अल्पसंख्यांक मंत्रालय

महाराष्ट्रातील धुळे येथे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन

Posted On: 26 DEC 2021 8:34PM by PIB Mumbai

 

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाला शतकातील सर्वात मोठ्या आपत्तीतून बाहेर काढण्यासाठी आघाडीवर राहून लढा देणारे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे समस्या निवारक नेतृत्व आपल्याकडे आहे, असे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री आणि राज्यसभेतील उपनेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज सांगितले.

धुळे येथे आज विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करताना नक्वी म्हणाले की, मोदी यांनी कोविड महामारीच्या काळात लोकांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी पुरेशा सुविधा आणि संसाधने सुनिश्चित केली. लोकांनी पाळलेला आत्मसंयम आणि घेतलेली खबरदारी यातून मोदींच्या नेतृत्वावरचा विश्वास प्रतिबिंबित झाला.

आमच्या सरकारने प्रत्येक जात, समुदाय, प्रदेश आणि धर्मातील नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी कार्य केले आहे.आज कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांची संख्या 141 कोटींच्या पुढे गेली आहे. 80 कोटींहून अधिक गरजू लोकांना विनामूल्य शिधावाटप केले जात आहे, असे नक्वी यांनी सांगितलं. .

धास्ती घेण्याऐवजी आमच्या सरकारने खबरदारी, प्रतिबंध आणि पुरेशा सुविधांना प्राधान्य दिले, असे नक्वी यांनी सांगितले.

2020 मध्ये जेव्हा कोरोनाची पहिली लाट भारतात आली तेव्हा कोरोनासारख्या महामारीचा सामना करण्यासाठी संसाधनांची उणीव होती.मात्र भारत आता कोरोना प्रतिबंधक लस, व्हेंटिलेटर, औषधे, पीपीई किट, एन-95 मास्क, कोरोना विषाणू संसर्ग निदानासाठी चाचणी प्रयोगशाळा, अतिदक्षता विभागातील खाटा ,कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी समर्पित रुग्णालये, वैद्यकीय ऑक्सिजन इत्यादींमध्ये आत्मनिर्भर झाला आहे.जानेवारी 2020 पूर्वी केवळ 900 मेट्रिक टन प्रतिदिन असलेले वैद्यकीय ऑक्सिजनचे उत्पादन आता 9000 मेट्रिक टन प्रतिदिन झाले आहे, असे नक्वी म्हणाले.

देशात 80,000 हून अधिक कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रे कार्यरत आहेत. 2600 हून अधिक कोरोना संसर्ग निदानासाठी चाचणी प्रयोगशाळा असून भारतामध्ये सध्या दररोज कोरोना संसर्ग निदान चाचणी संचाची स्वदेशी उत्पादन क्षमता 10 लाखांहून अधिक आहे. 2000 हून अधिक कोरोना रुग्णांसाठी समर्पित रुग्णालये आहेत; 4000 हून अधिक कोरोना समर्पित आरोग्य केंद्रे; तर सुमारे 13,000 कोरोना काळजी केंद्रे आहेत. 2020 च्या सुरुवातीला 10,000 च्या तुलनेत एकूण अलगीकरण खाटा (ऑक्सिजनसह/विना) वाढून 15 लाखांहून अधिक झाल्या आहेत. गेल्या वर्षी लॉकडाऊनपूर्वी अतिदक्षता विभागातील केवळ 2000 खाटा तुलनेत आता अतिदक्षता विभागातील खाटांची संख्या 85,000 पेक्षा जास्त झाली आहे.भारतात दररोज 5 लाखांहून अधिक स्वदेशी एन -95 मास्क तयार केले जात आहेत. भारतात दररोज 5 लाखांहून अधिक पीपीई किट तयार केले जात असून वर्षाला 4 लाखांहून अधिक व्हेंटिलेटर तयार केले जात आहेत, अशी माहिती नक्वी यांनी दिली.

नक्वी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी कपात , दलाली , भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि जातीयवादाचे गतिरोधक उद्ध्वस्त करून सुप्रशासनाच्या महामार्गावर देशाला पुढे नेत आहेत.मोदी युगाने दंगल आणि दहशतीचे राजकारण सन्मानाने विकासाचा निर्धार करून उधळून लावले आहे.

सर्वसमावेशक सक्षमीकरण हा राष्ट्रधर्म आहे आणि तुष्टीकरणाशिवाय सक्षमीकरण ही मोदी सरकारची राष्ट्रनिती आहे.मोदी सरकारने समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रक्रियेतील समान भागीदार बनवले आहे, असे नक्वी यांनी सांगितले.

नक्वी म्हणाले की, मोदी युग हे 'इक्बाल' (अधिकार), 'इन्साफ' (न्याय) आणि 'इमान' (अखंडतेचे) युग आहे.

गेल्या 7 वर्षात आमच्या सरकारने 2 कोटी 20 लाख गरीबांना घरे दिली आहेत; 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी देण्यात आला आहे;गरीब वर्गातील सुमारे 9 कोटी महिलांना उज्ज्वला योजने अंतर्गत मोफत गॅस जोडणी देण्यात आली आहे; 32 कोटींहून अधिक लोकांना "मुद्रा योजने" अंतर्गत स्वयंरोजगारासह विविध आर्थिक उपक्रमांसाठी सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे;44 कोटींहून अधिक लोकांना जन धन योजनेचा लाभ मिळाला आहे ; देशभरात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 13 कोटी शौचालये बांधण्यात आली आहेत;"आयुष्मान भारत" योजनेअंतर्गत 2 कोटींहून अधिक लोकांना मोफत वैद्यकीय उपचार देण्यात आले आल्याचे नक्वी यांनी सांगितले.

धुळ्यातील दोंडाईचा येथे समुदाय प्रेक्षागृह आणि रस्त्यांसह कोट्यवधी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आज नक्वी यांच्या हस्ते झाले. 'एकता चौक''च्या 'भूमिपूजना'तही त्यांनी सहभाग घेतला आणि धुळ्यातील दोंडाईचा येथे जाहीर सभांनाही त्यांनी संबोधित केले.

***

G.Chippalkatti/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1785367) Visitor Counter : 176


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil