वात असणाऱ्या समस्या तसेच आव्हाने यांच्याबाबत माहिती दिली जाईल आणि त्या सर्वांना या स्पर्धेत सहभागी होऊन वीज वितरण क्षेत्रातील  गुंतागुंतीच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांच्याकडील तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजना सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात येईल.

 

S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1796324) Visitor Counter : 232


Read this release in: English , Hindi , Bengali , Punjabi