कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
सार्वजनिक तक्रारींचे निवारण आणि सेवांचे वितरण सुधारण्यासाठी ‘प्रशासन गाव की ओर अर्थात गावापर्यंत प्रशासन’- ही देशव्यापी मोहीम
"सुशासन सप्ताह" यशस्वी होण्यासाठी पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह 20-25 डिसेंबर 2021 दरम्यान आयोजित सुशासन सप्ताहाचे उद्घाटन करणार
Posted On:
19 DEC 2021 4:44PM by PIB Mumbai
कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाचा प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभाग (DARPG), परराष्ट्र मंत्रालय, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग आणि पंचायती राज आणि ग्रामीण विकास मंत्रालय यांच्या सहकार्याने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून 20-25 डिसेंबर दरम्यान सुशासन सप्ताह साजरा करणार आहे.
केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)डॉ जितेंद्र सिंह 20 डिसेंबर 2021 रोजी नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रतील भीम सभागृह येथे सुशासन सप्ताहाच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे असतील. यावेळी “शासनाची बदलती प्रतिमा” या सुशासन पद्धतीवरील प्रदर्शनाचे ते उद्घाटन करतील. तसेच डॉ जितेंद्र सिंह गुड गव्हर्नन्स वीक पोर्टल सुरु करतील आणि प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाच्या 2 वर्षांच्या कामगिरीवरील पुस्तिकेचे प्रकाशन करतील. यावेळी “प्रशासन गाव की ओर ” हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे.
“सुशासन सप्ताह”च्या यशासाठी शुभेच्छा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे, “स्वातंत्र्याच्या अमृत कालखंडात, आपण सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकास करण्यासाठी पारदर्शक व्यवस्था, कार्यक्षम प्रक्रिया आणि सुरळीत प्रशासन निर्माण करण्यासाठी वेगाने पुढे जात आहोत. या संदर्भात, या सप्ताहाची संकल्पना—प्रशासन गाव की ओर अर्थात गावापर्यंत प्रशासन ही अधिक प्रासंगिक ठरत आहे”
सुशासन सप्ताहाची संकल्पना आहे "प्रशासन गाव की ओर अर्थात गावापर्यंत प्रशासन " - सार्वजनिक तक्रारींचे निवारण आणि सेवा वितरण सुधारण्यासाठी एक देशव्यापी मोहीम देशातल्या सर्व जिल्हे, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आयोजित केली जाईल. "प्रशासन गाव की ओर " मध्ये देशातील 700 हून अधिक जिल्हाधिकारी सहभागी होणार आहेत आणि आठवडाभर चालणाऱ्या या कार्यक्रमात तक्रारींचे वेळेवर निवारण आणि सेवा वितरण सुधारण्यासाठी ते तहसील/पंचायत समिती मुख्यालयाला भेट देतील.
25 डिसेंबर 2021 रोजी, "सुशासन दिन" साजरा केला जाईल. या प्रसंगी, “सुशासन सप्ताह-प्रशासन गाव की ओर” या विषयावरील चित्रपट दाखवण्यात येणार आहे आणि “गुड गव्हर्नन्स इंडेक्स- राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील प्रशासनाचे मूल्यांकन” सुरु करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्रीअमित शाह, डॉ. जितेंद्र सिंह, 25 डिसेंबर 2021 रोजी विज्ञान भवन येथे "सुशासन दिन" च्या समारोप सत्रात सहभागी होतील.
केंद्र सरकारची सर्व मंत्रालये/विभाग, सर्व राज्य सरकारे आणि जिल्हे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
***
Jaydevi PS/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1783231)
Visitor Counter : 430