पंतप्रधान कार्यालय

इन्फिनिटी फोरम या फिनटेकसंबंधी वैचारिक नेतृत्व मंचाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन


“गेल्या वर्षी, भारतात, प्रथमच एटीएममधून पैसे काढण्यापेक्षा मोबाईलद्वारे करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारांचे प्रमाण अधिक ”

"डिजिटल इंडिया अंतर्गत परिवर्तनात्मक उपक्रमांनी प्रशासनात वापरण्यायोग्य नाविन्यपूर्ण फिनटेक संशोधनासाठी संधी खुल्या केल्या आहेत"

“आता या फिनटेक उपक्रमांना फिनटेक क्रांतीमध्ये रूपांतरित करण्याची वेळ आली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाचे आर्थिक सक्षमीकरण साध्य करण्यास मदत करणारी ही क्रांती.

“लोकांचे हित जपले जाईल हे तुम्ही सुनिश्चित करणे आवश्यक आहे हा विश्वासाचा अर्थ आहे. फिनटेक सुरक्षा संशोधनाशिवाय फिनटेक संशोधन अपूर्ण असेल”

"आपले सार्वजनिक पायाभूत विकास संबंधी डिजिटल संशोधन जगभरातील नागरिकांचे जीवन सुधारू शकते "

“गिफ्ट सिटी हा केवळ एक परिसर नसून ते भारताचे प्रतिनिधित्व करते. भारतातील लोकशाही मूल्ये, मागणी, लोकसंख्या आणि विविधता यांचे प्रतिनिधित्व करते. कल्पना, नवसंशोधन आणि गुंतवणुकीसाठी भारताच्या खुलेपणाचे प्रतिनिधित्व करते”

"वित्त पुरवठा ही अर्थव्यवस्थेची रक्त वाहिनी आहे आणि तंत्रज्ञान त्याचा वाहक आहे. अंत्योदय साधण्यासाठी दोन्हीही तितकेच महत्त्वाचे आहेत

Posted On: 03 DEC 2021 2:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2021

 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी  इन्फिनिटी फोरम या फिनटेकवरील वैचारिक नेतृत्व मंचाचे  व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्‌घाटन केले.

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, चलनाचा इतिहास भव्य उत्क्रांती दर्शवतो. गेल्या वर्षी भारतात मोबाईल पेमेंट व्यवहारांनी पहिल्यांदाच एटीएममधून पैसे काढण्याच्या व्यवहारांना मागे टाकले अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. कोणत्याही प्रत्यक्ष शाखा कार्यालयांशिवाय पूर्णपणे डिजिटल बँक हे वात्सवात उतरले असून एक दशकापेक्षा कमी कालावधीत ही सामान्य बाब बनू शकेल. जशी मानवाची उत्क्रांती होत गेली, तसे आपल्या व्यवहारांचे स्वरूपही विकसित झाले. वस्तूंच्या देवाणघेवाणीपासून (बार्टर  प्रणाली) ते धातूंपर्यंत, नाण्यांपासून  नोटांपर्यंत, धनादेशांपासून कार्डांपर्यंत, आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत, असे त्यांनी सांगितले.

तंत्रज्ञानाचा अवलंब किंवा नवनवीन संशोधनाच्या बाबतीत भारताने जगाला हे सिद्ध करून दाखवले आहे की, भारत कुठेही  मागे नाही, असे पंतप्रधानांनी नमूद केले. डिजिटल इंडिया अंतर्गत परिवर्तनात्मक उपक्रमांनी प्रशासनात वापरण्यायोग्य  नाविन्यपूर्ण फिनटेक उपायांसाठी संधी खुल्या केल्या  आहेत.  आता या फिनटेक उपक्रमांचे फिनटेक क्रांतीमध्ये रूपांतर करण्याची वेळ आली आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. "अशी  क्रांती जी देशातील प्रत्येक नागरिकाचे आर्थिक सक्षमीकरण साध्य  करण्यास  मदत करेल",असे  ते म्हणाले.

तंत्रज्ञानाने आर्थिक समावेशकता कशी उत्प्रेरित केली  आहे हे स्पष्ट करतानामोदी यांनी निदर्शनास आणून दिले  की 2014 मध्ये 50% पेक्षा कमी भारतीयांकडे बँक खाती होती , भारताने गेल्या 7 वर्षांत 430 दशलक्ष जन धन खात्यांसह त्याचे सार्वत्रिकीकरण केले आहे.  त्यांनी रुपे कार्ड सारख्या उपक्रमांची माहिती देताना सांगितले की  गेल्या वर्षी 690 दशलक्ष रूपे कार्डामार्फत  1.3 अब्ज व्यवहार झाले; यूपीआयवरून गेल्या महिन्यात सुमारे 4.2 अब्ज  व्यवहार झाले , महामारी असूनही जीएसटी पोर्टलवर दर महिन्याला जवळपास  300 दशलक्ष इन्व्हॉईस अपलोड केले जातातदररोज सुमारे 1.5 दशलक्ष रेल्वे  तिकिटांचे ऑनलाइन आरक्षण  होत आहे; गेल्या वर्षी,  FASTag ने 1.3 अब्ज वेगवान व्यवहार केले, पंतप्रधान स्वनिधी योजनेने देशभरातील छोट्या  विक्रेत्यांना कर्जपुरवठा सुलभ केला, e-RUPI ने गळती शिवाय निर्दिष्ट सेवांचे लक्ष्यित वितरण सुलभ केले.

आर्थिक समावेशकता हा फिनटेक क्रांतीचा चालक आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. हे  स्पष्ट करताना, पंतप्रधान म्हणाले, फिनटेक 4 स्तंभांवर आधारित  आहे: उत्पन्न, गुंतवणूक, विमा आणि संस्थात्मक कर्जपुरवठा . जेव्हा उत्पन्न वाढते, तेव्हा गुंतवणूक शक्य होते. विमा संरक्षण अधिक जोखीम  घेण्याची क्षमता देते आणि गुंतवणूक सक्षम करते. संस्थात्मक कर्जपुरवठा   विस्तारासाठी बळ देतो  आणि या प्रत्येक स्तंभांवर  आम्ही काम केले आहे. जेव्हा हे सर्व घटक एकत्र येतात, तेव्हा तुम्हाला अचानक आणखी बरेच लोक आर्थिक  क्षेत्रात सहभागी होताना दिसतात, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

लोकांमध्ये या नवसंशोधनाची व्यापक स्वीकृती लक्षात घेऊन फिनटेकवरील विश्वासाच्या महत्त्वावर पंतप्रधानांनी भर दिला. डिजिटल पेमेंट्स आणि अशा  स्वरूपाच्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून सर्वसामान्य भारतीयांनी आपल्या  फिनटेक परिसंस्थेवर  प्रचंड विश्वास दाखवला आहे. हा विश्वास ही एक जबाबदारी आहे. विश्वासाचा  अर्थ असा आहे की तुम्ही लोकांचे हित सुरक्षित असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. फिनटेक सुरक्षा संशोधनाशिवाय फिनटेक संशोधन  अपूर्ण असेल, असे ते म्हणाले.

फिनटेक क्षेत्रातील भारताच्या अनुभवाच्या व्यापक वापराबाबत  पंतप्रधानांनी मत मांडले . जगासोबत अनुभव आणि कौशल्य सामायिक  करणे आणि त्यांच्याकडून शिकण्याची भारताची प्रवृत्ती आहे यावर त्यांनी भर दिला. "आपल्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा संशोधनामुळे जगभरातील  नागरिकांचे जीवन सुधारू शकते", असे पंतप्रधानांनी नमूद केले.

गिफ्ट सिटी हा केवळ एक परिसर नसून ते भारताचे प्रतिनिधित्व करते.   भारतातील लोकशाही मूल्ये, मागणी, लोकसंख्या आणि विविधता यांचे ते  प्रतिनिधित्व करते.  कल्पना, नवसंशोधन  आणि गुंतवणुकीसाठी भारताच्या  खुलेपणाचे ते प्रतिनिधित्व करते असे पंतप्रधान म्हणाले . गिफ्ट सिटी हे जागतिक फिनटेक जगताचे  प्रवेशद्वार आहे.

"वित्तसहाय्य ही  अर्थव्यवस्थेची जीवन वाहिनी आहे आणि तंत्रज्ञान त्याचे वाहक आहे. "अंत्योदय आणि सर्वोदय " साधण्यासाठी दोन्हीही तितकेच महत्त्वाचे आहेत असे पंतप्रधान म्हणाले. 

गिफ्ट सिटी आणि ब्लूमबर्ग यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र  प्राधिकरणाने 3 आणि 4 डिसेंबर 2021 रोजी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. मंचाच्या पहिल्या पर्वात इंडोनेशिया , दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटन  हे भागीदार  देश आहेत.

इन्फिनिटी मंच  धोरण, व्यवसाय आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या तज्ञांना   एकत्र आणेल आणि फिनटेक उद्योगाद्वारे सर्वसमावेशक विकासासाठी आणि मानवतेची मोठ्या प्रमाणावर सेवा करण्यासाठी तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण  संशोधनाचा कसा वापर करता  येईल यावर चर्चा करण्यासाठी आणि योग्य कृतीसाठी मार्गदर्शन करेल.

या मंचाचा मुख्य कार्यक्रम  'बियॉन्ड " या संकल्पनेवर  केंद्रित आहे; 'फिनटेक बियॉन्ड बाऊंडरीजही  वित्तीय सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन  देण्यासाठी जागतिक  विकासामध्ये भौगोलिक सीमांच्या पलिकडच्या बाबींवर   केंद्रित उपसंकल्पना आहे. स्पेस टेक , ग्रीन टेक , ऍग्री  टेक सारख्या उदयोन्मुख क्षेत्रांशी समन्वय साधणारी 'फिनटेक बियॉन्ड फायनान्स' आणि क्वांटम कंप्युटिंग भविष्यात फिनटेक  उद्योगाच्या स्वरूपावर कसा प्रभाव पाडू शकतो आणि नवीन संधींना प्रोत्साहन देऊ शकेल यावर  केंद्रित  'फिनटेक बियॉन्ड नेक्स्ट' यासारख्या   विविध उपसंकल्पना आहेत .

फोरममध्ये 70 हून अधिक देशांचा सहभाग आहे.

 

 

 

 

Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1777608) Visitor Counter : 283