वस्त्रोद्योग मंत्रालय
विणकर आणि कारागिरांना ई-कॉमर्स मंचांच्या माध्यमातून तसेच प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने जोडून घेण्याची गरज- पीयूष गोयल
उत्पादनांच्या विपणनासाठी दिल्ली हाट, अर्बन हाट्स आणि हातमाग हाट्स सारख्या सर्व मंचांच्या मार्फत विणकर आणि कारागीर यांना मदत केली पाहिजे
Posted On:
08 JAN 2022 5:12PM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, वस्त्रोद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांनी वस्त्रोद्योग मंत्रालय, त्याअन्तर्गत कार्यरत स्वायत्त संस्था आणि त्याच्या प्रशासकीय नियंत्रणात काम करणारे सार्वजनिक उपक्रम, यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. 'विणकर आणि कारागिरांना ई-कॉमर्स मंचांच्या माध्यमातून तसेच प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने तातडीने जोडून घेण्याची गरज' पीयूष गोयल यांनी यावेळी व्यक्त केली. "हातमाग आणि हस्तकला उद्योगातील रोजगारसंधींच्या वाढीसाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत", असेही ते म्हणाले. रेल्वे आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जर्दोश यांच्यासह वस्त्रोद्योग मंत्रालयाचे ज्येष्ठ अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते.
वस्त्रोद्योग क्षेत्र अतिशय वैविध्यसंपन्न असल्याने या बैठकीत अनेकविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
हातमाग आणि हस्तकला क्षेत्रातील रोजगारसंधींवर यावेळी विशेष भर दिला गेला. या क्षेत्रांतील योजनांच्या अंमलबजावणीवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. प्रक्रिया सोप्या सुटसुटीत करण्याचे तसेच पारदर्शकतेसाठी प्रभावी ऑनलाइन डॅशबोर्डवर आधारित देखरेख यंत्रणा सुरु करण्याचे निर्देश त्यांनी दिले. केंद्र सरकारच्या योजनांची परिणामकारकता वाढवण्यासाठी राज्य सरकारांतील अधिकारीवर्गाशी अधिक चांगल्या पद्धतीने संवाद साधावा, त्या दृष्टीने आभासी माध्यमातून राज्य सरकारांतील या क्षेत्राची जबाबदारी सांभाळणाऱ्या सचिवांचे चर्चासत्र घ्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. हस्तकौशल्य ग्रामांच्या प्रगतीचा आढावाही यावेळी घेण्यात आला. येत्या सहा महिन्यांत हे सर्व प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश गोयल यांनी दिले.
उत्पादनांच्या विपणनासाठी दिल्ली हाट, अर्बन हाट्स आणि हातमाग हाट्स सारख्या सर्व मंचांच्या मार्फत विणकर आणि कारागीर यांना मदत केली पाहिजे, यावर गोयल यांनी भर दिला. उपलब्ध ई-कॉमर्स मंचाच्या माध्यमातून विणकर आणि कारागिरांना जोडून घेण्याचा व त्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा सल्लाही गोयल यांनी यावेळी दिला.
***
S.Patil/J.Waishampayan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1788568)
Visitor Counter : 206