श्रम आणि रोजगार मंत्रालय
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेचा वेतनपट प्रसिद्ध: नोव्हेंबर 2021 मध्ये 13.95 लाख सदस्यांची निव्वळ भर
Posted On:
20 JAN 2022 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जानेवारी 2022
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने 20 जानेवारी 2022 रोजी तात्कालिक वेतनपट प्रसिद्ध केला. नोव्हेंबर 2021 मध्ये ईपीएफओ मध्ये 13.95 लाख सदस्यांची निव्वळ वाढ झाल्याचे त्यात दिसून आले आहे. ऑक्टोबर 2021 मधील सदस्य संख्येपेक्षा 2.85 लाख इतकी वाढ झाली आहे. तर गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत नोव्हेंबर मध्ये वेतनपटात 3.84 लाख म्हणजेच सुमारे 10.11% इतकी निव्वळ वाढ झाली आहे.
निव्वळ भर पडलेल्या 13.95 लाख सदस्यांपैकी 8.28 लाख नवीन सदस्य, कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीच्या सामाजिक सुरक्षा कवच अन्तर्गत नोंदले गेले आहेत. अंदाजे 5.67 लाख सदस्य नोकरी बदलून बाहेर पडले आणि पुन्हा ईएपीएफओ मध्ये परतले आहेत.
वेतनपटाच्या आकडेवारीची वयानुसार तुलना करता 22-25 वर्षे वयोगटाने सर्वाधिक निव्वळ नोंदणी केली असून नोव्हेंबर 2021 मध्ये 3.64 लाखांची भर घातली आहे. 18-21 वर्षे वयोगटानेही अंदाजे 2.81 लाख नोंदण्यांची लक्षणीय भर घातली आहे. 18-25 या वयोगटांनी नोव्हेंबर मध्ये एकूण अंदाजे 46.20% सदस्यांची निव्वळ भर घातली आहे. या वयोगटांचे सदस्य सामान्यपणे नव्याने रोजगार मिळवू लागलेले असतात आणि व्यक्तिगत कमाईच्या दृष्टीने महत्त्वाच्या टप्प्यावर असतात.
वेतनपटाच्या आकडेवारीची राज्यनिहाय तुलना करता, महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमधील आस्थापना आघाडीवर असून त्यांनी नोव्हेंबर मध्ये अंदाजे 8.46 लाख सदस्यांची भर घातली आहे. एकूण निव्वळ भर बघता, हे प्रमाण 60.60 % इतके आहे.
लिंगनिहाय विश्लेषणात असे आढळले की, नोव्हेंबर मध्ये महिलांच्या नोंदणीची संख्या 2.95 लाख इतकी होती. ऑक्टोबर 2021 च्या तुलनेत यात 59,005 इतकी वाढ झाली आहे. एकूण निव्वळ भर बघता, महिला नोंदणीचा वाटा सुमारे 24.97% होता. उद्योगनिहाय विश्लेषण केले असता असे दिसते की, 'तज्ज्ञ सेवा' श्रेणी (मनुष्यबळ संस्था, सुरक्षाव्यवस्था पुरविणाऱ्या खासगी संस्था, लहान कंत्राटदार इ.) चा वाटा 41.48% इतका आहे. याखेरीज बांधकाम, वस्त्रोद्योग, शाळा , रेस्टॉरंट्स, सिमेंट सारख्या उद्योगांमध्ये वेतनपटात निव्वळ भर पडण्याचा कल वाढत चालल्याचे दिसून येते.
S.Kulkarni/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1791270)
Visitor Counter : 297