ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागरूकता, निवड, गुणवत्ता, तक्रार निवारण आणि अभिप्राय-  हे ग्राहक हक्कांचे पाच स्तंभ बळकट करण्याचे उद्दिष्ट: पीयूष  गोयल


‘ग्राहक हा राजा’ या मंत्राला अनुसरून ‘ग्राहक संरक्षण’ या संकल्पनेत परिवर्तन घडवत ग्राहकाच्या सक्षमीकरणाकडे वाटचाल -गोयल

Posted On: 24 DEC 2021 8:27PM by PIB Mumbai

 

ग्राहक व्यवहार विभागाने आज  राष्ट्रीय ग्राहक दिन 2021 साजरा केला. ग्राहकांनो आपले हक्क जाणून घ्या ही यंदाच्या ग्राहक दिनाची संकल्पना होती.

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री, पीयूष  गोयल यांनी ई-पुस्तकांचे प्रकाशन  करून आणि पेयजल चाचणीसाठी राष्ट्रीय चाचणी गृह (NTH) या पेयजल चाचणीसाठीच्या फिरत्या व्हॅनला झेंडा दाखवून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री  अश्विनी कुमार चौबे देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

आपल्या उद्घाटनपर भाषणात  गोयल यांनी ग्राहक हक्कांचे संरक्षण आणि ग्राहकांना गुणवत्तेची हमी  यावर  भर दिला. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली, 'ग्राहक हा राजा' या मंत्राचे पालन करून, आम्ही 'ग्राहक संरक्षण' ते  'ग्राहक सक्षमीकरण आणि समृद्धी' असा बदल घडवला आहे. ग्राहकांनी चांगल्या दर्जाचा आग्रह धरला पाहिजे आणि आपल्या हक्कांच्या  संरक्षणाची मागणी केली पाहिजे, असे गोयल यांनी सांगितले.

ग्राहकांनी उच्च दर्जाच्या उत्पादनांची मागणी केल्यामुळे भारतीय कंपन्यांना वृद्धीसाठी आणि चांगली कामगिरी करण्यासाठी  प्रोत्साहन मिळाले आहे, असे त्यांनी नमूद केले आणि कंपन्यांचा भर गुणवत्तेवर असायला हवा, असे ते म्हणाले. भारताने एक देश एक गुणवत्ता, यात आघाडी घ्यायला हवी, असे सांगून ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS-भारतीय मानके विभाग) ग्राहकांसाठी गुणवत्ता मानकांची सुनिश्चिती आणि मानक निश्चितीचे काम करत असल्याचे गोयल यांनी नमूद केले.

गुणवत्ता म्हणजे उत्पादनाची उच्च किंमत, हा एक गैरसमज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.  तक्रारींचे वेळेत निराकरण व्हावे, यासाठी  तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यावर गोयल यांनी भर दिला.

अधिक बळकट आणि सक्रिय ग्राहक व्यवस्थेसाठी केंद्राचे  पाच प्रमुख प्रयत्न आहेत   : थेट विक्री नियम, मध्यस्थी नियम, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरुद्ध मार्गदर्शक तत्त्वे, इ. एलएम (पाकिटबंद वस्तू ) नियम ज्यामुळे ग्राहकांना वस्तूंच्या किमतीची सहज तुलना करता येते, अशी माहिती त्यांनी दिली.

ई-दाखिलया पोर्टलने देशभरातील ग्राहकांना संबंधित ग्राहक आयोगाकडे सुलभ  संपर्क साधता यावा यासाठी, तक्रार दाखल करण्याकरिताप्रवास करून प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता  दूर करून, अडथळामुक्त, जलद आणि स्वस्त सुविधा म्हणजे  ऑनलाइन तक्रार दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आज देशभरात 544 ग्राहक आयोग ई -फाइलिंग सुविधांनी सुसज्ज आहेत आणि 11,000 हून अधिक प्रकरणे ऑनलाइन दाखल करण्यात आली आहेत, असे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.

पेयजल चाचणीसाठी आज रवाना करण्यात आलेल्या फिरत्या  व्हॅनच्या धर्तीवर, BIS आणि NTH चाचणीची जबाबदारी घेऊ शकतात आणि प्रत्येक जिल्ह्यात अशी सुविधा देऊ शकतात.

हेल्मेट, प्रेशर कुकर आणि स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर यांसारख्या प्रमुख  घरगुती वस्तूंमध्ये गुणवत्ता नियंत्रण आदेश (QCO) च्या अंमलबजावणीसाठी त्यांनी व्यापारी आणि उत्पादकांना सहकार्य करण्याची विनंती केली.

'लॅण्डमार्क जजमेंट्स ऑन कन्झ्युमर लॉ (law)अँड प्रॅक्टिस', 'हॅण्डबुक ऑन मीडिएशन अंडर कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 2019' आणि 'हॅण्डबुक ऑन ई- फायलिंग बीफोर कन्झ्युमर रिड्रेसल कमिशन' या तीन ई-पुस्तकांचे आभासी पद्धतीने उदघाटन झाले.

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण  राज्यमंत्री  अश्विनी कुमार चौबे यांनी आपल्या  भाषणात ग्राहक हक्कांच्या महत्त्वावर भर दिला.

उद्घाटन कार्यक्रमानंतर, तांत्रिक सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात  ग्राहक संरक्षण कायदा, 2019 च्या संदर्भाने  ग्राहक संरक्षण आणि दिशाभूल करणारी जाहिरात, पुढील मार्ग आणि कायदेशीर मापविद्या  कायदा, 2009 मधील नवीन उपक्रम, याबाबत  चर्चा करण्यात आली.

***

R.Aghor/S.Kakade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1784992) Visitor Counter : 247