रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मध्य रेल्वेच्या किसान रेल्वेगाडीची हजारावी फेरी रवाना

Posted On: 03 FEB 2022 9:25PM by PIB Mumbai

 

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर, केंद्रीय रेल्वे, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज वेबलिंकच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवून  मध्य रेल्वे विभागाच्या किसान रेल्वेगाडीची हजारावी फेरी रवाना केली. महाराष्ट्रातील सावदा येथून निघून दिल्लीतील आदर्श नगर येथे पोहोचणाऱ्या या गाडीला 23 डबे असून त्यात 453 टन केळ्यांची वाहतूक होणार आहे. मध्य रेल्वेच्या किसान रेल्वे द्वारे आतापर्यंत 3.45 लाख टन कृषी उत्पादनांची वाहतूक झाली आहे.

याप्रसंगी, उपस्थितांना संबोधित करताना, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर म्हणाले की, आपला देश कृषी प्रधान आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. फळे आणि भाज्या यांच्यासारख्या नाशिवंत शेतमालाला उत्तम भाव मिळण्यासाठी किसान गाड्यांच्या माध्यमातून किफायतशीर दरात दूर अंतरावरील बाजारात पोहोचविणे ही त्यापैकीच एक योजना आहे. ते म्हणाले की, पंतप्रधानांनी पहिल्या आणि शंभराव्या किसान रेल्वेगाडीला रवाना केले त्या दोन्ही प्रसंगी मी उपस्थित होतो. म्हणूनच आज मध्य रेल्वेच्या हजाराव्या किसान गाडीला रवाना करण्याच्या प्रसंगी उपस्थित राहताना मला अत्यंत आनंद होतो आहे. 

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच शेतकऱ्याला प्रत्येक उपक्रमाला केंद्रस्थानी ठेवले आहे आणि त्यांच्या भल्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल दूरवरच्या बाजारांमध्ये कमी वेळात आणि किफायतशीर दरात पोहोचविण्यासाठी किसान विशेष गाड्या सुरु करणे हा त्यापैकीच एक उपक्रम आहे. जळगावच्या केळ्यांना जीआय मानांकन मिळाल्याचा त्यांनी अत्यंत अभिमानाने उल्लेख केला. या कामगिरीबद्दल जळगावच्या शेतकऱ्यांचे अभिनंदन करत केंद्रीय मंत्र्यांनी त्यांना अधिक सुधारणेसाठीच्या सूचना सादर करण्याचे आवाहन केले.

केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाणकाम राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि खासदार  रक्षा खडसे यांनी देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी रेल्वे विभागाने सुरु केलेल्या या उपक्रमांचे कौतुक केले.

यावेळी, आमदार चंद्रकांत पाटील आणि आमदार शिरीष चौधरी सावदा रेल्वे स्थानकावर उपस्थित होते.

रेल्वे मंडळाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी व्हि.के.त्रिपाठी यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि किसान रेल्वेगाड्या सुरु केल्यापासून आतापर्यंतच्या या गाड्यांच्या परिचालनाविषयी तसेच या गाड्या छोट्या शेतकऱ्यांमध्ये कशा प्रकारे लोकप्रिय होत आहेत त्या विषयी थोडक्यात माहिती दिली. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी मुंबईहून सर्वांचे आभार मानले.

***

N.Chitale/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1795262) Visitor Counter : 264