युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

चार FIE विश्वचषक स्पर्धेत भाग घेण्यासाठी तलवारबाज भवानी देवीला क्रीडा मंत्रालयाकडून  8.16 लाख रुपये मंजूर

Posted On: 24 DEC 2021 9:13PM by PIB Mumbai

 

टोक्यो ऑलिंपियन आणि ऑलिम्पिक्समध्ये तलवारबाजीत देशाचे प्रतिनिधित्व करणारी पहिली भारतीय खेळाडू, भवानी देवी वर्ष 2022 मध्ये चार आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज आहे. या स्पर्धांमध्ये तिचा सहभाग सुकर व्हावा, यासाठी युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाने प्रशिक्षण आणि स्पर्धेसाठी वार्षिक दिनदर्शिका (ACTC) च्या माध्यमातून एकूण 8.16 लाख रुपयांची रक्कम  मंजूर केली आहे.

या वर्षी  टोक्यो ऑलिम्पिक्समध्ये 32 फेऱ्यांच्या सामन्यात पराभूत होण्यापूर्वी वक्र तलवार  वैयक्तिक प्रकारात  पहिल्या फेरीचा सामना जिंकणारी भवानी, जॉर्जियातील टब्लिसी येथे  14 ते 16 जानेवारी दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय तलवारबाजी संघाच्या विश्वचषक स्पर्धेत (FIE) सहभागी होणार आहे. त्यापूर्वी याच शहरात  4 जानेवारीपासून  होणाऱ्या  प्रशिक्षण शिबिरात ती भाग घेणार आहे. त्यानंतर ती बल्गेरियातील प्लोवदिव येथे 28 ते 29 जानेवारी दरम्यान  होणार्‍या विश्वचषक स्पर्धेत भाग घेईल. भवानी, सध्या महिलांच्या वैयक्तिक गटात जागतिक क्रमवारीत 55 व्या क्रमांकावर आहे.  त्यानंतर 4 ते   5 मार्च आणि 18 ते 19 मार्च रोजी अनुक्रमे ग्रीस आणि बेल्जियम येथे होणाऱ्या पुढील FIE विश्वचषक स्पर्धांमध्ये ती भाग घेईल.

केंद्रीय युवा कल्याण  आणि क्रीडा मंत्रालयाने या वर्षाच्या सुरुवातीला फेंसिंग असोसिएशन ऑफ इंडियाला ((FAI-भारतीय तलवारबाजी संघटना ) 2021-22 या आर्थिक वर्षासाठी मार्च 2022 पर्यंत 3 कोटी रुपयांची ACTC रक्कम मंजूर केली. सरकार प्रत्येक आर्थिक वर्षात सर्व मान्यताप्राप्त राष्ट्रीय क्रीडा महासंघांना (NSFs),दीर्घकालीन अंदाज, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा/शिबिरांची यादी  आणि क्रीडापटू प्रशिक्षण कार्यक्रमांची यादी पाहून  ACTC नुसार अनुदान जारी करते.

***

R.Aghor/S.Kakade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1785009) Visitor Counter : 159


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi