संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

निमास या संस्थेने फ्रान्समध्ये आयोजित केलेल्या भारताच्या पहिल्या बहुआयामी साहसी क्रीडा मोहिमेतील सदस्यांचा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून सन्मान

Posted On: 07 JAN 2022 4:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 जानेवारी 2022

 

संरक्षणमंत्री श्री राजनाथ सिंह यांनी आज  07 जानेवारी 2022 रोजी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग अँड अलाईड स्पोर्ट्स (NIMAS) यांनी फ्रान्समध्ये केलेल्या भारताच्या पहिल्या बहुआयामी साहसी क्रीडा मोहिमेत सहभागी झालेल्या सदस्यांना सन्मानित केले.  ही मोहीम नोव्हेंबर 2021 मध्ये आयोजित करण्यात आली होती आणि या समूहाचे नेतृत्व निमासचे संचालक कर्नल सर्फराज सिंग यांनी केले होते, ज्यात आठ लष्करी कर्मचारी आणि अरुणाचल प्रदेशमधील चार तरुण अशा 12 जणांचा -समावेश होता.

श्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीत उपस्थित असलेल्या चमुमधील काही सदस्यांशी संवाद साधला. त्यांनी त्यातील सदस्यांना प्रशस्तीपत्रके प्रदान केली आणि सदस्यांना कोणतीही दुखापत न होता ही मोहीम पूर्ण केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.  या संघाच्या प्रमुखांनी  बर्फात वापरली जाणारी कुऱ्हाड  संरक्षणमंत्र्यांना  भेट दिली.  यावेळी संरक्षण सचिव डॉ अजय कुमार आणि संरक्षण मंत्रालयातील  इतर अधिकारी उपस्थित होते.

या संघाने मोहीमेत आल्प्स पर्वत रांगांमध्ये 250 किलोमीटरहून अधिक मार्गावर बर्फात गिर्यारोहण केले. ज्यामध्ये फ्रेंच, स्विस आणि इटालियन आल्प्स रांगांचा समावेश असलेल्या टूर डी मॉन्ट ब्लँक ट्रेकचा समावेश होता.  पॅराग्लायडिंग टीमने वेगवेगळ्या पर्वतीय शिखरांवरून आल्प्सच्या मैदानावर 19  जंप्स/उड्डाणे केली.  त्यानंतर फ्रान्स, स्वित्झर्लंड आणि बेल्जियम मार्गे आल्प्स पर्वत रांगांपासून डंकर्कजवळील इंग्लिश खाडीपर्यंत 975 किलोमीटर मार्गावर सायकलिंग केले.  अत्यंत बर्फाळ वातावरणात संघाने कोणत्याही लॉजिस्टिक वाहनाशिवाय सरासरी एका दिवसात 9-10 तास सायकलिंग केले.

या बहु-आयामी मोहिमेचा समारोप भूमध्य समुद्रात 12 खोल स्कूबा डायव्हींग करून झाला. प्रत्येक मोहिमेच्या वेळी हवेत, जमिनीवर आणि पाण्याखाली  तिरंगी ध्वज  फडकवण्यात येत असे.  आवश्यक पात्रता आणि अनुभव असलेल्या संघ प्रमुखाने या मोहिमेदरम्यान आयोजित केलेल्या पर्वतारोहण, सायकलिंग, पॅराग्लायडिंग आणि स्कूबा डायव्हिंग  या चारही साहसी क्रीडा उपक्रमांमध्ये सहभाग घेतला.

'आझादी का अमृत महोत्सव' चा एक भाग म्हणून आयोजित  केलेल्या या मोहिमेला दिनांक 27 ऑक्टोबर 2021 रोजी संरक्षण राज्यमंत्री श्री अजय भट्ट यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केले होते. मोहीम पूर्ण झाल्यानंतर, भारताचे फ्रान्समधील राजदूत श्री जावेद अश्रफ यांनी पॅरिसमधील भारतीय दूतावासामधे संघाचा सत्कार केला होता. 

 

* * *

S.Patil/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1788346) Visitor Counter : 259