आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण- 5 चे दुसऱ्या टप्प्यातील निष्कर्ष केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्रसिद्ध

Posted On: 24 NOV 2021 4:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2021

नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. विनोद कुमार पॉल आणि भारत सरकारच्या केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव श्री राजेश भूषण यांनी आज नवी दिल्लीत भारत आणि 14 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी 2019-21 राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (एनएफएचएस -5) ची (टप्पा -II अंतर्गत एकत्रित ) लोकसंख्या, प्रजनन आणि बाल आरोग्य, कुटुंब कल्याण, पोषण आणि अन्य संदर्भातील प्रमुख निर्देशकांची तथ्यपत्रके (फॅक्टशीट )आज प्रसिद्ध केली.

टप्पा -2 अंतर्गत अरुणाचल प्रदेश, चंदीगड, छत्तीसगड, हरियाणा, झारखंड, मध्य प्रदेश, दिल्ली एनसीटी , ओदीशा, पुदुच्चेरी , पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड ही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. टप्पा -1 मध्ये समाविष्ट 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांबाबत राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 चे निष्कर्ष डिसेंबर, 2020 मध्ये प्रसिद्ध करण्यात आले.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि उद्भवणाऱ्या अन्य समस्यांशी संबंधित विश्वसनीय आणि तुलनात्मक संकलित माहिती प्रदान करणे हा राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा सलग होणाऱ्या फेऱ्यांचा उद्देश आहे. जिल्हा स्तरापर्यंत वेगवेगळे अंदाज प्रदान करण्याच्या दृष्टीने, .राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 अंतर्गत सर्वेक्षणाचे कार्य देशातील 707 जिल्ह्यांतील (मार्च, 2017 पर्यंत) सुमारे 6.1 लाख कुटुंब नमुने संकलित करून करण्यात आले; यात 724,115 महिला आणि 101,839 पुरुषांचा समावेश होता.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 चे सर्व निष्कर्ष मंत्रालयाच्या संकेस्थळावर (www.mohfw.gov.in) उपलब्ध असून सार्वजनिक करण्यात आले आहेत.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5  या सर्वेक्षणातून अखिल भारतीय आणि राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश पातळीवर जारी करण्यात आलेल्या सत्यपत्रामध्ये महत्त्वाच्या 131 निर्देशांकांबाबत माहितीचा समावेश आहे. देशातील शाश्वत विकास ध्येयांच्या प्रगतीचा पाठपुरावा करण्यामध्ये सहाय्यक ठरणाऱ्या महत्त्वाच्या निर्देशांकांची माहिती या सत्यपत्रात दिली आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-4 (2015-16 मध्ये झालेले) मधून हाती आलेले निकाल शाश्वत विकास ध्येयांच्या अनेक निर्देशांकांसाठी मुलभूत मुल्ये म्हणून वापरण्यात आले. काळानुरूप तुलनात्मक अभ्यास शक्य व्हावा म्हणून राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 मधील अनेक निर्देशांक 2015-16 मध्ये करण्यात आलेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-4 च्या निर्देशांकांसारखेच आहेत. मात्र, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 मध्ये मृत्यू नोंदणीकरण, पर्व-प्राथमिक शिक्षण, लहान मुलांच्या लसीकरणाचे नवे आयाम, मुलांना दिले जाणारे सूक्ष्म पोषक घटक, मासिक पाळीदरम्यान स्वच्छता राखण्याची दक्षता, दारू आणि तंबाखू सेवनाची वारंवारता, असंसर्गजन्य आजारांमधील अतिरिक्त घटक, रक्तदाब आणि मधुमेह या आजारांच्या प्रादुर्भावामुळे 15 वर्षांवरील सर्वांमध्ये वाढलेली/कमी झालेली वयोमर्यादा यांसह इतर अनेक नवे मुद्दे समाविष्ट करण्यात आले होते. त्यामुळे विद्यमान सर्वेक्षण कार्यक्रमाला सशक्त करण्यासाठी आवश्यक माहिती मिळाली आणि धोरणात्मक हस्तक्षेपासाठी नव्या नितींचा शोध घेता आला.

भारतातून मिळालेले महत्त्वाचे निकाल आणि सर्वेक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 सत्यपत्रे यांच्याबद्दलची विस्तृत माहिती जारी पत्रकात वाचता येईल.

नीती आयोगाच्या आरोग्य विषयाच्या सदस्यांनी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 मध्ये नोंदण्यात आलेल्या आरोग्य विम्याच्या मोठ्या विस्ताराबाबत सर्व आरोग्य प्रशासकांचे अभिनंदन केले आहे.या सर्वेक्षणातून हाती आलेली माहिती सरकारला सार्वत्रिक आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी उपयुक्त ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 शाश्वत विकास ध्येये गाठण्याच्या दिशेने अधिक प्रगती दर्शवित आहे. 

केंद्रीय आरोग्य सचिव म्हणाले की,घरगुती प्रश्नसंचाच्या विस्तृत व्याप्तीमुळे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 मधून मिळालेली माहिती सर्व संबंधित मंत्रालयांना, राज्य सरकारांना आणि इतर भागधारकांसाठी उपयुक्त ठरेल.

 

G.Chippalkatti/S.Chavan/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1774566) Visitor Counter : 2314


Read this release in: Urdu , English , Hindi , Tamil , Telugu