पंतप्रधान कार्यालय

उत्तराखंडमध्ये डेहराडून येथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 04 DEC 2021 6:21PM by PIB Mumbai

उत्तराखंड का, सभी दाणा सयाणौ, दीदी-भूलियौं, चच्ची-बोडियों और भै-बैणो। आप सबु थैं, म्यारू प्रणाम ! मिथै भरोसा छ, कि आप लोग कुशल मंगल होला ! मी आप लोगों थे सेवा लगौण छू, आप स्वीकार करा !

उत्तराखंड चे राज्यपाल श्रीयुत गुरमीत सिंह जी, येथील लोकप्रिय, ऊर्जावान मुख्यमंत्री श्रीयुत पुष्कर सिंह धामी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी प्रह्लाद जोशी जी, अजय भट्ट जी, उत्तराखंडचे मंत्री सतपाल महाराज जी, हरक सिंह रावत जी, राज्य मंत्रिमंडळातील इतर सदस्य, संसदेमधील माझे सहकारी निशंक जी, तीरथ सिंह रावत जी, इतर खासदार, भाई त्रिवेंद्र सिंह रावत जी, विजय बहुगुणा जी, राज्य विधानसभेचे इतर सदस्य, महापौर महोदय, जिल्हा परिषदेचे सदस्य, भाई मदन कौशिक जी आणि माझ्या प्रिय बंधुभगिनींनो,

तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आम्हाला आशीर्वाद द्यायला आला आहात. तुमचा स्नेह, तुमचे आशीर्वाद मिळाल्यामुळे आम्ही सर्व उपकृत झालो आहोत. उत्तराखंड ही केवळ संपूर्ण देशाचे श्रद्धास्थानच नाही तर कर्म आणि कर्मठता यांची ही भूमी आहे. म्हणूनच या क्षेत्राचा विकास, या भागाला भव्य स्वरुप देणे याला डबल इंजिन सरकारचे सर्वाधिक प्राधान्य आहे. याच भावनेने गेल्या पाच वर्षात उत्तराखंडच्या विकासासाठी केंद्र सरकारने एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. येथील सरकार इतक्या वेगाने या सर्व योजना प्रत्यक्षात आणत आहे. त्यांनाच पुढे नेत आज 18 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमीपूजन करण्यात आले आहे. यामध्ये दळणवळण व्यवस्था असो, आरोग्य असो, संस्कृती असो, तीर्थयात्रा असो, वीज असो, बालकांसाठी विशेषत्वाने तयार केलेला चाईल्ड फ्रेंडली सिटी प्रकल्प असो, जवळ जवळ सर्वच क्षेत्रांशी संबंधित प्रकल्प यात समाविष्ट आहेत. गेल्या काही वर्षातील कठोर परिश्रमांनंतर अनेक आवश्यक प्रक्रियांच्या पूर्ततेनंतर अखेर आज हा दिवस उगवला आहे. हे प्रकल्प, मी केदारपुरीच्या या पवित्र धरणीला सांगितले होते, आज मी डेहराडूनमध्ये त्याचा पुनरुच्चार करत आहे. हे प्रकल्प या दशकाला उत्तराखंडचे दशक बनवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील. या सर्व प्रकल्पांसाठी मी उत्तराखंडच्या लोकांचे खूप खूप अभिनंदन करत आहे. खूप खूप शुभेच्छा देत आहे. जे लोक विचारतात की डबल इंजिन सरकारचा काय उपयोग आहे, त्यांना आज हे दिसू शकेल की डबल इंजिनाच्या सरकारमुळे कशा प्रकारे उत्तराखंडमध्ये विकासाची गंगा वाहत आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

या शतकाच्या सुरुवातीला अटल बिहारी वाजपेयीजींनी भारतात कनेक्टिविटी वाढवण्याची मोहीम सुरू केली. पण त्यानंतर 10 वर्षात देशात अशा प्रकारचे सरकार होते ज्या सरकारने देशाचा, उत्तराखंडचा बहुमूल्य वेळ वाया घालवला. 10 वर्षात देशात पायाभूत सुविधांच्या नावावर घोटाळे झाले, गैरप्रकार झाले. यामुळे देशाचे जे नुकसान झाले त्याची भरपाई करण्यासाठी आम्ही दुप्पट वेगाने कष्ट केले आणि आजही करत आहोत. आज भारत, अत्याधुनिक पायाभूत सुविधांवर 100 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीच्या उद्देशाने पुढे जात आहे. आज भारताचे धोरण गतिशक्तीचे आहे, दुप्पट तिप्पट वेगाने काम करण्याचे आहे. वर्षानुवर्षे रखडणारे प्रकल्प, कोणत्याही तयारी विना उद्घाटनाच्या फिती कापत बसण्याच्या पद्धतींना मागे टाकून आज भारत नवनिर्मितीमध्ये गुंतलेला आहे. 21 व्या शतकाच्या या कालखंडात भारतात कनेक्टिविटीचा एक असा महायज्ञ सुरू आहे, जो भारताला विकसित देशांच्या साखळीमध्ये आणण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावेल. या महायज्ञामधीलच एक यज्ञ आज या देवभूमीमध्ये होत आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

या देवभूमीमध्ये भाविकही येतात, उद्योजकही येतात, निसर्गप्रेमी पर्यटकही येतात. या भूमीचे जे सामर्थ्य आहे ते वाढवण्यासाठी येथे आधुनिक पायाभूत सुविधांवर अभूतपूर्व काम करण्यात येत आहे.

चारधाम ऑल वेदर रोड प्रकल्पांतर्गत आज देवप्रयाग हून श्रीकोट आणि ब्रह्मपुरीतून कौड़ियालामध्ये, जाण्यासाठी  या ठिकाणच्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले आहे. भगवान बद्रीनाथाचे दर्शन घेण्यासाठी जाताना लाम-बगड़ भूस्खलनाच्या रुपात जे अडथळे यायचे ते देखील आता दूर करण्यात आले आहेत. दरडी कोसळण्याच्या या प्रकारांमुळे देशभरातील कित्येक भाविकांना एकतर बद्रीनाथ दर्शनासाठी प्रवास करण्याचा विचार सोडून द्यावा लागला किंवा अनेक तास प्रतीक्षा करावी लागली तर काही लोक तर कंटाळून आणि थकूनभागून माघारी देखील परतले. आता बद्रिनाथ तीर्थयात्रा पूर्वीपेक्षा जास्त सुरक्षित आणि सुखद होईल. आज बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमनोत्री धाम येथे अनेक सोयीसुविधांशी संबंधित नव्या प्रकल्पांच्या कामाचा देखील प्रारंभ झाला आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

अधिक चांगली कनेक्टिविटी आणि सोयीसुविधांमुळे पर्यटन आणि तीर्थयात्रेला किती प्रमाणात फायदा होतो याचा अनुभव आम्ही गेल्या काही वर्षात केदारधाममध्ये घेतला आहे. केदारनाथमधल्या जलप्रलयापूर्वी 2012 मध्ये 5 लाख 70 हजार लोकांनी दर्शन घेतले होते आणि हा त्या काळातील एक विक्रम होता, 2012 मध्ये भाविकांच्या संख्येने एक मोठा विक्रम केला होता. तर कोरोना काळ सुरू होण्यापूर्वी 2019 मध्ये 10 लाखांपेक्षा जास्त लोकांनी केदारनाथजींचे दर्शन घेतले. म्हणजेच केदारनाथच्या जीर्णोद्धारामुळे केवळ भाविकांच्याच संख्येत वाढ झाली नाही तर तेथील लोकांना रोजगाराच्या स्वयंरोजगाराच्या अनेक संधी देखील उपलब्ध झाल्या.

 

मित्रांनो,

पूर्वी मी जेव्हा उत्तराखंडला येत असे, किंवा उत्तराखंडमध्ये ये-जा करणाऱ्यांची भेट घेत असे, तेव्हा ते लोक सांगायचे, मोदीजी, दिल्लीहून डेहराडूनपर्यंत प्रवास करताना गणेशपूर पर्यंतचा प्रवास अतिशय चांगला होतो पण गणेशपूरहून डेहराडूनपर्यंत प्रवास करताना खूपच त्रास होतो. आज मला अतिशय आनंद होत आहे कारण दिल्ली- डेहराडून इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रकल्पाचे भूमीपूजन झाले आहे आणि जेव्हा प्रकल्प पूर्ण होईल त्यावेळी दिल्लीहून डेहराडूनला ये-जा करण्यासाठी लागणाऱ्या प्रवासाचा वेळ जवळ जवळ निम्मा होईल. यामुळे केवळ डेहराडूनच्याच लोकांना फायदा होणार नाही तर हरिद्वार, मुजफ्फरनगर, शामली, बागपत आणि मेरठ जाणाऱ्या लोकांना देखील त्याचे लाभ मिळतील. ही आर्थिक मार्गिका आता दिल्लीहून हरिद्वारला ये-जा करण्यासाठी लागणाऱ्या वेळेतही बचत करेल. हरिद्वार रिंग रोड प्रकल्पामुळे हरिद्वार शहरात अनेक वर्षांपासून कायम असलेली वाहतूक कोंडीची समस्या देखील दूर होईल.  यामुळे कुमांऊ क्षेत्राशी संपर्क देखील अधिक सहजतेने होईल. त्याशिवाय ऋषिकेशची ओळख असलेल्या लक्ष्मण झुला या पूलाजवळ एक नव्या पुलाचे देखील आज भूमीपूजन झाले  आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

दिल्ली-डेहराडून द्रुतगती मार्ग पर्यावरण सुरक्षेसोबत विकासाच्या आमच्या आदर्शाचे प्रमाण असेल. यामध्ये एका बाजूला उद्योगांसाठी मार्गिका असेल तर यामध्येच आशिया खंडामधील सर्वात मोठी उन्नत वन्यजीव मार्गिका देखील बनेल. या मार्गिकेमुळे वाहतूक तर सुरळीत होईलच पण वन्य जीवांना देखील सुरक्षित संचार करण्यास उपयोग होईल.

 

मित्रांनो,

उत्तराखंडमध्ये औषधी गुणधर्म असलेल्या ज्या वनस्पती आहेत, जी नैसर्गिक उत्पादने आहेत त्यांना जगभरातून मोठी मागणी आहे. उत्तराखंडमध्ये असलेल्या या सामर्थ्याचा देखील अद्याप पुरेपूर वापर झालेला नाही. आता जी आधुनिक अत्तर आणि सुगंध प्रयोगशाळा तयार झाली आहे ती उत्तराखंडच्या या सामर्थ्यामध्ये आणखी वाढ करेल.

 

बंधू आणि भगिनींनो,

आपले डोंगर, आपल्या संस्कृतीचे आपल्या श्रद्धेचे गड तर आहेतच, हे आपल्या देशाच्या सुरक्षेचे किल्ले देखील आहेत.डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांचे जीवन सुकर करणे देशाच्या सर्वाधिक प्राधान्यक्रमाच्या बाबींपैकी एक आहे. मात्र, दुर्दैवाने दशकांपासून जे सरकारमध्ये राहिले त्यांची धोरणे आणि नियोजन यामध्ये कधीही याचा विचारच करण्यात आला नाही. त्यांच्यासाठी उत्तराखंड असो किंवा भारताचा दुसरा कोणतातरी प्रदेश असो, त्यांचा हेतू एकच असायचा आपली स्वतःची तिजोरी भरायची, आपली घरे भरायची, आपल्याच लोकांची काळजी घ्यायची.

 

बंधू आणि भगिनींनो,

आमच्यासाठी उत्तराखंड, तप आणि तपस्या यांचा मार्ग आहे. साल 2007 ते 2014 च्या काळात केंद्रात जे सरकार होते, आमच्या आधी जे सरकार होत त्यांनी सात वर्षात काय काम केलं? आधीच्या सरकारने सात वर्षात उत्तराखंडात केवळ 288, 300 किलोमीटरसुद्धा नाही फक्त 288 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग बांधले. मात्र आमच्या सरकारने आपल्या सात वर्षांच्या काळात  उत्तराखंडात दोन हजार किलोमीटरहूनसुद्धा जास्त लांबीचा राष्ट्रीय महामार्ग निर्माण केला आहे. आता माझ्या बंधू भगिनींनो सांगा बरं याला आपण काम मानता की नाही? यात लोकांचा फायदा आहे की नाही? यामुळे उत्तराखंडचं भलं होईल की नाही? आपल्या भावी पिढीचं भलं यात आहे की नाही? उत्तराखंडाच्या युवकांचं भाग्य फळफळेल की नाही? एवढंच नाही तर आधीच्या सरकारने 7 वर्षात उत्तराखंडातील राष्ट्रीय महामार्गावर जवळपास 600 कोटींचा खर्च केला. आता कान देऊन ऐका, आमच्या सरकारने गेल्या साडेसात वर्षांमध्ये 12 हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च केला आहे, कुठे 600 कोटी रुपये आणि कुठे 12000 कोटी रुपये? आता आपणच सांगा आमच्यासाठी उत्तराखंडाला प्रथम महत्व आहे की नाही? आपल्याला पटतय की नाही पटत? आम्ही करून दाखवलंय की नाही? आम्ही उत्तराखंडसाठी प्राणपणाने काम करतो आहोत की नाही?

 

आणि बंधू- भगिनींनो,

हा फक्त आकड्यांचा खेळ नाही. पायाभूत सुविधांच्या एवढ्या मोठमोठ्या प्रकल्पांवर काम होत असतं तेव्हा अनेक गोष्टींची गरज भसते. सिमेंट हवे, लोखंड हवे, लाकूड हवे, वीटा हव्यात, दगड हवेत, मजूर हवेत, उद्योजक हवेत. यातून स्थानिक युवकांना लाभदायक असे अनेक पर्याय पुढे आणणाऱ्या संधींचे अवकाश खुले होते. या कामांसाठी जे श्रमिक लागतात, अभियंते लागतात, व्यवस्थापन लागते ते बहुतांशी स्थानिक पातळीवरच जमवले जाते. म्हणूनच पायाभूत सुविधांचे हे प्रकल्प उत्तराखंडात रोजगाराची नवीन इकोसिस्टीम तयार करत आहेत, हजारो युवकांना रोजगार देत आहेत. आज मी अभिमानाने सांगतो, पाच वर्षांपूर्वी मी जे बोललो होतो, जे बोलतात ते दुसऱ्यांदा आठवून सांगण्याची शक्ती राजकारण्यांकडे अभावानेच आढळते, माझ्याकडे ती आहे. मी काय बोललो होतो ते आठवून बघा आणि म्हणून आज अभिमानाने सांगू शकतो आहे की  उत्तराखंड क पाणी और जवनि उत्तराखंड क काम ही आली !

 

मित्रहो,

सीमावर्ती डोंगराळ प्रदेशांमध्ये पायाभूत सुविधा उभ्या करण्यावर जेवढे मनावर घेऊन  काम करायला हवे तेवढे मनापासून काम आधीच्या सरकारांनी केले नाही. बॉर्डरजवळ रस्ते बांधले जावेत, पूल बांधले जावेत याकडे त्यांनी लक्ष दिले नाही. वन रँक वन पेन्शन असो, आधुनिक शस्त्रास्त्र असोत  किंवा दहशतवाद्यांना जश्यास तसे उत्तर देणे असो, जणू काही त्यांनी प्रत्येक स्तरावर सेनेना निराश करण्याची, उत्साह नामोहरम करण्याची शपथच घेतली होती. पण आज जे सरकार आहे ते जगातील कोणत्याही देशाच्या दबावाखाली काम करत नाही. आम्ही राष्ट्र प्रथम, सदैव प्रथम या मंत्राने मार्गक्रमणा करणारे लोक आहोत. आम्ही सीमेजवळील डोंगराळ भागात शेकडो किलोमीटरचे नवे रस्ते तयार केले आहेत. आणि हे काम किती महत्वाचे आहे ते उत्तराखंडातील प्रत्येक कुटुंब, आपल्या मुलांना सेनेत पाठवणारे कुटुंब जास्त उत्तम प्रकारे समजू शकते.

 

मित्रहो,

एक काळ असा होता की डोंगरावर वास्तव्य करणारे लोक विकासाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश करण्याची केवळ स्वप्नेच बघत रहात. असा विचार करत पिढ्यानपिढ्या गेल्या,  आपल्याला पुरेशी वीज केव्हा मिळेल, आम्हाला पक्की घरं केव्हा बांधून मिळतील?, आपल्या गावापर्यंत कधीतरी पक्का रस्ता येईल का नाही? चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळतील की नाही? आणि इथून बाहेर जाण्याचा शिरस्ता केव्हा मोडणार? असे कितीतरी प्रश्न येथील लोकांच्या मनात गर्दी करून होते.

 

मित्रहो,

काही करण्याचा ध्यास घेतला की  बदल घडायला, आतून आणि बाहेरूनही बदल घडायला वेळ लागत नाही. आणि आपले हे स्पप्न पूर्ण करायला आपण रात्रंदिवस मेहनत करत आहोत. आताचे सरकार वाट बघत नाही की, नागरिक शासनाकडे आपल्या समस्या सांगत येतील आणि मग शासन त्यावर काही विचारविनिमय करेल, मग पावले उचलेल. आता सरकार असे आहे जे स्वतः थेट नागरिकांकडे पोहोचते. आपण आठवून बघा, एके काळी उत्तराखंडात सव्वा लाख घरांमध्ये नळातून पाणी पोहोचत होते. आज साडेसात लाखांहून अधिक घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोचवले जात आहे. आता घरात स्वयंपाकघरापर्यंत नळाने पाणी येते आहे तर या मायभगिनी मला आशिर्वाद देतील की नाही? आम्हा सर्वांना आशिर्वाद देतील की नाही? नळातून पाणी येते तेव्हा मायभगिनींचे कष्ट वाचतात की नाही? त्यांची सोय होते की नाही?

आणि जलजीवन योजना सुरू झाल्यापासून दोन वर्षांच्या आतच आम्ही हे काम पार पाडलं आहे. उत्तराखंडच्या माय भगिनींना, येथील स्त्रियांना यामुळे भरपूर फायदा झाला आहे. उत्तराखंडच्या माता-भगिनी-लेकींनी आमच्या बाबतीत नेहमीच स्नेह व्यक्त केला आहे. आणि आम्ही सर्वजण रात्रंदिवस मेहनत करून, इमानदारीने काम यशस्वी करून या माय—भगिनीचे जगणे सुलभ करून त्यांचे ऋण फेडण्याचा अखंड प्रयत्न करत आहोत.

 

मित्रहो,

डबल इंजिन सरकारच्या काळात उत्तराखंडातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधांवरही अभूतपूर्व काम होत आहे. उत्तराखंडमध्ये तीन नवीन मेडिकल कॉलेजेसना मंजूरी मिळाली आहे. एवढ्या छोट्या राज्यात तीन नवीन मेडिकल कॉलेज. आज हरिद्वार मेडिकल कॉलेजची पायाभरणीसुद्धा झाली. हृषीकेश एम्स तर सेवा देत आहेच, कुमांऊमध्ये उपग्रह केंद्राची सेवाही लवकरच सुरू होईल. आजमितीस लसीकरणाच्या बाबतीत  उत्तराखंडचा देशातील अग्रभागी असलेल्या राज्यांमध्ये समावेश होतो. यासाठी मी धामीजी आणि त्यांच्या  सहकाऱ्यांना, उत्तराखंडचा संपूर्ण सरकारला शुभेच्छा देतो. आणि यापाठी वैद्यकिय पायाभूत सुविधांनी निभावलेल्या प्रमुख भूमिकेचाही मोठा वाटा आहे. या कोरोना कालखंडात उत्तराखंडात 50 हून अधिक ऑक्सिजन प्लॅंट्ससुद्धा लावले गेले आहेत.

   

मित्रहो,

बऱ्याचजणांची इच्छा असते, आपणा सर्वांनाच मनातून वाटत असेल, आपले मूल डॉक्टर व्हावे, आपले मूल इंजिनयर व्हावे, आपल्या मूलाने व्यवस्थापन क्षेत्रात जावे. पण जर नवीन संस्था स्थापन झाल्या नाहीत, विद्यार्थ्यांसाठीच्या सीट्स वाढल्या नाहीत तर आपले स्वप्न पूर्ण होऊ शकेल का? आपला मुलगा डॉक्टर होऊ शकेल? आपली मुलगी डॉक्टर होऊ शकेल?  आजमितीस देशात स्थापन होत असलेली नवनवीन वैद्यकीय महाविद्यालये, नवीन आयआयटी, नवीन आयआयएम, विद्यार्थ्यांसाठी वाढत असणाऱ्या सीट्स, वर्तमान आणि भावी पिढीचं भविष्य सुदृढ करण्याचं काम करत आहे. आम्ही सर्वसाधारण मानवी सामर्थ्याला पुढे जाऊ देत, त्याला सशक्त करत, त्याची क्षमता वाढीला लावत त्याला सन्मानाने जगण्याची संधी देत आहोत.

 

मित्रांनो,

काळानुरुप आपल्या देशाच्या राजकारणात अनेक प्रकारच्या विकृती निर्माण झाल्या आहेत आणि आज याच विषयी देखील उत्तराखंडच्या पवित्र भूमीवर मला काही तरी सांगायचे आहे. काही राजकीय पक्षांकडून, समाजामध्ये फूट पाडून, केवळ एका वर्गाकडे, मग तो आपल्या जातीचा असो, कोणत्या तरी विशिष्ट धर्माचा असो किंवा आपल्या लहानशा भागातील असो, त्याकडेच लक्ष पुरवले जाते. त्यांनी हेच प्रयत्न केले आहेत आणि त्यांना त्यामध्ये व्होट बँक दिसत असते. एवढ्याच लोकांची काळजी घ्यायची, व्होट बँक बनवायची, गाडी सुरूच राहते. या राजकीय पक्षांनी आणखी एक पद्धत देखील स्वीकारली आहे. त्यांच्या विकृतीचे हे देखील एक रुप आहे आणि त्यांचा हा मार्ग आहे जनतेला सक्षम होऊ न देणे. जनता कधीही सक्षम होऊ नये यासाठी पुरेपूर प्रयत्न करत राहायचे. जनता नेहमीच लाचार झाली पाहिजे, अगतिक झाली पाहिजे, जनतेला आपल्या मदतीवर अवलंबून राहायला लावायचे जेणेकरून आपल्या डोक्यावरचा मुकुट स्थिर राहील. लोकांच्या गरजा कधीच पूर्ण होऊ द्यायच्या नाहीत हाच या विकृत राजकारणाचा पाया राहिला. त्यांना आश्रित बनवून ठेवायचे. सर्वसामान्य जनतेला सामर्थ्यवान बनू द्यायचे नाही याच दिशेने सर्व प्रयत्न झाले. दुर्दैवाने या राजकीय पक्षांनी लोकांच्या मनात हा विचार रुजवला की सरकार हेच आपले मायबाप आहे, आता जे काही मिळणार आहे ते सरकारकडूनच मिळणार आहे, त्यावरच आपला चरितार्थ चालणार आहे. लोकांच्या मनातही हा विचार कायम ठसला. म्हणजेच एका प्रकारे देशातील सर्वसामान्य माणसाचा स्वाभिमान, त्याचा आदर जाणीवपूर्वक पायदळी तुडवला गेला आणि त्याला आश्रित बनवण्यात आले आणि सर्वात दुःखद बाब म्हणजे हे सर्व ते करत राहिले आणि कोणाला त्याचा मागमूसही लागू दिला नाही. पण आम्ही मात्र या विचारापेक्षा, या दृष्टीकोनापेक्षा वेगळा मार्ग निवडला आहे. आम्ही जो मार्ग निवडला आहे तो कठीण आहे, नक्कीच अवघड आहे. पण देशाच्या हिताचा आहे. आणि आमचा मार्ग आहे सबका साथ सबका विकास. ज्या काही योजना असतील त्या सर्वांसाठी असतील, कोणत्याही भेदभावाविना त्या राबवल्या जातील, असे आम्ही सांगितले आहे. आम्ही व्होट बँक हा आमच्या राजकारणाचा पाया बनवलेला नाही तर लोकांच्या सेवेला प्राधान्य दिले आहे. देश बळकट करणे हा आमचा दृष्टीकोन आहे. आपला देश कधी बळकट होईल? ज्यावेळी प्रत्येक कुटुंब बळकट होईल. आम्ही असे तोडगे काढले आहेत, अशा योजना तयार केल्या आहेत, ज्या व्होटबँकेच्या तराजूमध्ये नीट बसणाऱ्या नसतील पण त्या कोणत्याही भेदभावाविना तुमचे जीवन सुकर बनवतील, तुम्हाला नव्या संधी देतील, तुम्हाला ताकदवान बनवतील आणि तुम्हाला स्वतःला सुद्धा असे योग्य वाटणार नाही की तुम्ही तुमच्या मागे एक असे वातावरण ठेवून जाल ज्यामध्ये तुमची मुले आश्रित म्हणून जीवन जगतील. ज्या समस्यांचा वारसा तुम्हाला मिळाला, ज्या अडचणींचा सामना करत तुम्हाला आयुष्यभर वाटचाल करावी लागली, त्या अडचणींचा वारसा तुमच्या मुलांना तसाच पुढे दिला जावा, असे तुम्हाला देखील वाटणार नाही. आम्हाला तुम्हाला आश्रित बनवायचे नाही, आत्मनिर्भर बनवायचे आहे. यापूर्वी आम्ही जे सांगितले होते की आमचा जो अन्नदाता आहे तो ऊर्जादाता सुद्धा बनला पाहिजे. त्यामुळे आम्ही शेतांच्या बांधांवर सौर पॅनल बसवण्याची कुसुम योजना घेऊन आलो आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतातच वीज निर्मिती करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. ना आम्ही कोणत्याही शेतकऱ्याला आश्रित बनवले आहे ना आम्ही त्याच्या मनात ही भावना निर्माण केली आहे की मी मोफत वीज घेत आहे. आणि या प्रयत्नामुळे त्याला वीज देखील मिळाली आणि देशावर देखील बोजा निर्माण झालेला नाही आणि एका प्रकारे तो आत्मनिर्भर बनला आणि ही योजना देशातील अनेक ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. याच प्रकारे आम्ही देशभरात उजाला योजना सुरू केली होती. घरात विजेचे बिल कमी यावे हा यामागे हेतू होता. यासाठी देशभरात आणि या ठिकाणी उत्तराखंडमध्ये कोट्यवधी एलईडी बल्ब देण्यात आले आणि पूर्वी एलईडी बल्ब 300-400 रुपयांना मिळायचे, आम्ही ते 40-50 रुपयांवर आणले. आज जवळपास प्रत्येक घरात एलईडी बल्बचा वापर होत आहे आणि लोकांचे विजेचे बिल देखील कमी येऊ लागले आहे. अनेक घरांमध्ये जो मध्यम वर्ग, कनिष्ठ मध्यम वर्ग आहे, त्यांचे दर महिन्याचे विजेचे बिल 500-600 रुपयांपर्यत कमी झाले आहे.

 

मित्रांनो,

याच प्रकारे आम्ही मोबाईल फोन स्वस्त केले, इंटरनेट स्वस्त केले, गावा-गावात सामाईक सेवा केंद्र सुरू करण्यात येत आहेत, अनेक सुविधा गावांमध्ये पोहोचत आहेत. आता गावातील माणसाला रेल्वेचे आरक्षण करायचे असेल तर त्यासाठी त्याला शहरात जावे लागत नाही, एक संपूर्ण दिवस वाया घालवावा लागत नाही. 100-200-300 रुपये बसच्या तिकिटासाठी खर्च करावे लागत नाहीत. तो आपल्या गावातच सामाईक सेवा केंद्रामध्ये रेल्वेचे ऑनलाईन बुकिंग करू शकतो. त्याच प्रकारे तुम्ही पाहिले असेल की आता उत्तराखंडमध्ये होम स्टे, जवळपास प्रत्येक गावामध्ये याची माहिती पोहोचली आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच मला उत्तराखंडच्या लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली होती. ते लोक अतिशय यशस्वी पद्धतीने होम स्टे सेवा चालवत आहेत. जर एवढे प्रवासी येणार असतील, पूर्वीच्या तुलनेत दुप्पट तिप्पट प्रवासी येऊ लागले आहेत. जर इतके प्रवासी येणार असतील, तर साहजिकच हॉटेलांच्या उपलब्धतेचा प्रश्न देखील आहेच आणि रातोरात इतकी हॉटेल्स बनू शकत नाहीत पण प्रत्येक घरात एक खोली तयार करता येऊ शकते, चांगल्या सुविधांसह तयार करता येऊ शकते आणि मला खात्री आहे उत्तराखंड होम स्टे बनवण्यात, सोयीसुविधांच्या विस्तारामध्ये संपूर्ण देशाला एक नवी दिशा दाखवू शकतो.

 

मित्रांनो,

अशाच प्रकारचे परिवर्तन आम्ही देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात घडवत आहोत. अशा प्रकारच्या परिवर्तनामुळे देश 21व्या शतकात पुढे जाईल, अशाच प्रकारचे परिवर्तन उत्तराखंडच्या लोकांना आत्मनिर्भर बनवेल

 

मित्रांनो,

समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काही तरी करणे आणि व्होट बँक तयार करण्यासाठी काही तरी करणे यामध्ये खूप  मोठा फरक आहे. ज्यावेळी आमचे सरकार गरिबांना मोफत घरे देते त्यावेळी त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चिंता ते दूर करते. ज्यावेळी आमचे सरकार गरिबांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा देते त्यावेळी ते त्याला उपचारांच्या खर्चाचा भार सहन करण्यासाठी त्याची जमीन विकावी लागत नाही, त्याचा कर्जाच्या दुष्टचक्रात अडकण्यापासून बचाव होतो. ज्यावेळी आमचे सरकार कोरोना काळात प्रत्येक गरिबाला मोफत धान्याची हमी देते त्यावेळी त्याचे उपासमारीपासून रक्षण होते. मला याची कल्पना आहे की देशातील गरीब वर्गाला, मध्यम वर्गाला या वस्तुस्थितीची जाणीव आहे. त्यामुळेच प्रत्येक भागात, प्रत्येक राज्यात आमच्या कामांना, आमच्या योजनांना जनता जनार्दनाचा आशीर्वाद मिळत आहे आणि नेहमीच मिळत राहील.

 

मित्रांनो,

स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सवी कालखंडात देशाच्या प्रगतीने जी गती प्राप्त केली आहे ती आता कमी होणार नाही, आता थांबणार नाही आणि थकणार नाही, उलट अधिक विश्वासाने आणि संकल्पांसह पुढे पुढे जात राहील. आगामी पाच वर्षे उत्तराखंडच्या रौप्य महोत्सवाकडे घेऊन जाणारी आहेत. असे कोणतेही लक्ष्य नाही जे उत्तराखंड साध्य करू शकणार नाही. असा कोणताही संकल्प नाही जो या देवभूमीमध्ये सिद्ध होऊ शकणार नाही. तुमच्याकडे धामी जींच्या रुपात युवा नेतृत्व देखील आहे, त्यांची अनुभवी टीम देखील आहे. आमच्याकडे ज्येष्ठ नेत्यांची खूप मोठी साखळी आहे. 30-30 वर्षे, 40-40 वर्षांच्या अनुभवांची शिदोरी असलेल्या नेत्यांची टीम आहे जी उत्तराखंड ज्या उज्ज्वल भविष्यासाठी समर्पित आहे.

जे देशभरात विखुरलेले आहेत ते उत्तराखंडचे भविष्य साकार करू शकणार नाहीत. तुमच्या आशीर्वादाने विकासाचे हे डबल इंजिन उत्तराखंडचा जलद गतीने विकास करत राहील, याच विश्वासाने मी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. आज देवभूमीमध्ये आलेलो आहे, वीरमातांच्या भूमीमध्ये आलो आहे तर काही भावपुष्प, काही श्रद्धासुमनं अर्पण करत आहे, काही ओळी बोलून मी माझे बोलणे संपवतो-

जहाँ पवन बहे संकल्प लिए,

जहाँ पर्वत गर्व सिखाते हैं,

जहाँ ऊँचे नीचे सब रस्ते

बस भक्ति के सुर में गाते हैं

उस देव भूमि के ध्यान से ही

उस देव भूमि के ध्यान से ही

मैं सदा धन्य हो जाता हूँ

है भाग्य मेरा,

सौभाग्य मेरा,

मैं तुमको शीश नवाता हूँ।

मैं तुमको शीश नवाता हूँ।

और धन्य धन्य हो जाता हूँ।

तुम आँचल हो भारत माँ का

जीवन की धूप में छाँव हो तुम

बस छूने से ही तर जाएँ

सबसे पवित्र वो धरा हो तुम

बस लिए समर्पण तन मन से

मैं देव भूमि में आता हूँ

मैं देव भूमि में आता हूँ

है भाग्य मेरा

सौभाग्य मेरा

मैं तुमको शीश नवाता हूँ

मैं तुमको शीश नवाता हूँ।

और धन्य धन्य हो जाता हूँ।

जहाँ अंजुली में गंगा जल हो

जहाँ हर एक मन बस निश्छल हो

जहाँ गाँव गाँव में देश भक्त

जहाँ नारी में सच्चा बल हो

उस देवभूमि का आशीर्वाद लिए

मैं चलता जाता हूँ

उस देवभूमि का आशीर्वाद लिए

मैं चलता जाता हूँ

है भाग्य मेरा

सौभाग्य मेरा

मैं तुमको शीश नवाता हूँ

मैं तुमको शीश नवाता हूँ

और धन्य धन्य हो जाता हूँ

मंडवे की रोटी

हुड़के की थाप

हर एक मन करता

शिवजी का जाप

ऋषि मुनियों की है

ये तपो भूमि

कितने वीरों की

ये जन्म भूमि

में देवभूमि में आता हूँ

मैं तुमको शीश नवाता हूँ

और धन्य धन्य हो जाता हूँ

मैं तुमको शीश नवाता हूँ

और धन्य धन्य हो जाता हूँ

माझ्या सोबत बोला, भारत माता की जय ! भारत माता की जय ! भारत माता की जय !

खूप खूप धन्यवाद !

***

ShaileshPatil/VijayaS/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 



(Release ID: 1778194) Visitor Counter : 221