संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

1971 च्या युद्धातील भारताच्या विजयाच्या 50 वर्षांच्या स्मरणार्थ संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह यांच्या हस्ते ‘स्वर्णिम विजय पर्व’चे उद्घाटन


युद्धात विजय मिळवून देणाऱ्या शूर भारतीय सैनिकांना  वाहिली आदरांजली ;त्यांनी दिलेल्या बलिदानाबद्दल देश सदैव ऋणी राहील -  राजनाथ सिंह

Posted On: 12 DEC 2021 6:30PM by PIB Mumbai

 

नवी दिल्लीतील इंडिया हिरवळीवर आज, म्हणजेच, 12 डिसेंबर 2021 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी १९७१ च्या भारत-पाक युद्धात बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी,सशस्त्र दलांनी दाखवलेले  शौर्य आणि अनुभवाच्या आधारावर केलेली कामगिरी  आणि त्यांच्या योगदानाचे स्मरण करणारा कार्यक्रम स्वर्णिम विजय पर्वया विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन केले. हा कार्यक्रम 1971 च्या  युद्धातील भारताच्या विजयाच्या 50 वर्षांच्या वर्षभरातील सर्व उत्सवांची सांगता करणारा, मुख्य कार्यक्रम ठरला आहे.  08 डिसेंबर 2021 रोजी तामिळनाडू येथे हेलिकॉप्टर अपघातात निधन झालेले देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) जनरल बिपिन रावत यांना श्रद्धांजली अर्पण करून राजनाथ सिंह यांनी भाषणाची सुरुवात केली. जनरल रावत यांच्या अकाली निधनाने भारताने एक शूर सैनिक, एक सक्षम सल्लागार आणि एक चैतन्यदायी  व्यक्ती गमावली आहे. स्वर्णिम विजय पर्व मध्ये भाग घेण्यासाठी ते उत्सुक होते , असे त्यांनी सांगितले.

दक्षिण आशियाचा इतिहास आणि भूगोल ज्या युद्धातील विजयाने बदलला त्या 1971 च्या युद्धात भारतीय सशस्त्र दलांच्या गौरवशाली विजयाचे स्मरण करणारे स्वर्णिम विजय पर्वहा एक उत्सव असल्याचे संरक्षण मंत्री म्हणाले. 1971 च्या युद्धात विजय सुनिश्चित करणारे शूर भारतीय सैनिक, नौसैनिक आणि हवाई योद्धे आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांनी आदरांजली वाहिली आणि ते म्हणाले की, त्यांनी दिलेल्या बलिदानाबद्दल देश सदैव ऋणी राहील. 1971 च्या विजयाच्या आठवणी आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात ताज्या आहेत आणि त्या आठवणींचा हा उत्सव आहे. त्याच वेळी,हे पर्व  1971 च्या युद्धात आपल्या सैन्याने दाखवलेला  आवेश, धैर्य आणि शौर्याचे  प्रतीक आहे. याच आवेशाने आणि हिरिरीने देशाला प्रगतीच्या मार्गावर पुढे जाण्याची प्रेरणा मिळते, असे ते म्हणाले. .

राजनाथ सिंह यांनी युद्धादरम्यान भारतीय सशस्त्र दलांचा दृढनिश्चय, समन्वय आणि शौर्याचे स्मरण केले.1971 चे युद्ध हे भारताच्या नैतिकता आणि लोकशाही परंपरांचे उत्कृष्ट उदाहरण आहे असे सांगत ते म्हणाले की, स्वर्णिम विजय पर्व ही  केवळ कोणतीही  विशेष मोहीम  नाही, तर सशस्त्र दलाच्या आणि संपूर्ण देशाच्या विजयाच्या भावनेचा उत्सव आहे.

20 व्या शतकातील दोन महायुद्धांनंतर जगातील सर्वात निर्णायक युद्धांपैकी एक असे संरक्षण मंत्र्यांनी 1971 च्या युद्धाला संबोधले. ''धर्माच्या आधारावर भारताची फाळणी ही ऐतिहासिक चूक होती हे या युद्धाने अधोरेखित केले," असे संरक्षण मंत्री यावेळी म्हणाले.

ते म्हणाले की, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदाची आणि लष्करी व्यवहार विभागाची निर्मिती या काही सुधारणा असून या सुधारणा  सशस्त्र दलांच्या भविष्यातील गरजा पूर्ण करतील.खरेदीपासून उत्पादनापर्यंत, सशस्त्र दलांना अधिक सक्षम, कार्यक्षम आणि आत्मनिर्भर  बनवण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत.संरक्षण संशोधन, विकास आणि उत्पादन क्षेत्रात खाजगी क्षेत्राच्या सहभागाला प्रोत्साहन दिले जात आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाच्या माध्यमातून संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

या कार्यक्रमादरम्यान बांगलादेशचे मुक्ति युद्ध व्यवहार मंत्री  मोझम्मल हक आणि मुक्ती जोद्धा (योद्धा) यांच्या संदेशाची  चित्रफीत  दाखवण्यात आली . त्यानंतर वॉल ऑफ फेमचे अनावरण करण्यात आले आणि 1971 च्या युद्धात वापरलेली प्रमुख शस्त्रे आणि उपकरणे दाखवण्यात आली.

येत्या दोन दिवसांच्या कालावधीत लाइट अँड साउंड शो, डॉग शो, हॉट एअर बलूनिंग या व्यतिरिक्त कलारीपयट्टू, गटका आणि खुकरी नृत्य सादरीकरण या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.युद्धावर आधारित  चित्रपट आणि 1971 च्या युद्धाच्या पूर्व आणि पश्चिम आघाडीवरील प्रमुख मोहिमांचे  चित्रण करणारे भव्य युद्ध प्रदर्शन देखील प्रदर्शित केले जाईल, PT-76 रणगाड्यांच्या  त्रिमितिचित्रात्मक प्रतिकृती आणि तयार केलेल्या नमुन्यांच्या माध्यमातून .साकारलेल्या , पाकिस्तानी ठिकाणे  काबीज करणार्‍या चार सर्वात नेत्रदीपक मोहिमा या युद्धप्रदर्शनात पाहता येणार आहेत.

हा कार्यक्रम स्वर्णीम विजय मशालीच्या  वर्षभराच्या प्रवासाचा अंतिम टप्पा असेल. संपूर्ण देशात प्रवास करून  युद्धातील शूर सैनिकांच्या गावातील माती संकलित केलेली स्वर्णीम विजय मशाल 16 डिसेंबर 2021 रोजी एका भव्य समारंभात नवी दिल्लीत एकत्र येईल.

संरक्षण  राज्य मंत्री  अजय भट्ट, लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे; हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी, नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार;संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार, सचिव (माजी सैनिक कल्याण)  बी आनंद, आर्थिक सल्लागार (संरक्षण सेवा)   संजीव मित्तल; संरक्षण मंत्रालयाचे इतर वरिष्ठ नागरी आणि लष्करी अधिकारी; राष्ट्रीय छात्रसेनेचे   (एनसीसी ) छात्र  आणि सामान्य नागरिक  या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी  उपस्थित होते.

***

R.Aghor/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1780692) Visitor Counter : 379