पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मणिपूरच्या 50 व्या राज्य स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांचे संबोधन

Posted On: 21 JAN 2022 5:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 जानेवारी 2022

 

खुरुमजरी !

नमस्कार

राज्य स्थापनेची 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त  मणिपुरवासियांचे खूप-खूप अभिनंदन !

मणिपुर एक राज्य म्हणून आज ज्या वळणावर पोहचले आहे, त्यासाठी अनेक लोकांनी तपस्या आणि त्याग केला आहे. अशा प्रत्येक व्यक्तीला मी आदरपूर्वक नमन करतो.  मणिपुरने मागील 50 वर्षांमध्ये अनेक चढ-उत्तर पाहिले आहेत. सर्व प्रकारचा काळ समस्त मणिपुरवासियांनी  एकजुटतेनिशी जगला आहे. प्रत्येक परिस्थितिचा सामना केला आहे. हीच मणिपुरची खरी ताकद आहे. तुमच्याबरोबर सहभागी  होऊन तुमच्या अपेक्षा, आकांक्षा आणि आवश्यकता याबाबत थेट माहिती घेण्याचा मागील 7 वर्षांमध्ये मी निरंतर प्रयत्न केला आहे. हेच कारण आहे की मी तुमच्या अपेक्षा, तुमच्या भावना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकलो आणि तुमच्या समस्या सोडवण्यासाठी नव्या उपाययोजना करू शकलो. मणिपुरला शांतता हवी आहे,  बंद- नाकाबंदी यापासून मुक्ती हवी हवी आहे.  मणिपूरवासियांची ही एक खूप मोठी आकांक्षा दीर्घकाळापासून आहे. आज मला आनंद होत आहे की  बीरेन सिंह यांच्या नेतृत्वाखाली मणिपुरच्या जनतेने हे साध्य केले आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर साध्य केले आहे. आज कुठल्याही भेदभावाशिवाय मणिपुरच्या प्रत्येक क्षेत्रापर्यंत, प्रत्येक वर्गापर्यंत विकास पोहचत आहे. माझ्यासाठी वैयक्तिकरित्या ही खूप आनंदाची बाब आहे.

मित्रांनो,

मला हे पाहून खूप आनंद होत आहे की आज मणिपूर आपल्या सामर्थ्याचा वापर विकासासाठी करत आहे. इथल्या युवकांचे सामर्थ्य जागतिक स्तरावर उजळून निघत आहे. आज जेव्हा आपण मणिपूरच्या मुला मुलींचा खेळाच्या मैदानावरचा उत्साह आणि कामगिरी पाहतो, तेव्हा संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावते. मणिपूरच्या युवकांची क्षमता पाहूनच या राज्याला देशाचे क्रीडा केंद्र बनवण्याचा विडा उचलला आहे. देशातील पहिले राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यामागे हाच उद्देश आहे . क्रीडा संबंधित प्रशिक्षण, क्रीडा व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाला प्रोत्साहित करण्यासाठी हा खूप मोठा प्रयत्न आहे.  केवळ क्रीडा नव्हे तर स्टार्टअप्स आणि उद्यमशीलतेच्या बाबतीतही मणिपूरचे युवक कमाल करत आहेत. यामध्ये तिथल्या युवतींची मुलींची भूमिकादेखील प्रशंसनीय आहे. मणिपूरकडे हस्तकलेची जी ताकद आहे ती समृद्ध करण्यासाठी सरकार कटिबद्धतेने काम करत आहे.

मित्रांनो,

ईशान्य प्रदेशाला ऍक्ट ईस्ट धोरणाचे केंद्र बनवण्याचा  संकल्प करून आपण पुढे जात आहोत, त्यामध्ये मणिपूरची भूमिका महत्त्वाची आहे. तुम्हाला पहिल्या पॅसेंजर रेल्वेसाठी पन्नास वर्षांची प्रतीक्षा करावी लागली.  एवढ्या मोठ्या कालखंडानंतर, अनेक दशकानंतर आज रेल्वेचे इंजिन मणिपूर मध्ये पोहोचले आहे. जेव्हा हे स्वप्न साकार होताना पाहतो, तेव्हा प्रत्येक मणिपरवासिय म्हणतो की डबल इंजिन सरकारची ही कमाल आहे. एवढ्या मूलभूत सुविधा पोहचण्यासाठी इतकी दशके लागली. मात्र आता मणिपूरच्या कनेक्टिव्हिटीवर वेगाने काम होत आहे. आज हजारो कोटी रुपयांच्या कनेक्टिविटी प्रकल्पांवर वेगाने काम सुरू आहे. यामध्ये जिरबम-तुपुल-इंफाल रेल्वेमार्गाचा देखील समावेश आहे. इम्फाळ विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आल्यामुळे ईशान्य प्रदेशांच्या राज्यांची कोलकाता, बंगळुरू आणि दिल्ली बरोबर हवाई कनेक्टिव्हिटी अधिक उत्तम झाली आहे. भारत म्यानमार थायलंड त्रिपक्षीय महामार्गावर देखील वेगाने काम सुरू आहे. ईशान्य प्रदेशात नऊ हजार कोटी रुपये खर्चून नैसर्गिक वायू पाईपलाईन टाकली जात आहे, त्याचा लाभही मणिपूरला मिळणार आहे

बंधू आणि भगिनींनो,

मणिपूरने गतिमान विकासाच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. ज्या अडचणी होत्या त्या आता दूर झाल्या आहेत. इथून आता आपण मागे वळून पाहायचे नाही. जेव्हा आपला देश आपल्या स्वातंत्र्याची शंभर वर्षे पूर्ण करेल तेव्हा मणिपूरला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळून 75 वर्ष पूर्ण होतील. मणिपूरसाठी देखील विकासाचा हा अमृत काळ आहे. ज्या दुष्प्रवृत्तींनी प्रदीर्घ काळ मणिपूरचा विकास रोखून धरला त्यांना पुन्हा डोकं वर काढण्याची संधी मिळणार नाही हे आपण लक्षात ठेवावं लागेल. आता आपल्याला येणाऱ्या दशकाच्या नवीन स्वप्नांसोबत नव्या संकल्पांसह पुढे जायचं आहे. मी विशेषतः युवक-युवतींना आवाहन करेन की तुम्ही आता पुढे यायचे आहे. तुमच्या उज्वल भविष्याबाबत मी खूप आश्वस्त आहे. विकासाच्या दुहेरी इंजिनसह मणिपूरला जलद गतीने पुढे न्यायचे आहे. मणिपूरच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद !

 

* * *

S.Tupe/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1791524) Visitor Counter : 225