पंतप्रधान कार्यालय

‘आझादी का अमृत महोत्सव से स्वर्णिम भारत की ओर’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 20 JAN 2022 11:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 जानेवारी 2022

 

नमस्कार, ओम शांति,

कार्यक्रमाला उपस्थित असलेले लोकसभा अध्यक्ष श्री ओम बिर्लाजी, राजस्थानचे राज्यपाल श्री कलराज मिश्र जी, राजस्थानचे मुख्यमंत्री श्री अशोक गहलोत जी, गुजरातचे मुख्यमंत्री श्री  भूपेंद्र भाई पटेल जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री किशन रेड्डी जी, भूपेंद्र यादव जी, अर्जुन राम मेघवाल जी, पुरषोत्तम रुपाला जी आणि श्री कैलाश चौधरी जी,राजस्थान विधानसभेतील विरोधी पक्षनेते श्री 

गुलाबचंद कटारिया जी, ब्रह्मकुमारीज चे कार्यकारी सचिव राजयोगी मृत्युंजय जी, राजयोगिनी भगिनी मोहिनी जी, भगिनी चंद्रिका जी, ब्रह्मकुमारीज़च्या इतर सर्व भगिनी, बंधू आणि भगिनींनो आणि इथे उपस्थित साधक-साधिका !

काही ठिकाणे अशी असतात, जिथे आपली स्वतःची एक वेगळी चेतना असते, उर्जेचा आपला एक वेगळा प्रवास असतो! ही ऊर्जा त्या महान व्यक्तींची असते, ज्यांच्या तपस्येमुळे वने, पर्वत देखील जागृत होतात, ते ही मानवी प्रेरणांचे केंद्र बनतात. माऊंट अबूचा प्रकाशही दादा लेखराज आणि त्यांच्या सारख्या अनेक व्यक्तिमत्वांच्या प्रेरणेने सातत्याने वाढत चालला आहे.

आज या पवित्र स्थळापासून ब्रह्मकुमारी संस्था ‘आज़ादी के अमृत महोत्सव से स्वर्णिम भारत की ओर’ या नावाने एक खूप मोठे अभियान सुरु होत आहे. या कार्यक्रमात स्वर्णिम भारतासाठीची भावना देखील आहे, साधना देखील आहे. यात देशासाठी प्रेरणा देखील आहे आणि ब्रह्मकुमारिंचे प्रयत्न देखील आहेत.

मी देशाच्या संकल्पामध्ये सहभागी होण्यासाठी, देशाच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी झटणाऱ्या ब्रह्मकुमारी परिवाराचे खूप खूप अभिनंदन करतो. आजच्या कार्यक्रमात दादी जानकी, राजयोगिनी दादी हृदय मोहिनी जी सशरीर आपल्यात उपस्थित नाहीत, त्यांना माझ्याप्रती खूप स्नेह होता, आजच्या या आयोजनात देखील त्यांचे आशीर्वाद मला जाणवत आहेत.

मित्रांनो,

जेव्हा संकल्पांना साधनेची जोड मिळते, जेव्हा मानवप्राण्यांविषयी आपला ममत्वभाव निर्माण होतो, आपल्या व्यक्तिगत उपलब्धीसाठी ‘इदं न मम्’ ही भावना जागृत होते, अशावेळी समजावे की आपल्या संकल्पांच्या माध्यमातून, एका नव्या कालखंडाचा प्रारंभ होणार आहे, एक नवी पहाट उजाडणार आहे. सेवा आणि त्यागाचा हाच ‘अमृतभाव’ आज अमृत महोत्सवाच्या काळात, नव्या भारतासाठी निर्माण झाला आहे. याच त्याग आणि कर्तव्यभावनेतून, कोट्यवधी देशबांधव आज स्वर्णिम भारताचा पाया रचत आहेत.

आमची आणि राष्ट्राची स्वप्ने वेगवेगळी नाहीत, आमचे खाजगी आणि राष्ट्रीय यश वेगवेगळे नाही. राष्ट्राच्या प्रगतीतच आमचीही प्रगती आहे. आमच्यामुळेच राष्ट्राचे अस्तित्व आहे, आणि राष्ट्रामुळेच आमचेही अस्तित्व आहे. ही भावना, हे ज्ञान, नव्या भारताच्या निर्मितीत आम्हा भारतवासीयांची सर्वात मोठी ताकद ठरते आहे.

आज देश जे काही करत आहे, त्यात सर्वांचे प्रयत्न अंतर्भूत आहेत. “सबका साथ, सबका विश्वास, और सबका प्रयास’ हा आता देशाचा मूलमंत्र ठरला ठरतो आहे. आज आपण अशी एक व्यवस्था निर्माण करतो आहोत, ज्यात भेदभावाला काहीही थारा नसेल, एक असा समाज निर्माण करतो आहोत, जो समानता आणि सामाजिक न्यायाच्या पायावर भक्कमपणे उभा असेल, आज आपण एका अशा भारताची उभारणी होतांना बघतो आहोत, ज्याचा विचार आणि दृष्टिकोन, दोन्ही नवे आहे, ज्याचे निर्णय प्रागतिक आहेत.

मित्रांनो,

भारताची सर्वात मोठी ताकद ही आहे, की आपल्यावर कुठलीही वेळ आली, कितीही अंध:कार निर्माण झाला, तरीही भारताने आपले मूळ स्वरूप कधीही हरवू दिले नाही, ते कायम ठेवले आहे. आपला युगायुगांचा इतिहास याचीच साक्ष देणारा आहे. सगळे जग जेव्हा अंध:काराच्या गडद छायेत होते. महिलांबाबत जगभरात जुनाट सनातनी विचारांच्या जोखडात जग जखडले होते, त्यावेळी भारतात, देवीच्या स्वरूपात मातृशक्तिची पूजा केली जात असे. आपल्याकडे गार्गी, मैत्रेयी, अनसूया, अरुंधती  आणि मदालसा यांसारख्या विदुषी समाजाला ज्ञान देत असत, संकटांची छाया असलेल्या काळरात्रीत देखील देशात, पन्नादाई आणि मीराबाई यांच्यासारख्या महान महिला देखील होऊन गेल्या. आणि अमृत महोत्सवात देश ज्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाचे स्मरण करत आहोत, त्यात देखील कितीतरी महिलांनी मोठा त्याग केला आहे, प्राणांची आहुति दिली आहे. कित्तूरच्या राणी चेनम्मा, मातांगिनी हाजरा, राणी लक्ष्मीबाई, वीरांगना झलकारी बाई यांच्यापासून ते सामाजिक क्षेत्रात, अहिल्याबाई होळकर यांच्यापासून ते सावित्रीबाई फुले यांच्यापर्यंत सर्व महिलांनी भारताची ओळख कायम ठेवली.

आज देश लाखो स्वातंत्र्य संग्राम सैनिकांसोबतच, स्वातंत्र्यलढ्यात नारीशक्तिच्या योगदानाचे स्मरण करत आहे आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचे प्रयत्न करत आहे. आणि म्हणूनच, आज सैनिकी शाळांमध्ये शिक्षण घेण्याचे मुलींचे स्वप्न देखील पूर्ण होत आहे. आता देशातील कोणतीही कन्या, राष्ट्र संरक्षणासाठी सैन्यात जाऊन महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडू शकते. महिलांचे आयुष्य आणि करियर दोन्ही एकत्र सुरु राहावे, यासाठी मातृत्व रजा वाढवण्यासारखे निर्णय देखील घेण्यात आले आहेत.

देशाच्या लोकशाहीत देखील महिलांची भागीदारी वाढते आहे. 2019 च्या निवडणुकांमध्ये आपण पाहिले, की कशाप्रकारे पुरुषांपेक्षा जास्त महिलांनी मतदान केले होते. आज देशातील सरकारमध्ये महिला मोठमोठ्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत.आणि सर्वात जास्त अभिमानाची बाब ही की समाजच, या बदलाचे स्वतः नेतृत्व करत आहे. अलीकडेच प्रसिद्ध झालेली आकडेवारी 'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ' अभियानाच्या यशाची पावती देणारी आहे. या अभियानामुळे, कित्येक वर्षांनी देशात स्त्री-पुरुष समानतेचे गुणोत्तर सुधारले आहे. हा बदल, या गोष्टीचे स्पष्ट संकेत देणारे आहे, की नवा भारत कसा असेल, किती सामर्थ्यवान असेल.

मित्रांनो,

आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपल्या ऋषींनी उपनिषदांमध्ये ‘तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मामृतं गमय' ही प्रार्थना केली आहे. याचा अर्थ आपण अंध:काराकडून प्रकाशाकडे वाटचाल करावी, मृत्यूकडून, त्रासाकडून अमृताकडे वाटचाल करावी. अमृत आणि अमरत्व याचा मार्ग, कुठल्याही ज्ञानाशिवाय प्रकाशमान होत नाही. म्हणूनच, हा अमृतकाळ आपल्यासाठी ज्ञान, संशोधन आणि नवोन्मेषाचा काळ आहे. आपल्याला असा भारत निर्माण करायचा आहे, ज्याची मूळे, आपल्या प्राचीन परंपरा आणि वारशाशी जोडलेली असावीत, आणि ज्याचा विस्तार, आधुनिकताच्या आकाशात अमर्याद पसरला असेल. आपल्याला आपली संस्कृती, आपली सभ्यता, आपले संस्कार जिवंत ठेवायचे आहेत. आपली आध्यात्मिकता, आपले वैविध्य यांचे संरक्षण आणि संवर्धन करायचे आहे. आणि त्यासोबतच, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य अशा व्यवस्था सातत्याने आधुनिक बनवायच्या आहेत.

देशाच्या या सर्व प्रयत्नांमध्ये, ब्रह्मकुमारी सारख्या आध्यात्मिक संस्थांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. आपण अध्यात्मासोबतच, शिक्षण, आरोग्य आणि कृषि यांसारख्या अनेक क्षेत्रात अनेक मोठमोठी कामे करत आहात,याचा मला अतिशय आनंद आहे. आणि आज, इथे ज्या अभियानाची सुरुवात होत आहे,  त्यातून हीच कामे पुढे जाणार आहेत. अमृत महोत्सवाच्या या काळात, आपण अनेक उद्दिष्टे निश्चित केली आहे. आपले ही प्रयत्न, देशाला नक्कीच, नवी ऊर्जा देतील, नवी शक्ति देतील.

देश आज, शेतकऱ्यांना समृद्ध आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी,  सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीच्या दिशेने प्रयत्न केले आहेत. खान-पान, आहाराची शुद्धता याविषयी आमच्या ब्रह्मकुमारी भगिनी समाजाला सातत्याने जागृत करत असतात. मात्र, गुणवत्तापूर्ण आहारासाठी गुणवत्तापूर्ण उत्पन्न देखील आवश्यक आहे. म्हणूनच, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी ब्रह्मकुमारी भगिनी, एक मोठी प्रेरणा बनू शकतात. या दिशेने काही गावांना प्रेरित करुन, असे मॉडेल्स विकसित केले जाऊ शकतात.

त्याचप्रमाणे, स्वच्छ ऊर्जा आणि पर्यावरणाच्या क्षेत्रातही जगाला भारताकडून खूप अपेक्षा आहेत.आज स्वच्छ ऊर्जेचे अनेक पर्याय विकसित होत आहेत. या संदर्भात देखील जनजागृतीसाठी एका मोठ्या अभियानाची गरज आहे. ब्रह्मकुमारीजने तर सौर ऊर्जेच्या क्षेत्रात तर सर्वांसमोर एक उत्तम उदाहरण ठेवले आहे.किती वर्षांपासून आश्रमात सौर ऊर्जेच्या इंधनातून अन्न शिजवले जात आहे. सौर ऊर्जेचा वापर अधिकाधिक व्हावा, यासाठीही आपण मोलाचे सहकार्य करु शकता. त्याचप्रमाणे, आपण सगळे, आत्मनिर्भर भारत अभियानाला देखील गती देऊ शकता. ‘व्होकल फॉर लोकल’ स्थानिक उत्पादने यांना प्राधान्य देत, या अभियानात देखील मदत करता येईल.

मित्रांनो,

अमृत काळ हा झोपेत स्वप्न पाहण्यासाठी नव्हे तर जागेपणी आपले संकल्प पूर्ण करण्यासाठी आहे. पुढली  25 वर्षे कठोर परिश्रम, त्याग आणि तपस्येची वर्षे आहेत. गुलामगिरीच्या शेकडो वर्षांमध्ये आपल्या समाजाने जे गमावले ते परत मिळवण्यासाठी हा 25 वर्षांचा कालखंड  आहे. त्यामुळे स्वातंत्र्याच्या  या अमृत महोत्सवात आपले लक्ष भविष्यकाळावर  केंद्रित असायला हवे.

आपल्या समाजात एक अद्भुत सामर्थ्य आहे. हा असा समाज आहे ज्यामध्ये जुनी आणि नित्यनूतन  व्यवस्था आहे. मात्र, कालांतराने व्यक्तीमध्ये तसेच समाजात आणि देशातही काही वाईट बाबींचा शिरकाव होतो, हे कोणीही नाकारू शकत नाही. जे लोक जागरूक असतात त्यांना या वाईट गोष्टी समजतात, ते या गोष्टींपासून  दूर राहण्यात यशस्वी होतात. असे लोक त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक ध्येय साध्य करू शकतात. आपल्या समाजाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात विशालताही आहे, वैविध्यही आहे आणि हजारो वर्षांचा  अनुभवही आहे. त्यामुळे बदलत्या युगाशी जुळवून घेण्याची एक वेगळी शक्ती, आंतरिक शक्ती आपल्या समाजात आहे.

आपल्या समाजाची सर्वात मोठी ताकद ही आहे की त्यात सुधारणा करणारे वेळोवेळी  समाजातूनच जन्म घेतात आणि समाजात प्रचलित  वाईट गोष्टींवर ते प्रहार करतात. समाजसुधारणेच्या सुरुवातीच्या काळात अशा लोकांना अनेकदा विरोधाला, कधी कधी तिरस्कारालाही सामोरे जावे लागते हेही आपण पाहिले आहे. पण अशी दृढनिश्चयी  माणसे समाजसुधारणेच्या कार्यापासून मागे हटत नाहीत, ते अविचल राहतात. कालांतराने, समाजालादेखील त्या व्यक्ती  समजतात,  समाज त्यांचा आदर करतो आणि त्यांची शिकवण  आत्मसात करतो.

मित्रांनो,

प्रत्येक युगाच्या कालखंडातील मूल्यांच्या आधारे समाजाला जागृत ठेवणे, समाजाला दोषमुक्त ठेवणे, हे अत्यंत आवश्यक आहे आणि ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्या काळात जी काही पिढी असेल, तिला ही जबाबदारी पार पाडावीच  लागते. वैयक्तिकरित्या आपण, संस्था म्हणून ब्रह्मकुमारीसारख्या लाखो संस्थादेखील हे कार्य करत आहेत. पण स्वातंत्र्यानंतरच्या  75   वर्षात आपल्या समाजात, आपल्या राष्ट्रात एका वाईट गोष्ट  सर्वांमध्येच घर करून राहिली, हेही मान्य करावे लागेल.  ही वाईट गोष्ट म्हणजे स्वतःच्या कर्तव्यापासून विचलित होणे, कर्तव्याला सर्वोच्च न ठेवणे. गेल्या 75 वर्षात आपण फक्त अधिकारांबद्दल   बोलत राहिलो, अधिकारांसाठीच संघर्ष करत राहिलो, भांडत राहिलो  आणि आपला वेळही  वाया घालवत राहिलो. अधिकाराची चर्चा, काही प्रमाणात, काही काळासाठी , एखाद्या विशिष्ठ  परिस्थितीत बरोबर  असू शकते, परंतु आपली कर्तव्येच  पूर्णपणे विसरणे, ही बाब भारताला कमकुवत ठेवण्यात मोठ्या प्रमाणात कारणीभूत राहिली आहे.

कर्तव्यांना प्राधान्य न दिल्याने भारताचा बराच वेळ वाया गेला आहे. या 75 वर्षात कर्तव्यापासून दूर राहिल्यामुळे जी दरी निर्माण झाली आहे,  केवळ अधिकारांच्या चर्चांमुळे समाजात आलेला कमकुवतपणा  येत्या 25 वर्षात आपण सर्व मिळून  कर्तव्यसाधनेद्वारे दूर करू  शकतो.

ब्रह्मकुमारीसारख्या संस्था येत्या 25 वर्षांसाठी निर्धार ठरवून भारतातील जनतेला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देऊन मोठा बदल घडवून आणू शकतात. माझी विनंती आहे की ब्रह्मकुमारी आणि तुमच्यासारख्या सर्व सामाजिक संस्थांनी या एकाच मंत्रावर काम केले पाहिजे आणि तो म्हणजे देशातील नागरिकांमध्ये कर्तव्याची भावना रुजवणे. लोकांमध्ये कर्तव्याची भावना जागृत करण्यासाठी तुम्ही सर्वांनी आपली शक्ती आणि वेळ द्यावा.  ब्रह्मकुमारीसारख्या संस्था अनेक दशकांपासून कर्तव्याचा मार्ग अवलंबत आहेत, तुम्ही  हे काम करू शकता. तुम्ही कर्तव्यभावना रुजलेले, कर्तव्य बजावणारे लोक आहात. त्यामुळे ज्या भावनेने तुम्ही तुमच्या संघटनेत काम करता, ती कर्तव्याची भावना समाजात, देशात, देशातील लोकांमध्ये रुजली पाहिजे, हीच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात तुमच्याकडून  देशाला मिळालेली सर्वोत्तम भेट  असेल.

तुम्ही एक गोष्ट  ऐकली  असेल. एका खोलीत अंधार होता, त्यामुळे तो अंधार दूर करण्यासाठी लोक आपापल्या परीने वेगवेगळे काम करत होते. कुणी काहीतरी करत होते , कुणी दुसरे काहीतरी करत होते. तेव्हा एका हुशार   माणसाने लहान दिवा लावला आणि  अंधार लगेचच नाहीसा झाला. अशीच शक्ती कर्तव्याची  आहे. अगदी लहानशा प्रयत्नाचीही अशीच ताकद आहे. आपण सर्वांनी देशातील प्रत्येक नागरिकाच्या हृदयात दिवा लावायचा आहे - कर्तव्याचा दिवा लावायचा आहे.

आपण सर्व मिळून देशाला कर्तव्याच्या मार्गावर पुढे नेले  तर समाजातील वाईट गोष्टीही  दूर होतील आणि देशही नव्या उंचीवर पोहोचेल. भारताच्या भूमीवर प्रेम करणाऱ्या , या भूमीला माता मानणाऱ्या, प्रत्येक व्यक्तीची  देशाला नव्या उंचीवर नेण्याची, कोट्यवधी लोकांच्या जीवनात  आनंद आणण्याचीच इच्छा असेल. त्यासाठी कर्तव्यावर भर द्यावा लागेल.

मित्रांनो,

आजच्या कार्यक्रमात मला आणखी एक विषय मांडायचा आहे. भारताची प्रतिमा मलिन करण्याचे वेगवेगळे प्रयत्न कसे केले जात आहेत याचे तुम्ही सर्वजण साक्षीदार आहात. यात आंतरराष्ट्रीय स्तरावरही बरेच काही चालू असते.  मात्र हे निव्वळ राजकारण आहे, असे सांगून आपण आपली जबाबदारी झटकू  शकत नाही. हा राजकारणाचा  नाही, हा आपल्या देशाचा प्रश्न आहे आणि आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव  साजरा करत असताना  जगाने भारताला योग्य रूपात  ओळखले पाहिजे ही आपली जबाबदारी आहे.

अशा संघटना ज्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर जगातील अनेक देशांमध्ये अस्तित्व आहे, त्यांनी भारताविषयीची योग्य माहिती  इतर देशांतील लोकांपर्यंत पोहोचवावी, भारताविषयी पसरवल्या जाणार्‍या अफवांमागचे  सत्य सांगावे, तिथल्या  लोकांना जागरूक करावे, हीसुद्धा आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. हे काम पुढे नेण्यासाठी ब्रह्मकुमारीसारख्या संस्था आणखी एक प्रयत्न करू शकतात. जिथेजिथे, ज्या देशांमध्ये  तुमच्या शाखा आहेत, तिथल्या  प्रत्येक शाखेतून दरवर्षी किमान 500 लोक भारतदर्शनासाठी यावेत असा प्रयत्न करा. त्यांनी भारत जाणून घ्यावा  आणि हे 500 लोक म्हणजे जे हिंदुस्थानातील लोक तिथे राहत आहेत ते नव्हे तर त्या देशाचे नागरिक असायला हवेत. मी मूळ भारतीयांबद्दल बोलत नाही.  विचार करा,  जर  अशा प्रकारे लोक आले, त्यांनी देश पाहिला, इथल्या गोष्टी समजून घेतल्या, तर ते आपोआप भारतातल्या चांगल्या गोष्टी  जगासमोर मांडतील. तुमच्या प्रयत्नांमुळे यात खूप  फरक पडेल. 

मित्रांनो,

दानधर्म करण्याची इच्छा प्रत्येकाला असते. पण एक गोष्ट विसरता कामा नये की परमार्थ आणि उद्दिष्ट एकत्र आल्यावर यशस्वी जीवन, यशस्वी समाज आणि यशस्वी राष्ट्र आपोआप निर्माण होऊ शकते. अर्थ आणि परमार्थ यांच्यातील सामंजस्याची  जबाबदारी नेहमीच भारताच्या आध्यात्मिक सत्तेकडे  राहिली आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, भारताची आध्यात्मिक सत्ता, तुम्ही सर्व भगिनी, ही जबाबदारी  परिपक्वपणे  पार पाडाल. तुमच्या या प्रयत्नांमुळे देशातील इतर संस्था आणि संघटनांना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात नवीन ध्येये निर्माण करण्यासाठी प्रेरणा मिळेल. अमृतमहोत्सवाचे बलस्थान हे लोकांचे मन, लोकांचे समर्पण आहे. तुमच्या प्रयत्नांनी भारताची वाटचाल आगामी काळात अधिक वेगाने सुवर्ण भारताकडे होईल.

या विश्वासाने , तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो !

ओम शांती!

 

* * *

M.Chopade/R.Aghor/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1791566) Visitor Counter : 441