नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
छतावरील सौर उर्जा प्रकल्पांसाठी आयआरईडीए आणि गोवा शिपयार्ड लि यांच्यात सामंजस्य करार
Posted On:
29 JAN 2022 6:32PM by PIB Mumbai
इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडने (IREDA) आज गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) सोबत छतावर सौर उर्जा प्रकल्प उभारण्यासाठी तांत्रिक-आर्थिक कौशल्य प्रदान करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या दोन्ही कंपन्या अनुक्रमे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक कंपन्या आहेत.
या सामंजस्य करारावर आयआरईडीएचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रदिप कुमार दास, आणि जीएसएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक कमोडोर भारतभूषण नागपाल,यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी केली.
या सामंजस्य कराराअंतर्गत, आयआरईडीए गोवा शिपयार्ड लिमिटेडला गोव्यातील वास्को द गामा, येथे कंपनीच्या मुख्यालयात छतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी मदत करेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकृत पर्यावरण आणि सामाजिक मानकांनुसार सौर आणि अन्य नवीकरणीय प्रकल्पांसाठी आयआरईडीए आपले तंत्रज्ञान-व्यावसायिक कौशल्य जीएसएलला पुरवेल. मुख्यालयाच्या इमारतीच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारल्यानंतर, जीएसएलला विजेवर होणारा खर्च आणि कार्बन उत्सर्जन कमी करता येईल.
या सहकार्याबाबत बोलताना आयआरईडीएचे व्यवस्थापकीय संचालक प्रदिप कुमार दास म्हणाले, "स्वच्छ ऊर्जा उपायाचा अवलंब करण्याच्या जीएसएलच्या प्रयत्नांमध्ये भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. या भागीदारीतून दोन्ही कंपन्यांच्या कौशल्याचा फायदा घेऊन चांगल्या पद्धती पुढे येतील आणि हरित ऊर्जेच्या माध्यमातून देशाच्या शाश्वत विकासासाठी पंतप्रधानांच्या संकल्पनेला चालना देता येईल. 2022 च्या अखेरीस छतावरील सौर ऊर्जेद्वारे 40 गिगावॅट सौर उर्जेचे उत्पादन करण्याचे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे आणि या सहकार्यामुळे केंद्र सरकारने ठरवून दिलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यास मदत होईल.
नवीकरण ऊर्जा क्षेत्राची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, आयआरईडीएने दीड वर्षांपूर्वी एक समर्पित व्यवसाय विकास आणि सल्लागार विभाग स्थापन केला होता. या नवीन विभागांतर्गत,नवीकरणीय ऊर्जा आणि ऊर्जा संक्रमणाच्या विकासकांसाठी सल्ला विषयक सेवा प्रदान करण्यासाठी आयआरईडीएने गेल्या 14 महिन्यांत स्वाक्षरी केलेला हा सातवा सामंजस्य करार आहे. याआधी, आयआरईडीएने SJVN, NHPC, TANGEDCO, NEEPCO, BVFCL आणि THDCIL सोबत हरित ऊर्जा प्रकल्पांसाठी तंत्रज्ञान-आर्थिक विषयक मार्गदर्शन करण्यासाठी सामंजस्य करार केले होते.
नवीकरण ऊर्जा क्षेत्राच्या सर्वांगीण वाढीसाठी आयआरईडीए इतर सार्वजनिक उपक्रम आणि खाजगी संस्थांना सल्ला विषयक सेवा पुरवण्यास उत्सुक आहे
***
Jaydevi PS/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1793521)
Visitor Counter : 292