सांस्कृतिक मंत्रालय
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्थापन राष्ट्रीय समितीच्या दुसऱ्या बैठकीत पंतप्रधानांचे मार्गदर्शन
कोविडनंतरच्या नव्या जगात भारताने जगाचे नेतृत्व म्हणून उदयास यावे: पंतप्रधान
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव युवकांमध्ये कर्तव्य भावना वृद्धिंगत करेल: पंतप्रधान
आपण कुठल्याही परिस्थितीत आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचा आणि स्वातंत्र्य चळवळीच्या अनाम नायकांना आदरांजली वाहिलीच पाहिजे: पंतप्रधान
Posted On:
22 DEC 2021 11:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 डिसेंबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त स्थापन केलेल्या समितीच्या दुसऱ्या बैठकीला नवी दिल्ली येथे आज संबोधित केले. लोकसभा अध्यक्ष, विविध राज्याचे राज्यपाल, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, राजकीय नेते, अधिकारी, माध्यमांचे प्रतिनिधी, धार्मिक नेते, कलाकार आणि चित्रपट क्षेत्रातील व्यक्ती आणि समाजाच्या विविध क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती तसेच समितीचे विविध सदस्य बैठकीला उपस्थित होते. सांस्कृतिक विभागाचे सचिव गोविंद मोहन यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांबद्दल सादरीकरण केले.
या राष्ट्रीय समितीची पहिली बैठक 8 मार्च 2021 रोजी, आयोजित करण्यात आली. त्यानंतर 12 मार्च 2021 रोजी पंतप्रधानांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाची सुरुवात केली.
या बैठकीत राष्ट्रीय समितीच्या ज्या सदस्यांनी सल्ले आणि सूचना दिल्या त्यात माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी, भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा, राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार, भारतरत्न लता मंगेशकर, रजनीकांत, रामोजी राव, उद्योजक ए. एम. नाईक, स्वामी परमानंद सरस्वती आणि इतर यांचा समावेश आहे.
यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की आपण अशावेळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत जेव्हा संपूर्ण जग कोविडच्या संकटातून जात आहे आणि आपली स्थितीही काही वेगळी नाही. या संकटाने आपल्याला अनेक नवे धडे शिकवले आहेत. आता अस्तित्वात असलेल्या अनेक व्यवस्था कोविडमुळे कालबाह्य झाल्या असून कोविडोत्तर काळात संपूर्ण जगाची एक संपूर्ण नवी व्यवस्था उदयास येणार आहे. त्यामुळेच, आपण आज जेव्हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत, त्यावेळी आपण या नव्या जगाचे नेतृत्व भारताकडे राहील यासाठी प्रयत्न करायला हवेत, असं सांगत, कोविडनंतरच्या नव्या जगात भारताने जगाचे नेतृत्व म्हणून उदयास यावे असे पंतप्रधान म्हणाले.
आजच्या नव्या पिढीत काहीतरी करुन दाखवण्याची जिद्द आहे, उत्साह आहे, त्यांना नवे भविष्य घडवायचे आहे. मात्र, आपण हे ही लक्षात ठेवले पाहिजे की भविष्याचा जन्म नेहमी भूतकाळाच्या कुशीतून होतो. त्यामुळेच, आपण आपल्या पूर्वजांचा आणि देशासाठी त्यांनी केलेल्या त्यागाचा कधीही विसर पडू देता कामा नये, असे पंतप्रधान म्हणाले.
* * *
S.Tupe/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1784418)
Visitor Counter : 303