पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

त्रिपुराच्या 50 व्या राज्य स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांचे भाषण


राज्यातील जनतेच्या ऐक्याची आणि सामूहिक प्रयत्नांची केली प्रशंसा

"दुहेरी इंजिन सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे त्रिपुरा संधींची भूमी बनत आहे"

"संपर्क संबंधी पायाभूत सुविधांच्या उभारणीद्वारे, राज्य वेगाने व्यापार कॉरिडॉरचे केंद्र बनत आहे"

Posted On: 21 JAN 2022 5:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 जानेवारी 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुराच्या स्थापना आणि विकासात योगदान दिलेल्या लोकांना अभिवादन केले.  माणिक्य राजवटीच्या काळापासून राज्याची प्रतिष्ठा आणि योगदान त्यांनी विशद केले. राज्यातील जनतेच्या ऐक्याची  आणि सामूहिक प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. ते आज त्रिपुराच्या 50 व्या राज्य स्थापना दिनानिमित्त बोलत होते.

पंतप्रधानांनी तीन वर्षांचा अर्थपूर्ण विकास अधोरेखित करत  सांगितले की, दुहेरी इंजिन सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे त्रिपुरा संधींची भूमी बनत आहे. विकासाच्या अनेक मापदंडांच्या बाबतीत राज्याची उत्कृष्ट कामगिरी अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की, संपर्क संबंधित पायाभूत सुविधांच्या उभारणीद्वारे राज्य वेगाने व्यापार कॉरिडॉरचे केंद्र बनत आहे. आज रस्त्यांबरोबरच रेल्वे, हवाई आणि अंतर्गत जलमार्गही त्रिपुराला उर्वरित जगाशी जोडत आहेत. दुहेरी इंजिन सरकारने त्रिपुराची दीर्घकाळ प्रलंबित मागणी पूर्ण केली आणि बांगलादेशातील चितगाव बंदरात प्रवेश मिळवला. 2020 मध्ये अखौरा एकात्मिक चेक पोस्ट द्वारे राज्यात बांगलादेशातून प्रथमच माल वाहतूक झाली. महाराजा बीर बिक्रम विमानतळाच्या अलीकडील विस्ताराचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला.

गरीबांना पक्की घरे उपलब्ध करून देणे आणि गृह बांधणीत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत राज्यात चांगले काम झाल्याची पंतप्रधानांनी दखल घेतली. हे लाइट हाऊस प्रकल्प (LHP) सहा राज्यांमध्ये सुरू आहेत आणि त्रिपुरा हे त्यापैकी एक आहे. ते म्हणाले की, गेल्या तीन वर्षातील कामे ही फक्त सुरुवात आहे आणि त्रिपुराच्या खऱ्या क्षमतेचा अद्याप पूर्ण वापर व्हायचा आहे. ते म्हणाले की, प्रशासनातील पारदर्शकतेपासून पायाभूत सुविधांच्या विकासापर्यंतच्या प्रत्येक क्षेत्रातील उपाययोजना पुढील दशकांसाठी राज्याला तयार करतील. सर्व गावांमध्ये लाभ आणि सुविधा पोहचवण्याच्या अभियानांमुळे त्रिपुरातील लोकांचे जीवन सुलभ आणि चांगले होईल, असे ते म्हणाले.

भारत स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण करेल, तेव्हा त्रिपुराही राज्य स्थापनेची 75 वर्षे पूर्ण करेल असे पंतप्रधान म्हणाले. "नवीन संकल्प आणि नवीन संधींसाठी हा उत्तम काळ आहे", असे पंतप्रधान पुढे म्हणाले.

 

 

 

 

 

* * *

S.Tupe/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1791532) Visitor Counter : 222