गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयाकडून भू-अवकाशीय माहिती आव्हान 2022 चा प्रारंभ

Posted On: 31 DEC 2021 9:04PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 डिसेंबर 2021

 

भारतातील शहरी परिसंस्थेमध्ये नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जिओस्पाशल अर्थात भौगोलिक स्थान आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात असलेल्या विविध गोष्टींची माहिती सहजतेने उपलब्ध करून देणाऱ्या तंत्रज्ञानाचा अंगिकार करण्यासाठी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने एका स्पर्धेचे आयोजन केले आहे. अर्बन जिओस्पाशल डेटा स्टोरीज चॅलेंज असे या स्पर्धेचे नाव आहे. उच्च दर्जाची भौगोलिक माहिती देणाऱ्या प्रणालीचे( जीआयएस) डेटासेट्स उपलब्ध करणाऱ्या निवडक स्मार्ट शहरांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय जिओस्पाशल संस्था, खाजगी क्षेत्रातील उपक्रम, वैज्ञानिक आणि शैक्षणिक संस्था, व्यवसाय, ग्राहक सेवा आणि स्टार्ट अप्सकडून या डेटाचे विश्लेषण करण्यासाठी आणि तपशीलवार आणि अचूक माहिती देणाऱ्या डेटा स्टोरीज तयार करण्यासाठी  नोंदणीकृत सहभागींना 1000 जिओस्पाशल डेटासेट्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत. नोंदणीकृत सहभागींसाठी या स्पर्धेचा प्रारंभ एक जानेवारी 2022 पासून होणार असून जानेवारी महिन्याच्या अखेरीला तिचा समारोप होईल.

भू-अवकाशीय धोरणाला प्रोत्साहन देणे आणि भारताला भू-अवकाशीय सुसज्ज देश बनवणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे. विविध प्रकारच्या माहितीची देवाणघेवाण आणि एकात्मिकरण करून नागरिकांना आणि उद्योगांना सक्षम केल्यामुळे ते भौगोलिक स्थाने आणि इतर प्रकारच्या स्थानांची माहिती सहजपणे मिळवू शकतील आणि शहरांमधील विविध सेवांचा आणि ऍप्लिकेशन्सचा अतिशय प्रभावी आणि कार्यक्षम पद्धतीने वापर करू शकतील. खुला नवोन्मेष आणि माहितीची खुली देवाणघेवाण या संकल्पनेवर आधारित असलेली ही हॅकॅथॉन भारतातील विविध शहरातील संबंधितांना लाभदायी ठरण्याची अपेक्षा आहे. विविध शैक्षणिक संस्थांमधले जिओस्पाशल तज्ञ, खाजगी क्षेत्र, उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि सरकारकडून कोणत्याही शहरात नागरिकांना भेडसावणाऱ्या नेहमीच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपाययोजनांची पुनरावृत्ती इतर शहरांमध्ये करण्यासाठी या उपक्रमाची मदत होणार आहे. आतापर्यंत या स्पर्धेसाठी 800 जणांनी नोंदणी केली आहे आणि भारताला जिओस्पाशल सुसज्ज देश बनवण्यासाठी  मार्गदर्शन आणि मूल्यांकनासाठी  10 पेक्षा जास्त संस्था भागीदार बनल्या आहेत. या स्पर्धेसाठी डेटासेट्स आणि मार्गदर्शक नियमावलीसह इतर तपशीलाची माहिती घेण्यासाठी सर्व तपशील https://urbanhack.niua.org येथे उपलब्ध आहे.

 

* * *

S.Kane/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1786694) Visitor Counter : 216


Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi