वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

रत्ने आणि आभूषणे उद्योगाला जागतिक स्तरावर चॅम्पियन बनवण्याचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे आवाहन


भारताचा संयुक्त अरब अमिरातीशी मुक्त व्यापार करार अनेक क्षेत्रांसाठी नव्या संधींची दारे उघडून देणारा ठरेल - केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते मुंबईतील सिप्झ येथे सामायिक सुविधा केंद्राची कोनशिला बसवण्यात आली




Posted On: 18 DEC 2021 6:17PM by PIB Mumbai

मुंबई, 18 डिसेंबर 2021

रत्ने आणि आभूषणे उद्योगाला जागतिक स्तरावर चॅम्पियन बनवण्याचे आव्हान केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आज केले.

मुंबईतील सिप्झ येथे आयोजित रत्ने आणि आभूषणे निर्यात प्रोत्साहन परिषदेत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते आज सामायिक सुविधा केंद्राची कोनशिला बसवण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.

रत्ने आणि आभूषणे क्षेत्राने अधिक उत्तम उद्दिष्ट गाठले पाहिजे यावर केंद्रीय गोयल यांनी जोर दिला. रत्ने आणि आभूषणे क्षेत्रामध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार करण्याची उर्जा, आश्वासकता आणि क्षमता आहे. आता भारताचे वचन, सक्षमता आणि विश्वास यांचे दर्शन घडविण्यासाठी भारताच्या रत्ने आणि आभूषणे क्षेत्राने खऱ्या अर्थाने जागतिक स्तरावर चॅम्पियन होऊन दाखविण्याची वेळ आली आहे. चला, आपण आगामी दशक, रत्ने आणि आभूषणे क्षेत्रासाठी निर्णायक दशक म्हणून गाजवून दाखवूया, असे गोयल यांनी नमूद केले.

1 मे 2023 रोजी, ज्यावेळी सिप्झ आपले सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करेल, तोपर्यंत आजच्या प्रकल्पाचा कोनशिला समारंभ, उद्‌घाटन समारंभापर्यंत पोचला असेल, याविषयी माझ्या मनात काहीही शंका नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कोविड अद्याप संपलेला नाही, त्यामुळे कामाचे नियोजन अशाप्रकारे करावे जेणेकरुन कोविड काळातही आपण हे काम 1 मे 2023 पर्यंत पूर्ण करु शकू, असे ते म्हणाले. एक मे ला विशेष महत्त्व आहे, कारण हा कामगार दिन असतो, महाराष्ट्र स्थापना दिन आणि सिप्झचा 50 व वर्धापन दिनही आहे, असे गोयल यांनी नमूद केले.

पुढील 3 ते 5 वर्षांत संपूर्ण सिप्झची पुनर्बांधणी करता येईल, हेच आपले ध्येय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

1973 साली निर्यात प्रकिया केंद्राची उभारणी करणाऱ्या जगातल्या मोजक्या देशांपैकी आपण एक होतो याची त्यांनी यावेळी आठवण करून देत, या भव्य सामाईक सुविधा केंद्राची उभारणी करुया आणि त्याला जागतिक दर्जाचे बनवूया असे गोयल म्हणाले. आपल्याला या संपूर्ण क्षेत्राची पुनर्बांधणी करावी लागेल. जेणेकरुन भारत प्रकल्पांची अंमलबजावणी जलद आणि जागतिक दर्जाची करु शकतो याचा जगाला प्रत्यय येईल, असेही त्यांनी नमूद केले.

भारताचा संयुक्त अरब अमिरातीशी मुक्त व्यापार कराराबाबत बोलताना ते म्हणाले की या कराराबाबत अंतिम स्वरूप देण्यासाठी आम्ही सक्रियतेने कार्य करत आहोत. आम्ही भारत-संयुक्त अरब अमिरात मुक्त व्यापार करार विषयक वाटाघाटी सुरु केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. भारत-संयुक्त अरब अमिरात मुक्त व्यापार करार ही भारतासाठी एक अत्यंत उल्लेखनीय सफलता आहे.  हा करार अनेक क्षेत्रांसाठी नव्या संधींची दारे उघडून देणारा ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टेक्नॉलॉजी, ट्रेड आणि ट्रेनिंग या तीन 'टी' वर अर्थात तंत्रज्ञान, व्यापार, प्रशिक्षण या तीन मुद्यांवर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे यावर त्यांनी भर दिला.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी या कार्यक्रमात ‘सीप्झ: गोल्डन गेटवे टू गोल्डन मार्केटस’ या विषयावरील कॉफी टेबल पुस्तकाचे अनावरणही केले.

सामायिक सुविधा केंद्राविषयी

भव्य सीएफसी हा 70 कोटी रुपयांचा प्रकल्प असून ते कौशल्य प्रशिक्षणासाठीचे मध्यवर्ती केंद्र तसेच देशाच्या महत्वाच्या रत्ने आणि आभूषणे निर्मिती केंद्राच्या हृदयस्थानी वसलेले महत्त्वपूर्ण व्यापार सुविधा केंद्र असेल. अशा प्रकारच्या दोन सुविधा केंद्रांपैकी हे एक केंद्र असेल (दुसरे सुरत येथील केंद्र) आणि ते रत्ने तसेच आभूषणे क्षेत्रातील निर्मिती आणि इतर संबंधित प्रक्रियांसाठीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरवेल. हे केंद्र सक्षम कर्मचारीवर्ग उभारण्यासाठी आवश्यक कौशल्य आणि प्रशिक्षण संबंधी पाठबळ देखील पुरवेल. भारतीय रत्ने आणि आभूषणे उद्योगामध्ये आजच्या घडीला 45 लाख इतके सर्वात जास्त कुशल कर्मचारी दल कार्यरत आहे.

 

S.Tupe/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1783055) Visitor Counter : 282


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil