महिला आणि बालविकास मंत्रालय
पंतप्रधान 24 जानेवारी रोजी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधणार
Posted On:
21 JAN 2022 10:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जानेवारी 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 जानेवारी 2022 रोजी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (PMRBP) विजेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. यावेळी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती झुबिन इराणी आणि राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई हे देखील उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी 11:30 पासून https://pmindiawebcast.nic.in वर वेबकास्ट केला जाईल.
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार हा भारतात राहणाऱ्या, 5 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना (संबंधित वर्षाच्या 31 ऑगस्ट रोजीचे वय) नवोन्मेष, शैक्षणिक कामगिरी, क्रीडा, कला आणि संस्कृती, समाजसेवा आणि शौर्य या 6 क्षेत्रांमध्ये अपवादात्मक क्षमता आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुलांना दिला जातो. प्रत्येक विजेत्याला एक पदक, 1,00,000/- रुपये रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र दिले जाते.
राष्ट्रपती भवनातील समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जातात. पंतप्रधान दरवर्षी या पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधतात. तसेच हे पुरस्कार विजेते दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनातही भाग घेतात. मात्र यंदा देशातील कोविड-19 ची परिस्थिती लक्षात घेऊन यावर्षी नवी दिल्ली येथे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करणे शक्य झालेले नाही. 24 जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार -2022 च्या विजेत्यांशी व्हर्चुअल संवाद साधतील.
कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान ब्लॉक चेन तंत्रज्ञान वापरून प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2022 च्या विजेत्यांना डिजिटल प्रमाणपत्रे देतील. या पुरस्कार विजेत्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी प्रथमच ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
* * *
S.Tupe/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1791677)
Visitor Counter : 242