सांस्कृतिक मंत्रालय
उत्तर प्रदेशातील बांदामधील लोखरी येथील मंदिरातून बेकायदेशीररित्या काढून नेण्यात आलेली बकरीचे शिर असलेल्या योगिनीची 10 व्या शतकातील दगडी मूर्ती देशाला परत करण्यात येणार आहे : केंद्रीय मंत्री जी.किशन रेड्डी
आपल्या देशाचा अधिकार असलेल्या कलाकृती परत आणण्याची प्रक्रिया सुरूच : केंद्रीय सांस्कृतिक मंत्री
Posted On:
15 JAN 2022 4:43PM by PIB Mumbai
उत्तर प्रदेशातील बांदामधील लोखरी येथील मंदिरातून बेकायदेशीररित्या काढून नेण्यात आलेली बकरीचे शिर असलेल्या योगिनीची 10 व्या शतकातील दगडी मूर्ती देशाला परत केली जाणार आहे अशी घोषणा केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री तसेच ईशान्येकडील भागाचे विकास मंत्री जी.किशन रेड्डी यांनी केली आहे. ट्विट संदेशाद्वारे ही घोषणा करताना केंद्रीय सांस्कृतिक मंत्री म्हणाले की आपल्या देशाचा अधिकार असलेल्या कलाकृतींच्या प्रत्यावर्तनाची प्रक्रिया सातत्याने सुरु आहे.
यापूर्वी, लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांनी म्हंटले होते की, वर्ष 1980 च्या सुमारास कधीतरी, उत्तर प्रदेशातील बांदामधील लोखरी येथील मंदिरातून बेकायदेशीररित्या काढून नेण्यात आलेल्या 10 व्या शतकातील वैशिष्ट्यपूर्ण दगडी मूर्तीची पुनर्प्राप्ती आणि परत आणण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याचे सांगतांना मला आनंद होत आहे.
ही शिल्पाकृती म्हणजे बकरीचे शिर असलेल्या योगिनीचे शिल्प असून वालुकाश्मापासून घडविण्यात आलेल्या देवतांच्या दगडी मूर्तींच्या समूहाचा भाग असलेली ही मूर्ती लोखरी येथील मंदिरात बसविण्यात आली होती.
1988 साली ही मूर्ती लंडनच्या कला बाजारात काही काळ आढळली होती. 2021 सालच्या ऑक्टोबरमध्ये भारतीय उच्चायुक्तांना लंडनजवळच्या एका खासगी निवासस्थानाच्या उद्यानात लोखरी येथील मूर्तींच्या वर्णनाशी जुळणारी बकरीचे शिर असलेल्या योगिनीची दगडी मूर्ती सापडल्याची माहिती देण्यात आली.
योगिनी म्हणजे उपासनेच्या तांत्रिक पद्धतींशी संबंध असलेल्या शक्तिरूपी स्त्री देवतांचा गट असतो. त्या बहुतेकदा 64 योगिनी अशा सामूहिक स्वरुपात पुजल्या जातात आणि त्यांच्या ठायी अमर्याद शक्ती असल्याचा भाविकांना विश्वास असतो.
मकर संक्रांतीच्या मंगल दिनी भारतीय उच्चायुक्तांना ही शिल्पाकृती मिळाली असून त्यांनी ती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या नवी दिल्ली येथील कार्यालयाकडे पाठवून दिली आहे.
***
R.Aghor/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1790184)
Visitor Counter : 252