नागरी उड्डाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वैमानिकांची कमतरता दूर करण्यासाठी उचलण्यात आलेली पावले

Posted On: 03 FEB 2022 7:15PM by PIB Mumbai

 

देशातील वैमानिकांची कमतरता दूर करण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने  (एएआय) एक मुक्त  हवाई प्रशिक्षण संस्था (एफटीओ) धोरण आणले आहे, या धोरणामध्ये विमानतळ स्वामित्वधन (एफटीओद्वारे एएआयला महसूल रकमेचा हिस्सा) ही संकल्पना रद्द करण्यात आली आहे आणि जमिनीचे भाडे लक्षणीयरित्या तर्कसंगत करण्यात आले आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने 31 मे 2021 आणि 29 ऑक्टोबर 2021 रोजी पाच विमानतळांवर म्हणजे  बेळगावी (कर्नाटक) येथे दोन, जळगाव (महाराष्ट्र) येथे दोन, कलबुर्गी (कर्नाटक) येथे दोनखजुराहो (मध्य प्रदेश) येथे दोन आणि लीलाबारी (आसाम) येथे एक अशा स्थापन केल्या जाणाऱ्या नऊ हवाई प्रशिक्षण संस्थांसाठी  देकार पत्रे जारी केली आहेत.

नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने  नोव्हेंबर 2021 पासून विमान देखभाल अभियंता (एएमई) आणि फ्लाइंग क्रू (एफसी) पदाच्या उमेदवारांसाठी मागणीनुसार ऑनलाइन परीक्षा (ओएलओडीई) सुरू केली आहे. ही सुविधा उमेदवारांना उपलब्ध परीक्षा रकण्यातून तारीख आणि वेळ निवडण्याची अनुमती देते.

हवाई प्रशिक्षण संस्थेमध्ये  हवाई कार्यान्वयनाला अधिकृत परवानगी देण्याचा अधिकार प्रदान करण्यासह हवाई प्रशिक्षकांना  सक्षम करण्यासाठी नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने  आपल्या नियमांमध्ये बदल केले आहेत.हे अधिकार आतापर्यंत केवळ  मुख्य हवाई प्रशिक्षक  (सीएफआय) किंवा उप  मुख्य हवाई प्रशिक्षक  यांच्यापुरते मर्यादित होते.

हिवाळ्यात कमी दृश्यमानतेमुळे होणारे गंभीर परिणाम लक्षात घेता, वैमानिकांच्या  उड्डाणाचे तास आणि विमानाचा वापर वाढवण्यासाठी, भारतातील सर्वात मोठी हवाई प्रशिक्षण  अकादमी असलेल्या  अमेठी (उत्तर प्रदेश) येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय हवाई प्रशिक्षण  अकादमीने   (आयजीआरयूए) गोंदिया (महाराष्ट्र) आणि कलबुर्गी (कर्नाटक) येथे वैमानिक  प्रशिक्षण घेण्याची परवानगी दिली आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय हवाई प्रशिक्षण  अकादमीने आठवड्याचे शेवटचे दिवस आणि सर्व सुट्ट्यांच्या दिवसात कार्यान्वयन सुरू केले आहे. त्यांनी  2021 या वर्षात  उड्डाणाचे 19,019 तास पूर्ण केले असून कोविड   पूर्व  2019 या  वर्षातील 15,137 तासांच्या तुलनेत हे तास  25% पेक्षा जास्त आहेत.

2021 मध्ये भारतीय हवाई प्रशिक्षण संस्थेद्वारे प्रशिक्षित व्यावसायिक वैमानिक परवानाधारकांची संख्या 504 आहे ,ही संख्या कोविड  पूर्व  2019 वर्षातील भारतीय हवाई प्रशिक्षण संस्थांद्वारे प्रशिक्षित केलेल्या 430 व्यावसायिक  वैमानिक परवानाधारकांच्या तुलनेत  अधिक  आहे.

नागरी हवाई  वाहतूक मंत्रालयाचे  राज्यमंत्री (जनरल (डॉ) व्ही. के. सिंह (निवृत्त) यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

***

S.Thakur/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1795187) Visitor Counter : 250


Read this release in: English , Urdu , Tamil , Telugu