भूविज्ञान मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते भारतातील पहिल्या ‘ओपन रॉक’ संग्रहालयाचे उद्घाटन, देशातील विविध भागात 3.3 अब्ज वर्षांपासून ते 55 दशलक्ष वर्षे जुन्या असलेल्या 33 विविध प्रकारच्या खडकांचे संग्रहालयात प्रदर्शन
आजच्या ज्ञान-आधारित अर्थव्यवस्थांमध्ये “बिग अर्थ डेटा’ ला धोरणात्मक महत्त्व असून भारत या नव्या सुविधेचा सक्षमतेने वापर करत आहे- जितेंद्र सिंह
प्रविष्टि तिथि:
06 JAN 2022 8:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जानेवारी 2022
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह सध्या दोन दिवसांच्या हैदराबाद दौऱ्यावर गेले असून आज त्यांच्या हस्ते हैदराबाद इथे देशातील पहिल्याच, ‘ओपन रॉक’ म्हणजेच खुल्या खडक संग्रहालयाचे उद्घाटन झाले. त्यानंतर, डॉ सिंह यांनी सीएसआयआर- राष्ट्रीय भू-भौतिक संशोधन संस्थेत आयोजित कार्यक्रमात, हैदराबाद इथल्या वैज्ञानिकांसमोर भाषण केले.

सर्वसामान्य लोकांना, माहिती नसलेल्या अनेक गोष्टींविषयी त्यांना शिक्षित करण्यासाठी आणि त्यांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी हे विशेष संग्रहालय स्थापन करण्यात आले आहे, य संग्रहालयात, देशाच्या विविध भागातून आणलेले 35 प्रकारचे खडक असून, पृथ्वीच्या इतिहातील त्यांचे वय 55 दशलक्ष वर्षे ते 3.3 अब्ज वर्षे इतक्या काळातले आहे. तसेच, यातले काही खडक, पृथ्वीच्या गर्भात 175 किमी खोलवरचे आहेत तर काही पृथ्वीच्या पृष्ठभागावरील आहेत.

यावेळी,वैज्ञानिकांशी संवाद साधतांना डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की.आजच्या ज्ञान-आधारित अर्थव्यवस्थांमध्ये, “बिग अर्थ डेटा” म्हणजे पृथ्वीशी संबंधित माहिती आणि आकडेवारीला अत्यंत महत्त्व आले असून, या आघाडीवर, भारत देखील मोठे योगदान देत आहे. पृथ्वी विज्ञानात भारताने केलेल्या प्रगतीचा त्यांनी उल्लेख केला. नव्या भारतात, आत्मनिर्भर होण्यासाठी भू-विज्ञानाची देशाला मोठी मदत मिळत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

विज्ञानाची अभिनव प्रयोगांशी सांगड घतली तर सर्वसामान्य माणसांचे आयुष्य अधिक सुकर आणि सुखकर करता येईल, असे सांगत वैज्ञानिकांनी यासाठी चाकोरीबाहेरचा विचार करण्याची पद्धत अवलंबवावी, जेणेकरुन, सर्वसामान्य लोकांच्या समस्या विज्ञानाच्या मदतीने सोडवता येतील, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी, जितेंद्र सिंह यांच्या हस्ते, लखनौ आणि देहरादून शहरांसाठी भूकंप धोका मापन नकाशाचेही प्रकाशन करण्यात आले.
हे दोन्ही नकाशे उत्तर प्रदेश आणि उत्तरखंडच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाला देण्यात आले आहेत.
S.Kane/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1788162)
आगंतुक पटल : 371