उपराष्ट्रपती कार्यालय
प्रादेशिक भाषांमध्ये अधिक चांगल्या प्रकारे विज्ञानविषयक संपर्क वाढवला जावा- उपराष्ट्रपती
विज्ञानविषयक चर्चा सर्वसमावेशक आणि लोकशाहीपूर्ण असावी-उपराष्ट्रपती
उपराष्ट्रपतींच्या हस्ते, आज राष्ट्रीय गणित दिवसानिमित्त भारतीय वैज्ञानिकांच्या वार्षिक जन्मशताब्दी उत्सवाचा शुभारंभ; श्रीनिवास रामानुजन आणि इतरांना उपराष्ट्रपतींची श्रद्धांजली
Posted On:
22 DEC 2021 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 डिसेंबर 2021
विज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत त्यांच्या मातृभाषेत अधिक प्रभावीपणे पोचवण्यासाठी, त्याचा प्रादेशिक भाषांमध्ये प्रसार- प्रचार होणे आवश्यक आहे, असे मत उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. यातून लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जिज्ञासा जागृत करणे, हे शासनाचे मूलभूत कर्तव्य असल्याचा उल्लेख करत उपराष्ट्रपती म्हणाले की पुस्तके, टीव्हीवरील कार्यक्रम आणि रेडियो प्रसारणाच्या माध्यमातून विज्ञान अधिकाधिक लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न केले जावेत.
आज लोकांच्या आयुष्यावर, कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव लक्षात घेत, नायडू म्हणाले की विज्ञानविषयक चर्चा अधिक सर्वसमावेशक आणि लोकशाहीपूर्ण असायला हव्यात. लोकांच्या आयुष्याशी निगडीत अशा क्षेत्रांमध्ये अधिकाधिक प्रगती केली जावी, जेणेकरुन विज्ञानाचे जास्तीत जास्त लाभ लोकांना मिळतील, असे आवाहन त्यांनी वैज्ञानिक समुदायांना केले. ही त्यांची वैज्ञानिक सामाजिक जबाबदारी आहे, असेही ते पुढे म्हणाले.
यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते, राष्ट्रीय गणित दिनानिमित्त आयोजित भारतीय वैज्ञानिकांच्या जन्मशताब्दी वर्ष समारंभाचे उद्घाटन झाले. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या विज्ञान प्रसार केंद्राने हा समारंभ आयोजित केला आहे. विख्यात गणितज्ञ, श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त, दरवर्षी 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो.
यावेळी रामानुजन यांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करत, नायडू म्हणाले की, भारतीय गणितज्ञ आणि वैज्ञानिकांनी देशबांधणीत दिलेले योगदान लक्षात ठेवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. “या सर्व वैज्ञानिकांच्या प्रेरणादायक कथा आपणच नव्या पिढीपर्यंत पोचवायला हव्यात. आणि युवा पिढीला विज्ञान क्षेत्रात करियर करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे.” असे ते पुढे म्हणाले
यावेळी, याच वर्षी जन्मशताब्दी असलेल्या सहा भारतीय वैज्ञानिकांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यात, हरगोविंद खुराना, जी. एन. रामचंद्रन, येलावर्ती नेऊदम्मा, बालसुब्रमण्यम रामामूर्ती, जी. एस लढ्ढा आणि राजेश्वरी चटर्जी यांनाही आदरांजली वाहिली. या सगळ्यांचा जन्म 1922 साली झाला होता.
स्टेम म्हणजेच- विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि गणित या चार क्षेत्रांत आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले. भारताने विज्ञान संशोधन क्षेत्राचे नेतृत्व करावे, असे आवाहन त्यांनी केले.
अनेक लहान मुलांना शाळेत, विज्ञान आणि गणिताची भीती वाटते, याची नोंद घेत, नायडू म्हणाले की, आपण प्रयोगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये या विषयांची गोडी निर्माण केली पाहिजे.
* * *
S.Tupe/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1784416)