माहिती आणि प्रसारण मंत्रालय
उत्तराखंडातील गावामध्ये स्थलांतरामुळे निर्माण झालेल्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर बहरणाऱ्या प्रेम आणि मैत्रीची एक कहाणी म्हणजेच ‘सुनपट’ हा चित्रपट : दिग्दर्शक राहुल रावत
पणजी, 25 नोव्हेंबर 2021
आसपासचे लोक जेव्हा आपल्याला सोडून दूर जातात तेव्हा केवळ आपल्यालाच नव्हे तर आणि निसर्ग आणि डोंगरदऱ्यांनाही जो एकटेपणा वाटतो, त्यालाच ‘सुनपट’ असे म्हणतात. उत्सव किंवा जत्रा संपल्यावर रिकाम्या मैदानाकडे पाहून जी पोकळी जाणवते, ती म्हणजेच ‘सुनपट’. उत्तराखंडातील गावागावांतून माणसं जेव्हा नोकरीच्या शोधात शहरांमध्ये स्थलांतरीत झाली , तेव्हा त्या गावांत हाच एकटेपणा आणि पोकळी जाणवू लागली, याचेच चित्रण दिग्दर्शक राहुल रावत यांनी आपल्या गढवाली चित्रपट ‘सुनपट’ मध्ये केले आहे.
उत्तराखंडातील गावांमध्ये पुरेशा रोजगाराच्या संधी नसल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून माणसे गावे सोडून शहरांकडे धावत आहेत. याच्या मागे अनेक सामाजिक आर्थिक कारणे असतात. मोठ्या प्रमाणावर झालेल्या अशा स्थलांतरामुळे तिथली सुमारे 1500 गावे ओसाड पडली आहेत, तर 4000 गावांमधून हाताच्या बोटांवर मोजता येण्याएवढीच माणसे शिल्लक उरली आहेत. यामुळे तिथली संस्कृती, परंपरा आणि समाज आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. माझ्या राज्यात स्थलांतरामुळे काय अनर्थ होत आहे, हे या गोष्टीच्या माध्यमातून मला सर्वांना सांगायचे होते.” असे रावत म्हणाले.
हा चित्रपट बनवण्याच्या प्रक्रियेबद्दल रावत यांनी सांगितले, की उत्तराखंडात फिरताना प्रत्यक्ष भेटलेल्या व्यक्तींकडूनच त्यांना या चित्रपटाची प्रेरणा मिळाली होती. कलाकारांची निवड झाल्यापासून 20 दिवसांत या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले.
या चित्रपटाचे निर्मिती व्यवस्थापक वीरू सिंग बाघेल यांनी चित्रीकरणाबद्दल आपले अनुभव सांगितले. “चित्रीकरणासाठी योग्य प्रकाश आवश्यक होता , त्यासाठी आम्ही सर्वजण सकाळी लवकर उठून चित्रीकरणासाठी बाहेर पडत असू . पहाडांमध्ये योग्य प्रकाश नेहमीच हुलकावणी देत असे, त्यामुळे आम्हाला एका पहाडावरून दुसऱ्या पहाडावर धावत पळत पोचावे लागत होते. कलाकार आणि तंत्रज्ञ हे सर्वच जण उपकरणे वाहून नेण्यास मदत करत असत. या पूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण फक्त २ एल इ डी दिव्यांच्या मदतीने पार पडलं आहे. हा एक अतिशय अद्भुत अनुभव होता.”
या चर्चेच्या वेळी चित्रपटाचे सह निर्माते रोहित रावत यांनी माध्यम प्रतिनिधी आणि प्रेक्षकांसमोर आपले या चित्रीकरणाबद्दलचे अनुभव कथन केले.
‘सुनपट’ या चित्रपटाचे प्रदर्शन 52 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ‘भारतीय पॅनोरमा’ तील ‘कथा बाह्य चित्रपट’ विभागात करण्यात आले . महोत्सवात दाखवला जाणारा हा उत्तराखंडचा पहिलाच चित्रपट आहे.
चित्रपटाबद्दल काही :
भारतीय पॅनोरमा नॉन फिचर फिल्म विभागात दाखवल्या गेलेल्या ‘सुनपट’ या चित्रपटात १२ वर्षांचा अनुज आणि त्याचा मित्र भारतू यांची गोष्ट रंगवली आहे. अनुजला जी मुलगी आवडत असते ती काय प्रतिसाद देते याचा शोध हे दोघे मित्र घेत असतात. त्या मुलीसमोर आपले प्रेम कशा रीतीने व्यक्त करावे याची योजना ते तयार करताना दिसतात. याच्या पार्श्वभूमीला त्यांच्या गावातील भकासपणा आपल्याला दिसत राहतो. अनेक वर्षे चाललेल्या स्थलांतरामुळे गावातील भावनिक दुरावस्था आपल्याला दिसत राहते. अशा निराश वातावरणात फुलत जाणारे प्रेम आणि या दोन मुलांची मैत्री यांचीच ही गोष्ट आहे.
दिग्दर्शकाबद्दल काही :
दिग्दर्शक व निर्माता राहुल रावत यांनी जाहिरातपटाच्या काही प्रथितयश दिग्दर्शकांबरोबर याआधी काम केले आहे. त्यानंतर त्यांनी परसेप्ट पिक्चर्स या कंपनीत लेखक आणि दिग्दर्शक म्हणून काम केले. नंतर त्यांनी जाहिरातपटांकडून चित्रपट निर्मितीकडे रोख वळवला. चित्रपट हा जनमानसावर अधिक प्रभाव टाकतो , अनेकदा मानवाच्या जीवनाची दिशाही बदलण्याची ताकद या माध्यमात आहे आणि चित्रपटासाठी काम करण्यात अधिक समाधान मिळते हे त्यांच्या लक्षात आले.
‘बधाई हो’ या हिंदी चित्रपटासाठी त्यांनी दिग्दर्शक अमित शर्मा यांच्या बरोबर काम केले आहे.
लेखक, दिग्दर्शक, सहनिर्माते , पटकथा लेखक आणि संपादक या नात्याने ‘सुनपट’ हा त्यांचा पहिला चित्रपट आहे.
* * *
Jaydevi PS/U.Raikar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1775039)
Visitor Counter : 308