पंतप्रधान कार्यालय
उत्तरप्रदेशात वाराणसी इथे काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण
Posted On:
13 DEC 2021 9:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 डिसेंबर 2021
हर हर महादेव। हर हर महादेव। नमः पार्वती पतये, हर हर महादेव॥ माता अन्नपूर्णा की जय। गंगा मइया की जय।
या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित उत्तर प्रदेशाच्या राज्यपाल श्रीमती आनंदी बेन पटेल जी, उत्तरप्रदेश चे मुख्यमंत्री कर्मयोगी श्री योगी आदित्यनाथ जी, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, आम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक श्रीमान जे. पी.नड्डा जी, उपमुख्यमंत्री भाई केशव प्रसाद मौर्य जी, दिनेश शर्मा जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी महेंद्र नाथ पांडे जी, उत्तरप्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह जी, इथले मंत्री श्रीमान नीलकंठ तिवारी जी, देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले पूज्य संत महंत, आणि माझ्या प्रिय काशी वासीयांनो, तसेच देश-विदेशातून या प्रसंगाचे साक्षीदार झालेले सर्व भाविक भक्तगण ! काशीच्या सर्व बंधूंसह, बाबा विश्वनाथाच्या चरणी मी नतमस्तक होत आहे. माता अन्नपूर्णा देवीच्या चरणांना वारंवार वंदन करतो आहे.आत्ताच मी बाबा विश्वनाथासह, या शहराचे पहारेकरी, काळभैरवाचेही दर्शन घेऊन आलो आहे. देशबांधवांसाठी त्यांचे आशीर्वाद घेऊन आलो आहे. काशीनगरीत काही विशेष असेल, नवे काही होणार असेल, तर सगळ्यात आधी त्यांची परवानगी घेणे आवश्यक असते. मी काशीच्या कोतवालाच्या चरणी देखील प्रणाम करतो.
गंगा तरंग रमणीय जटा-कलापम्,
गौरी निरंतर विभूषित वाम-भागम्नारायण
प्रिय-मनंग-मदाप-हारम्,
वाराणसी पुर-पतिम् भज विश्वनाथम्।
मी बाबा विश्वनाथाच्या या दरबारात, देश आणि जगातील त्या सर्व भाविक भक्तांनाही प्रणाम करतो, जे आपापल्या जागी राहून या महायज्ञाचे साक्षीदार बनले आहेत. ज्यांच्या सहकार्याने हा आजचा शुभ प्रसंग प्रत्यक्षात साकार होत आहे, अशा तुम्हा सर्व काशीवासियांना देखील मी प्रणाम करतो. आज माझे मन अत्यंत गहिवरून आले आहे. मी अत्यंत आनंदात आहे. आपल्या सर्वांचे या मंगल प्रसंगानिमित्त खूप खूप अभिनंदन !
मित्रांनो,
आपल्या पुराणात सांगितले आहे, की कोणीही व्यक्ति ज्या क्षणी काशी शहरांत प्रवेश करते त्या क्षणी ती सगळ्या बंधनातून मुक्त होते. भगवान विश्वेश्वराचा आशीर्वाद, इथली एक अलौकिक ऊर्जा, इथे येताच, आपल्या अंतरात्म्याला जागृत करते. आणि आज तर, या चिरचैतन्य काशीनगरीत चैतन्याची वेगळीच स्पंदने जाणवत आहेत. आदि काशीनगरीच्या अलौकिक तेजाला आज वेगळीच झळाळी चढली आहे. शाश्वत बनारसच्या संकल्पामध्ये आज एक वेगळेच सामर्थ्य जाणवते आहे. आपण शास्त्रामध्ये ऐकले आहे, की जेव्हा काही पुण्यप्रसंग असतो, त्यावेळी सगळी तीर्थे, सगळ्या दैवी शक्ति वाराणसी इथे, बाबा विश्वनाथांकडे उपस्थित राहतात. असाच काहीसा अनुभव मला आज बाबा विश्वनाथाच्या दरबारात येतो आहे. आपले संपूर्ण चेतन ब्रह्मांड या शक्तिशी जोडले गेले आहे, असे वाटते आहे. तशी तर आपली ‘माया’ बाबा विश्वनाथच जाणोत! मात्र, जिथपर्यंत आपली मानवी दृष्टी पोहोचते, तिथपर्यंत मला असे दिसते आहे की ‘विश्वनाथ धाम’च्या पवित्र आयोजनाशी यावेळी संपूर्ण विश्व जोडले गेले आहे.
मित्रांनो,
आज भगवान शिवाचा प्रिय दिवस, सोमवार आहे, आज विक्रम संवत दोन हजार अठ्ठयाहत्तर, मार्गशीर्ष शुक्लपक्ष, दशमी तिथी, एक नवा इतिहास रचला जातो आहे. आणि आपलं सौभाग्य आहे की आपण या तिथीचे साक्षीदार आहोत. आज विश्वनाथ धाममध्ये अकल्पनीय - अनंत उर्जा भरली आहे. याचं वैभव विस्तारत आहे. याची विशेषता गगनाला भिडते आहे. इथली आसपासची अनेक प्राचीन मंदीरं लुप्त झाली होती, ती देखील पुनर्स्थापित करण्यात आली आहेत. बाबा आपल्या भक्तांच्या शतकांच्या तपस्येवर सेवेवर प्रसन्न झाले आहेत, म्हणूनच त्यांनी आज हा दिवस आपल्याला आशीर्वाद म्हणून दिला आहे. विश्वनाथ धाम केवळ एक भव्य मंदिर नाही, तर, हे भारतीय प्राचीन संस्कृतीचं प्रतीक आहे. हे प्रतीक आहे, आपल्या अध्यात्मिक आत्म्याचं! हे प्रतीक आहे भारताच्या प्राचीनतेचं, परंपरांचं! भारताच्या उर्जेचं, भारताच्या गतिशीलतेचं!
जेव्हा आपण इथे दर्शनासाठी याल त्यावेळी आपल्याला केवळ श्रद्धेचेच दर्शन होईल, असे नाही, आपल्याला इथे आपल्या भूतकाळाच्या गौरवाचीही जाणीव होईल. इथे, प्राचीनता आणि नवीनता एकाच वेळी कशी सजीव झाली आहे. कशाप्रकारे, प्राचीनतेच्या प्रेरणा, भविष्याला दिशा दाखवत आहेत, याचे साक्षात दर्शन आज विश्वनाथ धाम परिसरात आपण करत आहोत.
मित्रांनो,
जी गंगा माता उत्तरवाहिनी बनून बाबांचे चरण धुण्यासाठी काशीला येते, ती गंगा माता देखील आज खूप प्रसन्न असेल. आता जेव्हा आपण भगवान विश्वनाथाच्या चरणी नमस्कार करू, ध्यान करू, तेव्हा गंगा मातेला स्पर्शून जाणारी हवा आपल्याला स्नेह देईल, आशीर्वाद देईल. आणि जेव्हा गंगा माता उन्मुक्त होईल, प्रसन्न होईल, तेव्हा आपण बाबांच्या ध्यानधारणेत ‘गंगेतील तरंगांच्या नादस्वरांचा ’ दैवी अनुभव देखील घेऊ शकू. बाबा विश्वनाथ सर्वांचे आहेत, गंगा माता सर्वांची आहे. त्यांचे आशीर्वाद सर्वांसाठी आहेत. मात्र काळ आणि परिस्थितीनुसार बाबा आणि गंगा मातेच्या सेवेची ही सुलभता कठीण झाली होती, इथे प्रत्येकाला यायचे असते, मात्र रस्ते आणि जागेची कमतरता होती. वृद्धांसाठी , दिव्यांगांसाठी इथे येण्यात अनेक अडचणी होत्या.मात्र आता, ‘विश्वनाथ धाम प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे इथे कुणालाही येणे आता सुलभ झाले आहे. आपले दिव्यांग बांधव, वृद्ध आईवडील थेट बोटीतून जेटी पर्यंत येतील. जेटीवरून घाटापर्यंत येण्यासाठी देखील सरकते जिने (एस्कलेटर) लावले आहेत. तिथून थेट मंदिरात पोहचू शकतील. अरुंद रस्त्यांमुळे दर्शन घेण्यासाठी कित्येक तास प्रतीक्षा करावी लागायची, जो त्रास व्हायचा तो देखील आता कमी होईल. पूर्वी इथले मंदिराचे क्षेत्र केवळ तीन हजार चौरस फूट होते, ते आता सुमारे 5 लाख चौरस फूट झाले आहे . आता मंदिर आणि मंदिर परिसरात 50, 60, 70 हजार भाविक येऊ शकतात. म्हणजे आधी गंगा मातेचे दर्शन-स्नान, आणि तिथून थेट विश्वनाथ धाम, हेच तर आहे , हर-हर महादेव !
मित्रांनो ,
जेव्हा मी बनारसला आलो होतो, तेव्हा एक विश्वास घेऊन आलो होतो. विश्वास स्वतःपेक्षा जास्त बनारसच्या लोकांवर होता, तुमच्यावर होता. आज हा सगळं हिशोब करण्याची वेळ नाही, मात्र मला आठवतंय , तेव्हा असेही काही लोक होते जे बनारसच्या लोकांविषयी शंका उपस्थित करायचे. कसे होईल, होईल कि नाही, इथे तर असेच चालतं ! मोदीजींसारखे खूप जण येऊन गेले. मला आश्चर्य वाटायचे की बनारससाठी अशी धारणा बनवली गेली होती ! असे तर्क केले जात होते ! हे जडत्व बनारसचे नव्हते ! असूच शकत नाही! थोडेफार राजकारण होते , थोडाफार काही लोकांचा स्वार्थ, म्हणूनच बनारसवर आरोप केले जात होते. मात्र काशी तर काशी आहे ! काशी तर अविनाशी आहे. काशीमध्ये एकच सरकार आहे , ज्यांच्या हातात डमरू आहे, त्यांचे सरकार आहे. जिथे गंगा आपला प्रवाह बदलून वाहते , त्या काशीला कुणी कसे रोखू शकते ? काशीखण्ड मध्ये भगवान शंकरांनी स्वतः म्हटले आहे - “विना मम प्रसादम् वै, कः काशी प्रति-पद्यते”। अर्थात,मी प्रसन्न झाल्याशिवाय काशीमध्ये कोण येऊ शकते , कोण याचे सेवन करू शकते ? काशीमध्ये महादेवाच्या इच्छेशिवाय ना कुणी येतं आणि त्यांच्या इच्छेशिवाय न इथे काही घडतं .इथे जे काही होते महादेवाच्या इच्छेनेच होतं . हे जे काही झालं आहे , महादेवानेच केले आहे. हे विश्वनाथ धाम, हे बाबांच्या आशीर्वादाने उभे राहिले आहे. त्यांच्या इच्छेशिवाय कुणाचेही पान हलत नाही. कुणी कितीही मोठा असला तरी तो आपल्या घरी असेल. इथे बोलावले तरच कुणी येऊ शकेल, काही करू शकेल.
मित्रांनो,
बाबा विश्वनाथ समवेत आणखी कोणाचे योगदान असेल तर ते म्हणजे बाबा विश्वनाथ यांच्या गणांचे.बाबांचे गण म्हणजे आपले सर्व काशीनिवासी, जे स्वतः महादेवाचेच रूप आहेत. बाबा विश्वनाथ आपल्या शक्तीची प्रचीती देण्यासाठी काशीवासियांना माध्यम करतात आणि मग काशी नगरी करते ते अवघे जग पाहते.
“इदम् शिवाय, इदम् न मम्”
बंधू-भगिनीनो,
हा भव्य परिसर निर्माण करण्यासाठी ज्यांनी घाम गाळला त्या कामगार बंधू-भगिनींचे मी आज आभार मानतो. कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी इथल्या कामात खंड पडू दिला नाही. या श्रमिकांना भेटण्याची त्यांचे आशीर्वाद घेण्याची संधी मला लाभली.आपले कारागीर, अभियांत्रिकीशी संबंधित आपले लोक, प्रशासनातले लोक, ज्यांचे इथे वास्तव्य होते ती कुटुंबे या सर्वांचे मी अभिनंदन करतो. यांच्या बरोबरच, काशी विश्वनाथ धाम प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या उत्तर प्रदेश सरकार, आपले कर्मयोगी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आणि त्यांच्या संपूर्ण चमूचे मी अभिनंदन करतो.
मित्रांनो,
आपल्या या वाराणसीने युगे पाहिली आहेत, इतिहास घडताना,त्याचा ऱ्हास होताना पाहिला आहे. अनेक कालखंड आले आणि गेले, अनेक राजवटी आल्या आणि धुळीला मिळाल्या, मात्र बनारस ठाम उभे आहे , आपली कीर्ती पसरवत आहे.
बाबा विश्वनाथ यांचे हे धाम चिरंतन तर आहेच त्याचबरोबर त्याच्या सौंदर्यानेही जगाला नेहमीच आकर्षित आणि अचंबितही केले आहे. आपल्या पुराणांमध्ये नैसर्गिक तेजोवलय असलेल्या काशीच्या अशाच दिव्य स्वरूपाचे वर्णन केले आहे. ग्रंथ किंवा पुराणात आपण पाहिले, इतिहासात पाहिले तरी इतिहासकारांनीही वनराजी,सरोवरे, तलाव यांनी समृद्ध अशा काशीच्या अद्भुत स्वरूपाचे वर्णन केले आहे. मात्र काळ कधी कायम टिकून राहत नाही. आक्रमणकर्त्यांनी या नगरावर आक्रमण केलं, या नगरीला नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या शहराने औरंगजेबाचे अत्याचार, त्याची दहशत पाहिली आहे. ज्याने तलवारीच्या धाकावर संस्कृती बदलण्याचा, कट्टरतेच्या टोकाने संस्कृती चिरडण्याचा प्रयत्न केला. मात्र या देशाची भूमी जगापेक्षा आगळी आहे. इथे जर औरंगजेब आला तर प्रतिकाराला महाराज शिवाजीही इथे घडतात. सालार मसूद जर इथे आला तर राजा सुहेलदेव यांच्यासारखे पराक्रमी योद्धे आपल्या एकतेच्या सामर्थ्याची जाणीव करून देतात. इंग्रजांच्या काळात, काशीच्या लोकांनी
वॉरन हेस्टिंग्जची काय स्थिती केली होती हे तर काशीचे रहिवासी वारंवार सांगतात आणि त्यांच्या तोंडावर स्थानिक म्हणीच्या या ओळी देखील असतात, “घोड्यावर अंबारी आणि हत्तीवर खोगीर, वॉरन हेस्टिंग्जला झाली पळता भुई थोडी”.
मित्रांनो,
काळाचे चक्र पहा, दहशतीचा तो काळ इतिहासाच्या काळ्याकुट्ट पानांमध्ये बंदिस्त झाला आहे आणि माझी काशी नगरी आगेकूच करत आहे.आपल्या कीर्तीला नवी भव्यता देत आहे.
मित्रांनो,
काशीबद्दल मी जितके बोलू लागतो तितकेच त्यात गुंतून जातो,तितकाच भावविवश होतो. काशी शब्दात मांडण्याचा विषय नव्हे तर काशी म्हणजे संवेदनांची सृष्टी आहे. काशी ही आहे जिथे जागृती हेच जीवन आहे, काशी ती आहे जिथे मृत्यूही मंगल आहे ! काशी ती आहे जिथे सत्य हेच संस्कार आहेत. काशी ती आहे जिथे स्नेह हीच परंपरा आहे.
बंधू-भगिनीनो,
आपल्या पुराणातही काशीचे महात्म्य वर्णन करताना शेवटी ‘नेति-नेति’ म्हटले आहे, म्हणजे जे वर्णन केले आहे इतकेच नव्हे तर त्यापेक्षाही अधिक आहे. आपल्या शास्त्रामध्ये म्हटले आहे,
“शिवम् ज्ञानम् इति ब्रयुः, शिव शब्दार्थ चिंतकाः”।म्हणजे शिव या शब्दाचे चिंतन करणारे लोक,शिव म्हणजेच ज्ञान असे म्हणतात. म्हणूनच ही काशी नगरी शिवमय आहे, ही काशी ज्ञानमय आहे. म्हणूनच ज्ञान,संशोधन हे काशी आणि भारतासाठी नैसर्गिक निष्ठा राहिले आहे. भगवान शिव यांनी स्वतः म्हटले आहे, - “सर्व क्षेत्रेषु भू पृष्ठे, काशी क्षेत्रम् च मे वपु:”।म्हणजेच धरतीवरच्या सर्व क्षेत्रात काशी माझेच शरीर आहे. म्हणूनच इथला प्रत्येक पाषाण शंकर आहे. म्हणूनच आपण आपल्या काशी नगरीला सजीव मानतो आणि याच भावनेने आपल्या देशाच्या कणाकणात मातृभावाची अनुभूती येते. आपल्या शास्त्रांमध्ये म्हटले आहे
- “दृश्यते सवर्ग सर्वै:, काश्याम् विश्वेश्वरः तथा”॥ म्हणजे काशीमध्ये चराचरात भगवान विश्वेश्वराचीच अनुभूती येते. म्हणूनच काशी जीवत्वाला शिवत्वाशी थेट जोडते. आपल्या ऋषींमुनींनी म्हटले आहे,
- “विश्वेशं शरणं, यायां, समे बुद्धिं प्रदास्यति”। म्हणजे भगवान विश्वेश्वराच्या छायाछत्राखाली आल्याने व्यक्ती सम बुद्धीने परिपूर्ण होते.बनारस अशी नगरी आहे जिथून जगद्गुरू शंकराचार्य यांना श्रीडोम राजाच्या पवित्रतेतून प्रेरणा मिळाली. त्यांनी देशाला एकतेच्या धाग्यात गुंफण्याचा निश्चय केला. हे तेच स्थान आहे जिथे भगवान शंकरांच्या प्रेरणेतून गोस्वामी तुलसीदास जी यांनी रामचरित मानस यासारखी अलौकिक निर्मिती केली.
इथल्या सारनाथ भूमीत भगवान बुद्ध यांचा बोध जगासाठी प्रकट झाला. समाजसुधारणेसाठी कबीरदास यांच्यासारखे विद्वान इथे जन्मले. समाजाला जोडण्याची गरज होती तेव्हा संत रवीदास जी यांच्या भक्तीच्या शक्तीचे केंद्र देखील हे काशीच बनले होते. ही काशी अहिंसा आणि तपश्चर्येची प्रतिमूर्ति चार जैन तीर्थंकरांची भूमी आहे. राजा हरिश्चंद्र यांच्या सत्यनिष्ठेपासून वल्लभाचार्य आणि रमानन्दजी यांच्या ज्ञानापर्यंत , चैतन्य महाप्रभु आणि समर्थगुरु रामदास यांच्यापासून स्वामी विवेकानंद आणि मदनमोहन मालवीयांपर्यंत कितीतरी ऋषी आणि आचार्यांचा संबंध काशीच्या पवित्र भूमीशी राहिला आहे. छत्रपति शिवाजी महाराज यांनी इथूनच प्रेरणा घेतली. राणी लक्ष्मी बाई पासून चंद्रशेखर आज़ाद यांच्यापर्यंत कितीतरी स्वातंत्र्य सैनिकांची कर्मभूमि-जन्मभूमि ही काशीच होती. भारतेन्दु हरिश्चंद्र, जयशंकर प्रसाद, मुंशी प्रेमचंद, पंडित रविशंकर, आणि बिस्मिल्लाह खान सारखे प्रतिभावंत, , या आठवणी कुठपर्यंत जातील, किती नावे घ्यायची! भांडार भरलेले आहे. ज्याप्रमाणे काशी अनंत आहे तसेच काशीचे योगदान देखील अनंत आहे. काशीच्या विकासात या अनंत पुण्य-आत्म्यांच्या ऊर्जेचा समावेश आहे. या विकासात भारताच्या अनंत परंपरांचा वारसा आहे. म्हणूनच विविध मत-मतांतर असलेले लोक , विविध भाषा-वर्गाचे लोक इथे येतात तेव्हा त्यांना इथे त्यांचे बंध जुळलेले आढळतात.
मित्रांनो ,
काशी आपल्या भारताची सांस्कृतिक आध्यात्मिक राजधानी तर आहेच ,ही भारताच्या आत्म्याचा एक जिवंत अवतार देखील आहे. तुम्ही पहा, ,पूर्व आणि उत्तरेला जोडत उत्तर प्रदेशात वसलेली ही काशी, इथले विश्वनाथ मंदिर उध्वस्त करण्यात आले, मंदिराची पुनर्निर्मिती माता अहिल्याबाई होळकर यांनी केली.ज्यांची जन्मभूमी महाराष्ट्र होती आणि कर्मभूमी इंदूर -माहेश्वर आणि अनेक क्षेत्रांमध्ये होती. त्या माता अहिल्याबाई होळकर यांना आज या निमित्ताने मी वंदन करतो. दोनशे-अडीचशे वर्षांपूर्वी त्यांनी काशीसाठी एवढे काही केले. त्यानंतर आता काशीच्या विकासासाठी एवढे काम झाले आहे.
मित्रांनो,
बाबा विश्वनाथ मंदिराचे तेज वाढवण्यासाठी पंजाब मधून महाराजा रणजीत सिंह यांनी 23 मण सोने चढवले होते ,मंदिराचा कळस सोन्याने मढवला होता. पंजाब मधून पूज्य गुरुनानक देव जी देखील काशीमध्ये आले होते. इथे सत्संग केला होता. दुसऱ्या शीख गुरूंचे देखील काशीशी विशेष नाते होते.
पंजाबच्या जनतेने काशीच्या पुनरुद्धारासाठी भरभरून दान केले होते. पूर्वेकडे, बंगालच्या राणी भवानीने आपल्याकडे असलेले सारे काही बनारसच्या विकासासाठी अर्पण केले. म्हैसूर आणि दुसऱ्या दक्षिण भारतीय राजांचेही बनारसच्या विकासात मोठे योगदान राहिले आहे. हे असे शहर आहे जिथे आपल्याला उत्तर, दक्षिण, नेपाळी जवळजवळ प्रत्येक शैलीतले मंदिर दिसेल. विश्वनाथ मंदिर याच आध्यात्मिक चेतनेचे केंद्र राहिले आहे आणि आता भव्य स्वरूपातला हा विश्वनाथ धाम परिसर याला आणखी शक्ती देईल.
मित्रांनो,
दक्षिण भारतातल्या लोकांची काशीबद्दलची श्रद्धा, दक्षिण भारताचा काशीवर आणि काशीचा दक्षिणेवरचा प्रभाव आपण सर्वजण जाणतोच.एका ग्रंथात म्हटले आहे-
- तेनो-पयाथेन कदा-चनात्, वाराणसिम पाप-निवारणन। आवादी वाणी बलिनाह, स्वशिष्यन, विलोक्य लीला-वासरे, वलिप्तान।
कन्नड़ भाषेत हे म्हटले आहे, म्हणजे , जेव्हा
जगद्गुरु माधवाचार्य जी आपल्या शिष्यांसमवेत चालत जात होते तेव्हा त्यांनी सांगितले की काशी विश्वनाथ, पापाचे निवारण करतात.त्यांनी आपल्या शिष्यांना काशीचे वैभव आणि त्याचे महात्म्यही सांगितले.
मित्रांनो,
शतकानुशतके ही भावना टिकून राहिली आहे. काशीच्या प्रवासाने ज्यांच्या जीवनाची दिशाच बदलली त्या महाकवी सुब्रमण्य भारती यांनी तमिळमध्ये लिहिले आहे, "कासी नगर पुलवर पेसुम उरई दान, कान्जिइल के-पदर्कोर, खरुवि सेवोम" म्हणजे काशी नगरीच्या संतकवीचे भाषण कांचीपुरमध्ये ऐकण्यासाठी साधन निर्माण करू. काशीमधून प्राप्त झालेला प्रत्येक संदेश इतका व्यापक आहे की देशाची दिशा बदलण्याचे सामर्थ्य त्यात आहे. मला आणखी एक सांगायचे आहे. माझा जुना अनुभव आहे. इथल्या घाटावर राहणारे, नावाडी अनेक बनारसी मित्र आपण रात्री कधी ऐकले असेल तमिळ, कन्नड, तेलुगू, मल्याळम इतक्या झोकात बोलतात ते ऐकून आपल्याला वाटते की आपण , केरळ- तामिळनाडूमध्ये तर आलो नाही ना ! इतके उत्तम बोलतात.
मित्रांनो,
हजारो वर्षांपासून भारताची ऊर्जा अशाच प्रकारे सुरक्षित राहिली आहे, जपली गेली आहे. जेव्हा विविध ठिकाणे, प्रदेश एका सूत्राने बांधले जातात तेव्हा भारत 'एक भारत, श्रेष्ठ भारत' म्हणून जागृत होतो. म्हणूनच आपल्याला 'सौराष्ट्र सोमनाथम्' पासून 'अयोध्या मथुरा माया, काशी कांची अवंतिका' पर्यंत सर्वांचे दररोज स्मरण करायला शिकवले जाते. आपल्याकडे फक्त बारा ज्योतिर्लिंगांचे स्मरण केल्याचे फलित सांगितले जाते - "तस्य तस्य फल प्राप्तिः, भविष्यति न संशयः". म्हणजेच सोमनाथ ते विश्वनाथ या बारा ज्योतिर्लिंगाचे स्मरण करून प्रत्येक संकल्प सिद्ध होतो, यात कोणतीही शंका नाही. ही शंका नाही कारण या स्मरणाच्या निमित्ताने संपूर्ण भारताचा आत्मा एकरूप होतो. आणि भारताची अनुभूती आल्यावर शंका कुठे उरते, अशक्य काय उरते?
मित्रांनो,
काशीने जेव्हा जेव्हा कूस बदलली, तेव्हा काहीतरी नवीन केले आहे, देशाचे भाग्य बदलले आहे, हा निव्वळ योगायोग नाही. काशीमध्ये गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेला विकासाचा महायज्ञ आज नवी ऊर्जा प्राप्त करत आहे. काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण भारताला निर्णायक दिशा देईल, एका उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाईल. हा परिसर आपल्या सामर्थ्याचा, कर्तव्याचा साक्षीदार आहे. जर निर्धार ठाम असेल, जिद्द असेल तर काहीही अशक्य नाही. प्रत्येक भारतीयाच्या अंगात ती शक्ती आहे जी अकल्पनीय गोष्टी सत्यात उतरवते. आम्हाला तपस्या माहित आहे, तपश्चर्या माहित आहे, देशासाठी रात्रंदिवस कसे खपायचे हे माहित आहे. आव्हान कितीही मोठे असले तरी आपण भारतीय मिळून त्याचा पराभव करू शकतो. विनाश करणाऱ्याची शक्ती भारताच्या शक्तीपेक्षा आणि भारताच्या भक्तीपेक्षा कधीही मोठी असू शकत नाही. लक्षात ठेवा, जसे आपण स्वतःला पाहतो तसे जग आपल्याला पाहील. मला आनंद आहे की शतकानुशतके गुलामगिरीचा आपल्यावर जो पगडा होता, ज्या न्यूनगंडाने भारत पछाडला होता, त्यातून आजचा भारत बाहेर पडत आहे. आजचा भारत केवळ सोमनाथ मंदिराची शोभा वाढवत नाही, तर समुद्रात हजारो किलोमीटरचा ऑप्टिकल फायबरही टाकत आहे. आजचा भारत केवळ बाबा केदारनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करत नाही, तर स्वत:च्या बळावर भारतीयांना अवकाशात पाठवण्याची तयारी करत आहे. आजचा भारत अयोध्येत केवळ भगवान श्री रामाचे मंदिर बांधत नाही तर देशातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयेही उघडत आहे. आजचा भारत केवळ बाबा विश्वनाथ धामला भव्य स्वरूप देत नाही तर गरिबांसाठी करोडो पक्की घरे बांधत आहे.
मित्रांनो,
नव्या भारतालाही आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे आणि आपल्या क्षमतेवरही तितकाच विश्वास आहे. नव्या भारताला विकासासोबतच वारसाही आहे. अयोध्येपासून जनकपूरपर्यंतचा प्रवास सोपा व्हावा यासाठी राम-जानकी रस्ता बनवला जात आहे. आज भगवान रामाशी संबंधित ठिकाणे रामायण सर्किटशी जोडली जात आहेत आणि रामायण ट्रेनही चालवली जात आहे. बुद्ध सर्किटचे काम सुरू असताना कुशीनगरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळही बांधण्यात आले आहे, कर्तारपूर साहिब कॉरिडॉर बांधण्यात आला आहे, तर हेमकुंड साहिबला जाणे सोपे व्हावे यासाठी रोपवे बांधण्याचीही तयारी सुरू आहे. उत्तराखंडमधील चारधाम रस्ता महा प्रकल्पाचे कामही वेगाने सुरू आहे. भगवान विठ्ठलाच्या कोट्यवधी भक्तांच्या आशीर्वादाने श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे कामही काही आठवड्यांपूर्वीच सुरू झाले आहे.
मित्रांनो,
केरळमधील गुरुवायूर मंदिर असो वा तामिळनाडूमधील कांचीपुरम-वेलंकणी, तेलंगणातील जोगुलांबा देवी मंदिर असो किंवा बंगालमधील बेलूर मठ, गुजरातमधील द्वारका जी असो की अरुणाचल प्रदेशातील परशुराम कुंड असो, देशातील विविध राज्यांमध्ये आपली श्रद्धा आणि संस्कृतीशी निगडित अशा अनेक पवित्र स्थळांवर पूर्ण भक्तीभावाने काम करण्यात आले आहे, काम सुरू आहे.
बंधू आणि भगिनींनो,
आजचा भारत आपला गमावलेला वारसा पुन्हा जिवंत करत आहे. येथे काशीमध्ये माता अन्नपूर्णा स्वतः वास करते. काशीतून चोरीला गेलेली अन्नपूर्णा मातेची मूर्ती शंभर वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता पुन्हा काशीत स्थापन झाल्याचा मला आनंद आहे. अन्नपूर्णा मातेच्या कृपेने देशाने कोरोनाच्या कठीण काळात धान्याची कोठारे उघडली, कोणीही गरीब उपाशी राहू नये याची काळजी घेतली, मोफत रेशनची व्यवस्था केली.
मित्रांनो,
आपण जेव्हा देवाचे दर्शन घेतो, देवळात जातो , तेव्हा अनेकदा देवाकडे काहीतरी मागतो, काही संकल्प करतो. माझ्यासाठी तर जनताजनार्दन हे ईश्वराचे रूप आहे. माझ्यासाठी प्रत्येक भारतीय हा ईश्वराचा अंश आहे. लोक जसे देवाकडे जाऊन काही मागतात, त्याचप्रमाणे मीही तुम्हाला देव मानत असल्याने, जनताजनार्दन हे ईश्वराचे रूप मानत असल्याने आज मी तुमच्याकडे काही मागू इच्छितो. आज मी तुमच्याकडे काहीतरी मागत आहे. स्वतःसाठी नाही तर आपल्या देशासाठी मला तुमच्याकडून तीन संकल्प हवे आहेत. विसरू नका, मला तीन संकल्प हवे आहेत आणि बाबांच्या पवित्र भूमीवर मी ते मागत आहे - पहिला स्वच्छतेचा, दुसरा सृजनाचा आणि तिसरा आत्मनिर्भर भारतासाठी निरंतर प्रयत्नांचा. स्वच्छता ही जीवनशैली आहे, स्वच्छता ही शिस्त आहे. स्वच्छतेसोबत कर्तव्यांची एक मोठी शृंखलाही येते . भारत स्वच्छ राहिला नाही तर त्याचा कितीही विकास झाला तरी पुढे जाणे आपल्याला अवघड होईल. यासाठी आपण बरेच काही केले आहे परंतु आपल्याला आपले प्रयत्न अधिक वाढवायला हवेत. कर्तव्याच्या भावनेने भरलेला तुमचा छोटासा प्रयत्न देशासाठी खूप उपयुक्त ठरेल. इथे बनारसमध्येही, शहरात, घाटांवर, स्वच्छतेची नवी उंची आपल्याला गाठायची आहे. गंगेच्या स्वच्छतेसाठी उत्तराखंडपासून बंगालपर्यंत अनेक प्रयत्न सुरू आहेत. नमामि गंगे अभियान यशस्वी होण्यासाठी आपल्याला सजगतेने काम करत राहिले पाहिजे.
मित्रांनो,
गुलामगिरीच्या प्रदीर्घ कालखंडाने आम्हा भारतीयांच्या आत्मविश्वासाला अशा प्रकारे तडा दिला की, आपण आपल्यातील सृजनशीलतेवरचा विश्वास गमावून बसलो. हजारो वर्षांच्या या पुरातन काशीतून आज मी प्रत्येक देशवासीयाला आवाहन करतो - संपूर्ण आत्मविश्वासाने सृजनाची कास धरा,नवे पायंडे निर्माण करा,अभिनवतेची कास धरा. भारतातील तरुण जेव्हा कोरोनाच्या या कठीण काळात शेकडो स्टार्ट अप्स तयार करू शकतात, अनेक आव्हानांचा सामना करत 40 हून अधिक युनिकॉर्न तयार करू शकतात, तेव्हा काहीही अशक्य नसल्याचे ते यातून सिद्ध करतात. विचार करा, एक युनिकॉर्न म्हणजेच स्टार्ट-अप सुमारे सात-सात हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे आणि गेल्या दीड वर्षात, इतक्या कमी कालावधीत ही निर्मिती झाली आहे. हे अभूतपूर्व आहे. प्रत्येक भारतीय, तो कुठेही असेल, कोणत्याही क्षेत्रात असेल, देशासाठी काहीतरी अभिनव करण्याचा प्रयत्न करेल, तेव्हाच नवे मार्ग सापडतील, नवे मार्ग तयार होतील आणि प्रत्येक नवे लक्ष्य गाठले जाईल.
बंधू आणि भगिनिंनो,
आज आपल्याला तिसरा संकल्प करायचा आहे तो म्हणजे आत्मनिर्भर भारतासाठी आपले प्रयत्न वाढवण्याचा. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा हा काळ आहे. स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात आपण आहोत. भारत जेव्हा स्वातंत्र्याची शंभर वर्षे साजरे करत असताना भारत कसा असेल यासाठी आतापासूनच काम करावे लागेल. आणि यासाठी आपण आत्मनिर्भर असणे आवश्यक आहे. जेव्हा आपण स्वदेशी वस्तूंचा अभिमान बाळगू, जेव्हा आपण स्थानिक उत्पादनांसाठी आग्रही राहू , जेव्हा आपण भारतीयांनी घाम गाळून बनवलेल्या वस्तू खरेदी करू, तेव्हा आपण या मोहिमेला साहाय्य करू. अमृतमहोत्सवात 130 कोटी देशवासीयांच्या प्रयत्नाने भारत आगेकूच करत आहे. महादेवाच्या कृपेने, प्रत्येक भारतीयाच्या प्रयत्नाने आपण आत्मनिर्भर भारताचे स्वप्न प्रत्यक्षात साकारताना पाहू. त्याच श्रद्धेने मी पुन्हा एकदा बाबा विश्वनाथ, माता अन्नपूर्णा, काशी-कोतवाल आणि सर्व देवतांच्या चरणी पुन्हा प्रणाम करतो. देशाच्या कानाकोपऱ्यातून पूज्य संत-महात्मे इथे इतक्या मोठ्या संख्येने आले आहेत, हे आपल्यासाठी , माझ्यासारख्या सामान्य नागरिकासाठी भाग्याचे क्षण आहेत. सर्व संतांचे आणि सर्व पूज्य महात्म्यांचे मी नतमस्तक होऊन अभिनंदन करतो. आज मी पुन्हा एकदा सर्व काशीवासियांचे, देशवासियांचे अभिनंदन करतो, खूप खूप शुभेच्छा देतो.
! हर हर महादेव !
* * *
S.Patil/Radhika/Sushma/Nilima/Vasanti/Sonali K/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1781103)
Visitor Counter : 351
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam