संरक्षण मंत्रालय
'22 वी किलर स्क्वॉड्रन्स' या क्षेपणास्त्र युद्धनौकेवरील तुकडीला प्रेसिडेंट'स स्टॅंडर्ड हा विशेष सन्मान प्रदान केला जाणार
Posted On:
05 DEC 2021 5:32PM by PIB Mumbai
नौदल कवायतीद्वारे 22 वी क्षेपणास्त्र युद्धनौकेवरील तुकडी, (वेसल स्क्वॉड्रन, जिला किलर स्क्वॉड्रन म्हणूनही ओळखले जाते, अशा नौदल तुकडीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते, मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे 08 डिसेंबर 21 रोजी प्रेसिडेंट'स स्टॅंडर्ड हा सन्मान समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे. या समारंभाच्या गौरवार्थ एका टपाल तिकिटासह, एक विशेष कव्हर देखील टपाल विभागाद्वारे प्रकाशित केले जाईल.
या समारंभाला महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि नौदल विभागप्रमुख तसेच इतर अनेक नागरी आणि लष्करातील मान्यवर अधिकारी उपस्थित राहतील. राष्ट्रासाठी केलेल्या सेवाकार्यासाठी सर्वोच्च अधिका-यांनी लष्करी तुकडीला दिलेला सर्वोच्च सन्मान म्हणजे प्रेसिडेंट'स स्टॅंडर्ड पुरस्कार. दिनांक 27 मे 1951 रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते भारतीय नौदलाला प्रेसिडेंट कलर्स म्हणजेच 'राष्ट्रपती ध्वज' हा सन्मान प्रदान करण्यात आला होता. प्रेसिडेंट स्टँडर्ड हा सन्मानही प्रेसिडेंट कलर्सच्याच पातळीचा असून तो तुलनेने लहान लष्करी तुकडीला किंवा समूहाला दिला जातो.
क्षेपणास्त्र युद्धनौकेवरील 22 व्या तुकडीची औपचारिक स्थापना ऑक्टोबर 1991 मध्ये मुंबईत दहा वीर श्रेणी आणि तीन प्रबळ श्रेणीच्या क्षेपणास्त्र नौकांसह करण्यात आली होती. तथापि, 'किलर्स' चा उदय 1969 पासूनचा आहे . भारतीय नौदलाची ताकद वाढवण्यासाठी तेव्हाच्या USSR (युनायटेड सॉव्हरेन स्टेट्स ऑफ रशिया) मधून OSA I या श्रेणीच्या क्षेपणास्त्र नौकांचा समावेश करण्यात आला आहे. या क्षेपणास्त्र नौका मोठे वजन वाहू शकणाऱ्या व्यावसायिक जहाजांवरुन भारतात आणल्या गेल्या आणि 1971 च्या सुरुवातीस कोलकाता येथे तैनात करण्यात आल्या. 1971 च्या भारत-पाक युद्धादरम्यान त्यांची अग्नीपरीक्षा झाली. या युद्धात त्यांनी परिणामकारक आणि निर्णायक भूमिका बजावली.
04-05 डिसेंबर 1971 च्या रात्री, भारतीय नौदलातील सर्वात तरुण योद्धांनी पाकिस्तानच्या नौदलावर विनाशकारी आक्रमण केले. भारतीय नौदलाची जहाजे निर्घाट, निपत आणि वीर यांनी त्यांची स्टाईक्स ही युद्धनौका रोधी क्षेपणास्त्रे डागली आणि पाकिस्तान नौदलाची खैबर आणि मुहाफिझ ही जहाजे बुडवली, ज्यामुळे पाकिस्तानच्या नौदलाच्या आकांक्षांना प्राणघातक धक्का बसला आणि पुढील अनेक वर्षे ते कोलमडलेलेच राहिले. ऑपरेशन ट्रायडंट असे सांकेतिक नाव असलेले, हे ऑपरेशन नौदलाच्या आधुनिक इतिहासातील सर्वात यशस्वी ऑपरेशन्सपैकी एक मानले जाते, ज्यामध्ये भारतीय सैन्याची कोणतीही जीवितहानी झाली नाही. अथक परीश्रम करणाऱ्या भारतीय नौदलाने दिनांक 8/9 डिसेंबरच्या रात्री आणखी एक धाडसी हल्ला केला, जेव्हा INS विनाशने दोन फ्रिगेट्ससह चार स्टाईक्स क्षेपणास्त्रे डागली, पाकिस्तान नौदल ताफ्याचा टँकर डाका बुडवला आणि कराची येथील केमारी ऑइल स्टोरेज सुविधेचे मोठे नुकसान केले. यातही पुन्हा, भारतीय नौदलाचे कोणतेही नुकसान झाले नाही. जहाजे आणि स्क्वाड्रनमधील जवानांच्या या स्पृहणीय कर्तृत्वामुळेच त्यांना ‘किलर’ ही पदवी मिळाली आणि तेव्हापासून भारतीय नौदल 04 डिसेंबर हा 'नौदल दिन' म्हणून साजरा करते.
2021 हे वर्ष 1971 च्या या युद्धातील विजयाचा 50 वा वर्धापन दिन आहे आणि देशभरात स्वर्णिम विजय वर्ष म्हणून साजरा केला जात आहे. गेल्या पाच दशकांमध्ये समुद्रातून विश्वासार्ह कामगिरी बजावण्याची क्षमता असणाऱ्या किलर्सच्या कार्याला यंदा पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय नौदलाच्या स्वार्ड आर्मच्या अग्रभागी असलेली, युद्धासाठी सज्ज अशी ही क्षेपणास्त्र युद्धनौका ऑपरेशन विजय, ऑपरेशन पराक्रम यानंतर अगदी अलीकडे, पुलवामा हल्ल्यानंतर वाढविलेल्या सुरक्षा स्थितीत पाकिस्तानच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर तैनात करण्यात आली होती. एक महावीर चक्र, सात वीर चक्र आणि आठ नौसेना पदके (शौर्य) यासह अनेक प्रतिष्ठित युद्ध सन्मान मिळविल्याचा स्क्वॉड्रनला अभिमान आहे, जो किलर्सच्या शौर्याची साक्ष देतो. 22 व्या क्षेपणास्त्र युद्धनौका स्क्वॉड्रनमधील सर्वात तरुण आणि सर्वात प्रेरित जवानांद्वारे चालवले जाणारे, अत्याधुनिक शस्त्रे आणि सेन्सर्सने सुसज्ज असलेले हे प्राणविघातक जहाज उच्च गतीने आणि गुप्त हल्ले करण्यास सक्षम असून शत्रूंकडून होणाऱ्या कोणत्याही आगळीकीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी नौदलाने राष्ट्राला दिलेले हे अभिवचन आहे. या निर्भय युद्धनौकाच्या परिचालनासाठी प्रेसिडेंट'स स्टॅंडर्ड सन्मान प्रदान करणे, ही त्या वीरांना योग्य आदरांजली आहे ज्यांनी या 'किलर स्क्वाड्रन'चा एक भाग म्हणून देशाची अमूल्य सेवा केली आहे.
***
R.Aghor/S.Shaikh/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1778261)
Visitor Counter : 316