संरक्षण मंत्रालय
संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांच्या हस्ते शौर्यपदकांच्या पोर्टलवरील आभासी संग्रहालयाचे उद्घाटन
शूरवीरांच्या पराक्रम आणि त्यागाच्या गाथा संवादात्मक शैलीत होणार सादर
Posted On:
20 JAN 2022 6:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जानेवारी 2022
संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांच्या हस्ते दि.20 जानेवारी 2022 या दिवशी, शौर्यपदकांच्या पोर्टलवरील (https://www.gallantryawards.gov.in/ वरील) आभासी संग्रहालयाचे उद्घाटन झाले. शौर्यपदकांनी सन्मानित वीरांच्या पराक्रम, त्याग आणि वचनबद्धतेच्या गाथा या संग्रहालयात अभिनव पद्धतीने आणि पाहणाऱ्यास सोयीस्कर रीतीने सादर केल्या आहेत. संग्रहालयात फेरफटका मारण्याचा त्रिमितीय अनुभव, दीर्घिकेची वास्तू, लॉबी, वॉल ऑफ फेम, युद्धस्मारकांचा दौरा, युद्धकक्ष, संसाधन केंद्र, सेल्फी कट्टा, सामग्री प्रदर्शन आदींचा यामध्ये समावेश असेल. संरक्षण मंत्रालय, भारतीय संरक्षण सामग्री उत्पादकांची एसआयडीएम ही संस्था, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि भास्कराचार्य राष्ट्रीय अवकाश उपयोजन आणि भू-माहितीशास्त्र संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे आभासी संग्रहालय विकसित करण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त याची निर्मिती करण्यात आली आहे.
संरक्षण मंत्रालय आणि एसआयडीएमसहित या उपक्रमासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांच्या परिश्रमांचे यावेळी संरक्षण राज्यमंत्र्यांनी कौतुक केले. "देशसेवेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूरवीरांच्या योगदानाचा यथोचित सन्मान या आभासी संग्रहालयाच्या माध्यमातून होऊ शकेल. त्यांच्या शौर्याच्या गाथा सर्वसामान्य जनतेपर्यंत- विशेषतः तरुणांपर्यंत पोहोचतील." असे सांगून, 'या आभासी संग्रहालयामुळे अधिकाधिक लोकांना शौर्य पुरस्कारांच्या संकेतस्थळाला भेट देण्यास प्रोत्साहन मिळेल तसेच युवावर्गाला सैन्यदलात सामील होण्यास प्रेरणा मिळेल', असा विश्वासही भट्ट यांनी यावेळी व्यक्त केला.
"सैनिक म्हणजे, तरुण पिढीमध्ये देशभक्तीच्या शिकवणीचा प्रसार करणारे आणि तरुणाईला यशाच्या मार्गावर चालण्यास उद्युक्त करणारे आदर्श होत." असेही ते म्हणाले. आपल्या देशात संरक्षण क्षेत्रात संशोधन आणि विकास करण्यासाठी तसेच संरक्षण सामग्रीच्या निर्मितीसाठी परिश्रम घेतल्याबद्दल त्यांनी एसआयडीएमचे कौतुक केले.
या आभासी संग्रहालयाला भेट देणाऱ्यांना म्हणजे व्हिजिटर्सना लॉग इन करून आपली नोंदणी करता येईल. एखाद्या ठराविक शौर्य पुरस्काराने सन्मानित झालेल्या सर्व शूरांची माहिती एकत्र पाहता येईल आणि कस्टमाइज्ड म्हणजे व्यक्तिविशिष्ट पद्धतीने त्यांना श्रद्धांजलीही वाहता येईल. या आभासी संग्रहालयात समाविष्ट केलेल्या युद्धकक्षामध्ये या शौर्य पुरस्काराने गौरवित शूरांच्या पराक्रमाच्या कथाही पाहता येतील. तसेच स्फूर्तिदायी ध्वनिचित्रफितींचा संग्रह आणि सामग्री प्रदर्शनही यामध्ये अंतर्भूत आहे. संकेतस्थळावरील वैविध्यपूर्ण संग्रहातून आपल्या आवडीनुसार एखादी पार्श्वभूमी निवडून त्यासमोर सेल्फी काढण्याची संधीही या आभासी संग्रहालयातील सेल्फी कट्ट्यामुळे मिळू शकणार आहे.
M.Chopade/J.Waishampayan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1791250)
Visitor Counter : 247